🌟आकाश निरीक्षण आणि गंमती जंमती दि.०५ मे रोजीचे मनमोहक छायाकल्प चंद्रग्रहण आपणही बघुयाच...!


🌟छायाकल्प चंद्रग्रहण फारसे सुंदर दिसत नसले तरीही आकाश निरीक्षणाच्या दृष्टीने ते फारच महत्वाचे🌟

  _येत्या ५ मे रोजी होणारे एक मनमोहक छायाकल्प चंद्रग्रहण आपल्या भारत देशातूनही बघता येणार आहे, ही भारतीय बांधवासाठी फार मोठी सुवर्णसंधी आहे. हे चंद्रग्रहण आपल्या भारत भूमीतून दिसणारे यावर्षीचे पहिले ग्रहण आहे. या ग्रहणात चंद्र पृथ्वीच्या उपछायेतून जात असल्याने तो किंचितसा अंधुक दिसतो. म्हणून त्यास छायाकल्प चंद्रग्रहण म्हणतात, असे खगोलशास्त्रज्ञ प्रा.सुरेशजी चोपणे  यांनी कळविले आहे. दि.२० एप्रिल २०२३ रोजी अतिशय सुरेख असे हायब्रिड सूर्यग्रहण झाले होते. यावेळचे चंद्रग्रहण हे सर्व शिक्षक, विद्यार्थी, खगोलप्रेमी, आकाशनिरीक्षक बांधव, सामान्य व्यक्तींनी आवर्जून पाहिलेच पाहिजे, असे आकाश निरीक्षण प्रेमी- श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजींचें आवाहन आहे... संपादक._  

     आता या महिन्यात ५ तारखेला होणारे हे छायाकल्प चंद्रग्रहण फारसे सुंदर दिसत नसले तरीही आकाश निरीक्षणाच्या दृष्टीने ते फारच महत्वाचे ठरणारे आहे. छायाकल्प ग्रहण म्हणजे काय? तर खग्रास किंवा खंडग्रास चंद्रग्रहण होताना चंद्र हा पृथ्वीच्या गडद छायेतून जातो. त्यामुळे तो काळा, लालसर दिसतो. मात्र छायाकल्प चंद्रग्रहणात चंद्र काळा, लाल न दिसता तो नियमित पौर्णिमेच्या चंद्रासारखाच परंतु बारकाईने निरीक्षण केल्यास तो थोडा काळपट पडल्यासारखा दिसतो.

  _चंद्र ग्रहणांविषयी सविस्तर माहिती:_ जेव्हा पृथ्वी ही सूर्य व चंद्राच्या मध्ये येते, तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने चंद्रग्रहण दिसते. चंद्रग्रहण ही एक पूर्णतः वैज्ञानिक खगोलीय घटना आहे. चंद्रग्रहण साधारणपणे पौर्णिमेच्या आसपास दिसते. चंद्रग्रहण प्रत्येक पौर्णिमेस लागत नाही, कारण चंद्रकक्षा व क्रांतिवृत समपातळीत नसून त्यांच्या पातळयांमध्ये ५ अंशांचा ९'चा कोन आहे. चंद्रग्रहणे पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्यामुळे दिसतात. सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका रेषेत आणि एका प्रतलात आल्यावर चंद्रग्रहण होते. पृथ्वीपेक्षा सूर्याचा आकार बराच मोठा असल्यामुळे पृथ्वीची अवकाशात गोलाकार मुख्य गडद छाया आणि त्या भोवती फिकट उपछाया अस्तित्वात असते. चंद्राचा पृथ्वीच्या गडद सावलीतून प्रवास झाला, तर खग्रास किंवा खंडग्रास चंद्रग्रहण दिसते. चंद्राचा पृथ्वीच्या गडद सावलीभोवतीच्या फिकट सावलीतून प्रवास झाला, तर छायाकल्प चंद्रग्रहण दिसते. उपछाया चंद्रग्रहणाच्या वेळी पौर्णिमेच्या तेजस्वी चंद्राचा प्रकाश काहीसा मंदावलेला दिसतो. चंद्रावर पृथ्वीची गडद छाया पडणार नसल्यामुळे डोळ्यांना हे ग्रहण विशेष जाणवत नाही. वर्षातील अनेक पौर्णिमांपैकी एखाद-दुसऱ्या पौर्णिमेला चंद्रग्रहण असू शकते. चंद्र ग्रहणात पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. कोणतेही ग्रहण हे छायाकल्प, खंडग्रास किंवा खग्रास असते. जगात जेथे जेथे आकाशात चंद्र असेल तेथे तेथे ते एकाच वेळी दिसते.

