🌟परभणी जिल्ह्यात राज्य शासनाच्या धोरणानुसार लवकरच ११ डेपोवर मिळणार नागरिकांना रेती...!


🌟जिल्ह्यातील पर्यावरण अनुमती प्राप्त २३ रेती घाटाकरिता ११ ठिकाणी डेपो निश्चित🌟

परभणी (दि.०५ मे २०२३) : राज्य शासनाच्या १९ एप्रिल २०२३ रोजीच्या रेती धोरणानुसार जिल्ह्यातील वाळूघाट डेपोची ई-निविदा प्रक्रिया २७ एप्रिल २०२३ पासून सुरु झाली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील पर्यावरण अनुमती प्राप्त २३ रेती घाटाकरिता ११ ठिकाणी डेपो निश्चित करण्यात आले आहेत निश्चित केलेल्या ठिकाणाहून नागरिकांना लवकरच रेती उपलब्ध होणार असल्याचे जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. ओमप्रकाश गोंड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. 

रेतीबाबतची ई-निविदा प्रक्रिया पुर्ण होऊन रेतीघाटांसह डेपोंचा ताबा यशस्वी निविदाधारकास देण्यात येणार असून, त्यानंतर नागरिकांनी मागणी नोंदविल्यानुसार या डेपोवरून रेती उपलब्ध होणार आहे. त्यासाठी नागरिकांनी महाखनिज प्रणालीवर आधार क्रमांकासह नोंदणी करणे आवश्यक आहे. सेतू केंद्रामार्फतही नागरिकांना नोंदणी करता येणार आहे. मागणी नोंदविल्यानंतर १५ दिवसाच्या आत डेपोमधून रेती घेऊन जाणे ग्राहकांवर बंधनकारक असेल. एका कुटुंबास एका वेळी कमाल ५० मेट्रीक टन रेती अनुज्ञेय आहे. त्यानंतर वाढीव रेती हवी असल्यास ती मिळाल्याच्या दिनांकापासून एका महिन्यानंतर रेतीची मागणी करता येईल. यासाठी जिल्ह्यात ११ ठिकाणी डेपो निश्चित करण्यात आले आहेत. घाटातून रेती उत्खनन, रेतीची डेपोपर्यंत वाहतूक, डेपोनिर्मिती, व्यवस्थापन व विक्री करण्यासाठी ई-निविदा www.parbhani.nic.in व https://mahatenders.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. ई-निविदा सादर करण्याची विहित मुदत दिनांक ३ मे २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत होती. विहीत मुदतीत ११ रेती डेपोपैकी केवळ सोनपेठ तालुक्यातील खडका येथील डेपोकरिता तीन ई-निविदा प्राप्त झाल्या आहेत. उर्वरीत १० डेपोसाठी ९ मे रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत ई-निविदा सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी इच्छुक मान्यता प्राप्त संस्था, व्यक्तींना ई-निविदा सादर करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. किमान तीन ई-निविदा प्राप्त मौजे खडका येथील रेतीडेपोची ई-निविदा उघडण्याचा दिनांक पूर्व नियोजित वेळापत्रकानुसार दिनांक ८ मे रोजी दुपारी १२ वाजता असून ई-निविदा उघडल्यानंतर लवकरच डेपो सुरु करण्यात येईल.

याठिकाणी होणार डेपो जिल्ह्यात ११ ठिकाणी रेतीडेपो निश्चित करण्यात आलेले आहेत. मौजे उखळद ता. परभणी, मौजे राजुरा ता. मानवत, मौजे खुपसा ता.सेलू, मौजे गौडगाव ता. गंगाखेड, मौजे लक्ष्मणनगर ता. पुर्णा, मौजे खडका ता. सोनपेठ, शेळगाव ता. सोनपेठ, मौजे बरबडी ता. पालम, मौजे भोगाव ता. पालम, मौजे मानकेश्वर काकडे आणि मौजे वझर ता. जिंतूरचा समावेश असल्याचे जिल्हा खनिकर्म अधिकारी श्री. गौंड यांनी कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या