🌟परभणीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व सुविधांबाबत जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्याकडून आढावा...!


🌟जिल्हाधिकारी कार्यालयाचे कामकाजही येथूनच केले : वैद्यकीय महाविद्यालयाच्या सोयीसुविधांची पाहणी🌟 


परभणी (दि.०८ मे २०२३) : येत्या शैक्षणिक वर्षांपासून १०० विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी आज दिवसभर ठाण मांडून वैद्यकीय महाविद्यालयातील विभागनिहाय सर्व पायाभूत सोयीसुविधा उभारणीबाबतचा आढावा घेतला. त्यासाठी जिल्हाधिकारी श्रीमती गोयल यांनी आज त्यांच्या स्वीय सहायक कैलास मठपती यांच्यासह कर्मचारीवृंदच येथे हलविला असून, जिल्हाधिकारी कार्यालयाचेही कामकाज त्यांनी आज येथूनच पाहीले.   

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची राष्ट्रीय आयुर्विज्ञान संस्थेच्या चमूकडून तपासणी होणार असून, त्यासाठी जिल्हाधिकारी श्रीमती गोयल यांच्या नेतृत्वात अधिष्ठाता डॉ. संजयकुमार मोरे व येथील सहयोगी प्राध्यापक यावेळी उपस्थि त होते. वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामकाज प्रस्तावाबाबत राज्य शासन, जिल्हा प्रशासन व वैद्यकीय महाविद्यालयाकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. 

जिल्हाधिकारी कार्यालयाचे कामकाजासह आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील इमारतीच्या नळजोडणी, तसेच विद्युत उपकरणे बसविणे, इमारतीतील विविध विभागांचे पार्टीशन, प्रयोगशाळा, विद्यार्थी व विद्यार्थिंनींच्या वसतीगृहाच्या कामाकाजाचाही दिवसभरात दोनवेळा आढावा घेत तपासणी केली.  

शरीरशास्त्र, इंद्रीयविज्ञान, जीवरसायनशास्त्र, संग्रहालय, ग्रंथालय, वाचनकक्ष, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी वसतीगृहांच्या सोयीसुविधा तसेच दोन लेक्चर हॉल, आणि तीन डेमॉस्ट्रेशन रूमची त्यांनी प्रत्यक्ष जावून पाहणी करत आढावा घेतला. त्याशिवाय शस्त्रक्रिया विभाग, औषधभांडार विभाग, प्रसुतीकक्षविभाग, कान-नाक-घसा, डोळे आणि कम्युनिटी मेडीसीन, पॅथॅलॉजी, मायक्रोबायोलॉजी, भूलतज्ज्ञ आदींसह सर्व विभागप्रमुखांकडून त्यांना लागणाऱ्या विविध सोयीसुविधांची माहिती घेत, याकामी लागणाऱ्या मदतीबाबत जिल्हाधिकारी श्रीमती गोयल यांनी पाठपुरावा केला.   

गेल्या काही दिवसांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून १०० विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरु होण्याबाबतची कार्यवाही गतिमान करण्यासाठी शासनस्तरावर हा पाठपुरावा करण्यात येत आहे. ही प्रक्रिया लवकरात लवकर संपवून येथील शैक्षणिक सत्र सुरु करण्याला जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी प्राधान्य दिले आहे. तसेच राष्ट्रीय आयुर्विज्ञान संस्थेच्या पुढील तपासणीसाठी आरोग्य यंत्रणेच्या पायाभूत सुविधा उभारणीमध्ये त्या लक्ष घालून यापुढेही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात प्रत्यक्ष बसून येथील सर्व यंत्रणेचा वेळोवेळी आढावा घेणार आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या