    जेव्हा चंद्र, सूर्य आणि पृथ्वी एका सरळरेषेत येतात, तेव्हाच चंद्र वा सूर्यग्रहणे होतात. चंद्रग्रहणाच्या वेळी सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी येते, म्हणून पृथ्वीची सावली  चंद्रावर पडते. पृथ्वीच्या दोन प्रकारच्या सावल्या असतात. त्या म्हणजेच गडद छाया आणि उपछाया. गडद छायेतून चंद्र गेल्यास खग्रास चंद्रग्रहण आणि उपछायेतून तो गेल्यास छायाकल्प चंद्रग्रहण होत असतो. आताचे हे छायाकल्प चंद्रग्रहण हे आशिया, ऑस्ट्रेलिया, युरोप, पूर्व आफ्रिका, पेसिफिक, इंडियन आणि अटलांटिक महासागरातून दिसेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार ८.४४ वा. सुरुवात होईल, ग्रहणमध्य १०.५२ तर ग्रहण समाप्ती १.१० वा. होईल. हा यावर्षीचा पहिलाच ग्रहण असल्याने नागरीकातील उत्सुकताही बघसण्यासारखीच असेल.

* या ग्रहणाचे यशस्वी निरीक्षण असे करता येईल :-

     छायाकल्प चंद्रग्रहणात चंद्र पूर्ण दिसतो. परंतु त्याचे तेज ग्रहणकाळात ४ ते ५ टक्के कमी होते किंवा गडद छायेकडील चंद्रबिंबाचा थोडा भाग किंचित काळपट दिसतो. अधिक बारकाईने पाहिल्यास हा फरक आढळून येईल. अन्यथा नियमित निरीक्षण न करणाऱ्या व्यक्तिंना चंद्रग्रहण लागले आहे, हेच कळत नाही. आकाश निरभ्र असेल तर साध्या डोळ्याने ग्रहण आपल्या घरूनच बघू शकाल. दुर्बिण अथवा द्विनेत्री असल्यास फारच छान! असे खगोलशास्त्रज्ञांचे मत आहे.

१) चंद्र परिभ्रमण करत प्रथम उपछायेत येतो. त्यावेळी चंद्रप्रकाश कमी होतो. यालाच ग्रहणाचे वेध लागले असे म्हणतात.

२) त्यानंतर चंद्र प्रछायेत (दाट छायेत) येतो तेव्हा चंद्राचा भाग झाकाळलेला दिसतो. तेव्हा चंद्रग्रहण लागले असे म्हणतात.

३) कालांतराने चंद्र प्रछायेतून बाहेर पडतो व पुन्हा प्रकाशित होतो. तेव्हा ग्रहण सुटले असे म्हणतात. त्यानंतर काही काळ चंद्र उपछायेत असतो तेव्हा त्याचा प्रकाश कमी असतो.

४) काही वेळाने जेव्हा चंद्र उपछायेतून बाहेर पडतो, तेव्हा पौर्णिमेचा चंद्र नेहमीसारखा प्रकाशमान होतो.

!! छायाकल्प चंद्रग्रहणाच्या सर्वांना आल्हाददायक हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!

 - एक आकाश निरीक्षण प्रेमी -

 श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे, गुरूजी. 

  वंद.राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराज चौकजवळ, 

 रामनगगर, गडचिरोली, फक्त व्हॉट्सॲप- ९४२३७१४८८३.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या