🌟गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत प्रस्ताव तात्काळ सादर करा - विकास पाटील


🌟प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे आवाहन कृषि आयुक्तालयाचे विस्तार व प्रशिक्षण संचालक विकास पाटील यांनी केले🌟

परभणी (दि.३१ मे २०२३) : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा मृत्यू वा अपघात झालेल्या कुटुंबियांच्या वारसदारांना आर्थिक मदत होण्यासाठी राज्य शासनाच्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत रुपये एक ते दोन लाखांपर्यंत विमा संरक्षण उपलब्ध आहे. अपघातग्रस्तांच्या वारसदारांनी कृषी पर्यवेक्षक किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून विमा प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे आवाहन कृषि आयुक्तालयाचे विस्तार व प्रशिक्षण संचालक विकास पाटील यांनी केले आहे.  

नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी दरड कोसळून, पुराच्या पाण्यात वाहून किंवा अन्य अपघाताने शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचा दुर्दैवी मृत्यू अथवा कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे. या पार्श्वभूमीवर अपघात झालेल्या शेतकऱ्याच्या वारसदाराला विमा प्रस्तावासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे संबंधित विभागांनी प्राधान्याने उपलब्ध करून द्यावीत, जेणेकरून बाधित कुटुंबास विमा संरक्षणाचा लाभ शीघ्रतेने देता येईल. 

विमा प्रस्ताव तयार करण्यासाठी ऑक्झीलियम इन्शुरन्स ब्रोकिंग कंपनीच्या जिल्हा प्रतिनिधींची मदत घेण्याचे आवाहन केले असून, अधिक माहितीसाठी विमा सल्लागार कंपनीच्या १८००२२०८१२ या टोल फ्री क्रमांकावर संर्पक साधावा. अपघातग्रस्त शेतकरी कुटुंबियांच्या वारसदारांनी युनिव्हर्सल सोंपो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या १८००२२४०३० किंवा १८००२००४०३० या टोल फ्री क्रमांकावर पूर्व सूचनेची नोंद करावी, असेही संचालक श्री. पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या