🌟सक्षम पिढी घडवण्यासाठी बालविवाह रोखणे गरजेचे : बालविवाह प्रतिबंधक कायद्याची कडक अंमलबजावणी करा....!


🌟परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांचे प्रतिपादन : सेलूत आयोजित किशोरवयीन मुलींच्या कार्यशाळेस तुफान प्रतिसाद🌟

सेलू (दि.03 मे 2023) - जर आपल्याला पुढील पिढी ही कमकुवत न बनवता सक्षम घडवायची असेल तर बालविवाह रोखणे आणि यावर कडक उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले.येथील साईबाबा मंदिर सभागृहात आज 03 मे रोजी सकाळी 11-00 वाजता शिक्षण विभाग ,जिल्हा परिषद परभणी व नगर परिषद सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने बालविवाह मुक्त परभणी जिल्हा या अभियानांतर्गत किशोरवयीन मुलींची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.या प्रसंगी त्या बोलत होत्या.

यावेळी व्यासपीठावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव,उपजिल्हाधिकारी अरुणा संगेवार,तहसीलदार दिनेश झाम्पले,प्राथमिक शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे,उपशिक्षणाधिकारी गणराज येरमळ,न.प.मुख्याध्याधिकारी देविदास जाधव,गटशिक्षणाधिकारी उमेश राऊत,जेष्ठ शिक्षणविस्तार अधिकारी गजानन वाघमारे,प्रकल्प अधिकारी आकात आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी मनोगत व्यक्त करताना शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे म्हणाले की,गेल्या वर्षभरापेक्षा जास्त कालावधीपासून परभणी जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी आंचल गोयल आणि जिल्ह्यातील सर्व अधिकारी एका ध्येयाने कार्य करत आहेत.जिल्ह्यात एकही बालविवाह होऊ नये यासाठी समाजाने सुद्धा प्रयत्न करणे गरजेचे आहे.बालविवाह होत असेल तर समाजातील सजग नागरिकांनी प्रशासनाला कळवणे गरजेचे आहे.यासाठी पोलीस प्रशासनासह सर्वच अधिकारी पाठीशी उभे राहत आहेत.त्यामुळे न घाबरता बालविवाह होत असेल तर प्रशासनाला संपर्क करण्याचे आवाहन देखील शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांनी केले.

यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी सांगितले की,आपण जी बालविवाहविरोधी चळवळ सुरू केली आहे ती समाजाच्या हिताची आहे.बालविवाह करणे हा कायद्याने गुन्हा आहे.यावेळी जिल्हाधिकारी गोयल यांनी विद्यार्थिनीमध्ये मिसळून विद्यार्थिनींशी संवाद साधत मुलींसोबत चर्चा केली.यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की,बालविवाह कायदा 2006 नुसार कडक अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.जर अल्पवयीन मुलीचे लग्न होत असेल तर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल.बालविवाह जर केला तर त्यापासून होणारे दुष्परिणाम देखील गोयल यांनी सांगितले.पुढील पिढी सक्षम बनवायची असेल तर बालविवाह कडकपणे रोखणे गरजेचे असल्याचे मत जिल्हाधिकारी गोयल यांनी व्यक्त केले. मागील वर्षभरात 300 तर मार्च या केवळ एक महिन्यात 35 बालविवाह जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी थांबवले आहेत.बालविवाह करण्यापेक्षा मुलींना शिक्षण द्या.मुलींच्या शिक्षणाचा प्रवाह खुप कमी आहे.शासनाच्या विविध योजना असतांना मुली शिक्षणात मागे राहू नयेत.यावेळी जिल्हाधिकारी गोयल यांना काही विद्यार्थिनींनी विचारलेल्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली.यावेळी  अपहरण,ग्रामीण भागातील मुलींचे शिक्षणासाठी जाणे येणे यासाठी असावी लागणारी सुरक्षितता,यासारख्या प्रश्नांना मुक्तपणे उत्तरे दिली

तसेच मुलींनी मोबाईल,फेसबुक,व्हाट्सएप,इन्स्टाग्राम यासारख्या सोशल मिडियापासून पासून दूर राहून शिक्षणाकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला.यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव,प्रकल्प अधिकारी आकात यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी नूतन विद्यालयाच्या योगा सेंटरच्या विद्यार्थिनींनी योगासनांचे प्रात्यक्षिक सादर केले.तसेच यावेळी शहरातील इतरही शाळांमधील विद्यार्थिनींनी गीते सादर केली.तसेच भित्तीपत्रक,छोट्या नाटिका यांचेही सादरीकरण यावेळी करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कीर्ती राऊत तर सूत्रसंचालन सुभाष मोहकरे,सोनी यांनी केले.या कार्यक्रमासाठी असंख्य विद्यार्थिनी,शिक्षिका,शिक्षक,अंगणवाडी कार्यकर्ती यासह शहरी व ग्रामीण भागातील नागरिक उपस्थित होते.

* एक दिवसाचा मुख्यमंत्री केले तर काय कराल ?

--एका विद्यार्थिनीने जिल्हाधिकारी आंचल गोयल यांना विचारले की,तुम्हाला एक दिवसाचा मुख्यमंत्री केले तर आपली भूमिका काय असेल? यावेळी गोयल यांनी ,मला एक दिवसासाठी मुख्यमंत्री केले तर मी पुन्हा परभणी जिल्हाधिकारी म्हणून पाठवा अशी मागणी करेल असे उत्तर देऊन राजकारणावर भाष्य टाळून उत्कृष्ट जिल्हाधिकारी असल्याची प्रचिती दिली.

सेलू: येथील किशोरवयीन मुलींच्या कार्यशाळेचे उदघाटन करतांना जिल्हाधिकारी आंचल गोयल,उपजिल्हाधिकारी अरुणा संगेवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव,तहसीलदार दिनेश झाम्पले,गटशिक्षणाधिकारी उमेश राऊत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या