🌟संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळा अंतर्गत केंद्र शासनाच्या योजनेसाठी कर्ज प्रस्ताव दाखल करा....!


🌟असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक श्रीमती एस.व्ही.पराते यांनी केले आहे🌟

परभणी (दि. १९ मे २०२३) : संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत केंद्र शासनाच्या एन.एस.एफ.डी.सी. योजनेसाठी कर्ज प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक श्रीमती एस. व्ही. पराते यांनी केले आहे.

रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ (मर्या) जिल्हा कार्यालय परभणी करिता सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षासाठी नवी दिल्लीच्या योजनांचे भौतिक उदिष्ट प्राप्त झाले असून, मुदती कर्ज योजना ५०, महिला समृद्धी ५८, लघु वित्त ३७, शैक्षणिक कर्ज २० असे उद्दिष्ट प्राप्त आहे. वरील सर्व योजना नवी दिल्लीमार्फत राबविल्या जातात. चांभार समाजातील चांभार, ढोर, मोची, होलार या समाजातील अर्जदारांकडून विविध व्यवसायांसाठी कर्जप्रस्ताव मागवण्यात येत आहेत. या समाजातील लाभ घेऊ इच्छिणा-या अर्जदारांनी यापूर्वी महामंडळाच्या कुठल्याही योजनेचा घेतलेला नसावा. तसेच अर्जदाराने महामंडळाच्या नियमाप्रमाणे आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून कर्ज तीन प्रतीत स्वतः मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहून दाखल करावेत. मध्यस्थामार्फत कर्ज प्रकरणे स्वीकारण्यात येणार नाहीत.

जातीचा दाखला, अर्जदाराच्या कुटुंबाचा चालू वर्षाचा उत्पन्नाचा दाखला, नुकत्याच काढलेल्या पासपोर्ट साईज फोटोच्या तीन प्रती, अर्जदाराचा शैक्षणिक दाखला, रेशन कार्ड झेरॉक्स प्रती, आधार, मतदान, पॅन कार्डचे झेरॉक्स प्रती, व्यवसायाचे दरपत्रक (कोटेशन) जीएसटीसह, व्यवसाय करावयाच्या ठिकाणचा मालकी हक्क पुरावा, नमुना नं. ८, लाईट बिल, टॅक्स पावती, भाडे करारनामा, भाडे करारपावती, मुदती योजनेसाठी प्रकल्प अहवाल, व्यवसायाचे महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत यांचे नाहरकत प्रमाणपत्र, व्यवसायासंबंधी तांत्रिक तसेच अनुभवाचे प्रमाणपत्र, अर्जदाराचे उद्योग आधार, लाभार्थ्यांचा सिबिल क्रेडिट स्कोअर ५०० च्यावर असणार रिपोर्ट, अनुदान न घेतल्याबाबत प्रतिज्ञापत्र ही कागदपत्रे स्वयंसाक्षांकित करून घोषणापत्र देण्यात यावे.

योजनांचा कर्जप्रस्ताव महामंडळाच्या विहित नमुन्यात अर्ज २२ मेपासून ते २२ जूनपर्यंत कार्यालयीन वेळेत सकाळी ९.३० ते संध्याकाळी ६.१५ पर्यंत कार्यालयीन सुट्टी वगळता, बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जायकवाडी वसाहत, कारेगाव रोड, परभणी या ठिकाणी स्विकारले जातील. परभणी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील चांभार, ढोर, मोची, होलार या समाजातील बेरोजगार युवक, युवतींना तसेच होतकरु गरजू अर्जदारांनी जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन श्रीमती पराते यांनी केले आहे.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या