🌟पशुसंवर्धन विभागाची ‘जत्रा शासकीय योजनांची, सर्वसामान्यांच्या विकासाची’.....!🌟पशुपालकांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन🌟  

परभणी (दि.०४ मे २०२३) : राज्य शासनाच्या ‘जत्रा शासकीय योजनांची’ या अभियानाअंतर्गत पशुसंवर्धन विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांमध्ये कृत्रिम रेतन, सेवादाता, कुक्कुटपालन व्यवसायिक, शेतकरी, गोपालक, शेळीपालक व्यावसायिकांनी सहभाग नोंदवून लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. पी. पी. नेमाडे यांनी केले आहे. 


कृत्रिम रेतन सेवादाता यांची नोंदणी व नूतनीकरण या योजनेअंतर्गत प्रमाणपत्रधारक पशुसेवक, सेवादाता यांना खाजगीरित्या कृत्रिम रेतनाचे कार्य करण्यासाठी नोंदणी करणे अनिवार्य असून सेवादाता यांनी त्यांचे पशुसंवर्धन व दुग्धव्यवसायाचे प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे. त्यासाठी आधार कार्ड व फोटो इत्यादी कागदपत्रे सोबत जोडणे आवश्यक आहे कुक्कुटपालन प्रक्षेत्राची नोंदणी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व कुक्कुटपालन व्यवसाय करणारे पशुपालक, शेतकरी यांच्याकडे असलेले मांसल पक्षांचे तसेच अंडी देणा-या पक्षांच्या प्रक्षेत्राची नोंदणी करून घेता येईल. या नोंदणीसाठी पशुपालकांनी आपल्या प्रक्षेत्राची संपूर्ण माहिती देणे अपेक्षित आहे.

शेळीपालन, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन प्रशिक्षण कार्यक्रम योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याला मानव विकास योजना, नाविण्यापूर्ण योजना, विशेष घटक योजना, अदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासी उपयोजनेअंतर्गत निवड केलेले लाभार्थी, बचत गटाचे लाभार्थी, सधन कुक्कुटपालन व पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय यांच्यासाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहेत या प्रशिक्षणासाठी सर्व शेतकरी, पशुपालक यांनी प्रशिक्षणाची निवड करुन प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. नेमाडे यांनी केले आहे. 

पशुपालकांच्या जनावरांचा विमा व पशुस्वास्थ दाखला वाटप आदी विविध योजनेअंतर्गत वाटप करण्यात येणा-या पशुपालकाच्या जनावरांचा पशुस्वास्थ दाखला देऊन त्यांचा विमा उतरविण्यात येईल. किसान क्रेडिट कार्ड योजनेंतर्गंत पशुपालनाशी निगडीत असलेल्या शेळीपालन, गायी, म्हशी व कुक्कुटपालन आदी व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत बँकेमार्फत कर्ज उपलब्ध करुन देण्यात येईल, त्यासाठी शेतक-यांची नोंदणी व अर्ज भरुन देणे गरजेचे असल्याचे डॉ. नेमाडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. 

याशिवाय नकुल पशुस्वास्थ कार्ड नोंदणी योजनेअंतर्गत शेतकरी, पशुपालक यांच्यांकडे असलेले गोवंशीय पशुधन गायी, म्हशी, संकरीत जनावरे, बैल यांना स्वतंत्रपणे पशुस्वास्थ कार्ड देण्यात येते. यामध्ये जनावरांचा १२ अंकी ओळख क्रमांक, लसीकरण, कृत्रिम रेतन व आरोग्यविषयक इतर अनुषंगिक बाबींची नोंदणी, तपशिल असलेले पशुस्वास्थ कार्ड शेतक-यांना वाटप करण्यात येणार आहे. या वरील सर्व योजनांची अधिकची माहिती संबंधित तालुक्याच्या पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांच्याकडे असून योजनेसाठी नोंदणी अर्ज तसेच प्रशिक्षणाचे वेळापत्रकाबाबत त्यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ.पी.पी. नेमाडे व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नामदेव आघाव यांनी केले आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या