🌟शेतकऱ्यांनो तुमच्यावर आत्महत्येची वेळ आणणाऱ्या भाजपाला निडणुकीतून धडा शिकवा :- नाना पटोले


🌟तुमच्या साथीने आता जिंकेपर्यंत थांबायचे नाही हाच आजचा निर्धार:- उद्धव ठाकरे


🌟हिम्मत असेल तर मुंबई महापालिकेसह सर्व निवडणुका घेऊन दाखवा :- जयंत पाटील

🌟महाविकास आघाडीची विराट वज्रमुठ सभा नागपुरमध्ये संपन्न🌟

✍️मोहन चौकेकर

नागपूर (दि.१७ एप्रिल) - राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून शेतकऱ्यांच्यामागे अवकाळी पाऊस लागला व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले पण हे सरकार शेतकऱ्यांना मदत करत नाही. गारपीट झाली, शेतकरी ढसाढसा रडतोय त्याला मदत देत नाही पण जाहीरातींवर मात्र कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील शिंदे सरकारच्या चुकीच्या धोणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या दहापटिने वाढल्या आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांनी चुकीचे पाऊल टाकू नये असे आवाहन करत आगामी निवडणुकीत भाजपाचा पराभव करून त्यांची जागा दाखवा, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

महाविकास आघाडीची दुसरी वज्रमूठ सभा नागपूरमध्ये पार पडली. यावेळी माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, तेलंगणाचे प्रभारी माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी आशिष दुआ, माजी मंत्री सुनिल केदार, विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर, खासदार संजय राऊत, विनायक राऊत, अरविंद सावंत, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, आदित्य ठाकरे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आदी नेते उपस्थित होते.

नाना पटोले पुढे म्हणाले की, नागपूर हे देशातील सर्वात महागडे शहर आहे, या शहरात जे काही आणले जात आहे ते कर्जाने आणले आहे व नागपूरच्या लोकांना लुटले जात आहे. विकासाच्या नावाखाली लुटण्याचे काम सुरु आहे. ऑऊट सोर्सिंगच्या माध्यमातून सरकारी नोकर भरती करण्याचा निर्णय या सरकारने घेतला आहे. लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रशासन असते पण ऑऊट सोर्सिंगमुळे जनतेला न्याय मिळणार नाही. पुलवामा स्फोटात वापरलेली स्पोटके नागपूरमधून गेली पण त्याचा छडा अद्याप लावला जात नाही. शेतकरी, तरुण, व्यापारी यांना बरबाद करण्याचे व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान संपुष्टात आणण्याचे काम सुरु आहे. नागपूर हा भाजपा बालेकिल्ला नाही तर डॉ. बाबासाहेबांची दिक्षाभुमी आणि ताजुद्दीन बाबांची भूमी आहे. राजकीय स्तरावर विचार केला तर भाजपाचा नागपूर भागातून काँग्रेसने सुपडा साफ केला आहे.

माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले की, देशात लोकशाही आहे की नाही हा प्रश्न उपस्थित होत आहे. सत्तेवर बसलेल्या लोकांच्या मित्रांच्या फायद्यासाठी लोकशाहीचा वापर केला जात आहे. यांच्या मित्रांचे नंबर श्रीमंतीत वर जात आहे तर जनतेचा नंबर मात्र खाली खाली जात आहे.लोकशाहीच्या मार्गाने देश चालण्यासाठी ज्या माणसाने संविधान दिले त्याचे रक्षण आम्ही करु शकत नाही का? घटना बचाव नाही तर घटनेचे रक्षण मीच करणार अशी म्हणण्याची वेळ आली आहे. राज्यातील शिंदे सरकार आल्यापासून शेतकऱ्यांवर संकटा मागून संकटे येत आहेत. राज्यातील सरकार हे अवकाळी सरकार आहे. आमचे सरकार असताना शेतकऱ्यांना तात्काळ मदत केली आता मात्र पंचानाम्याचे करत बसले आहेत.

मी काँग्रेसबरोबर गेलो म्हणजे हिंदुत्व सोडले असा आरोप करता, काँग्रेसवाले हिंदू नाहीत का? आमचे हिंदुत्व शेंडी जाणव्याचे नाही. यांचे हिंदुत्व गोमुत्रधारी आहे. सरसंघटालक मोहन भागवत मशिदीत जाऊन आले, मी मशिदीत जाऊन आले असतो तर किती गोंधळ घातला असता. मशिदीत जाऊन हे कव्वाली गाणार. देशात व राज्यात आज जो कारभार सुरु आहे तो रा. स्व. संघाला मान्य आहे का? 

ही लढाई तुमच्यासाठी सुरु आहे, यात तुमचा सहभाग महत्वाचा आहे, तुमची साथ असेल तर आता जिंकेपर्यंत थांबायचे नाही. धार्मिक मुद्दे पुढे करुन जनतेचे मुद्दे टाळले जात आहेत. लोकशाही मेली नाही मरु देणार नाही असा निर्धार करा व आगामी निवडणुकीत भाजपाला घरी बसवा.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यावेळी म्हणाले की, देशाच्या पंतप्रधानांवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत पण ते कोणत्याच प्रश्नाचे उत्तर देत नाहीत. अदानी राजकीय आशिर्वादानेच देशातील दुसऱ्या नंबरचा श्रीमंत व्यक्ती झाला. अदानी-मोदी संबंधावर भाजपा किंवा मोदींनी अद्याप उत्तर दिले नाही. भाजपाचे वरिष्ठ नेते व माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी अतिशय गंभीर आरोप केले. १४ फेब्रुवारी २०१९ मध्ये ४० जवान शहिद झाले. पण त्यावर सत्यपाल मलिक यांना गप्प बसण्यास सांगितले. ३०० किलो स्फोटके असलेली वाहन फिरत होती, स्फोट झाला आणि ४० जवानांचा मृत्यू झाला याला जबाबदार कोण, याचे उत्तर मिळाले पाहिजे. देशात जे घडत आहे त्याकडे दुर्लक्ष केले तर ते परवडणारे नाही. महाविकास आघाडीची वज्रमूठ भक्कम ठेवून भाजपाला घरी बसवण्याचा निर्धार करा आणि आगामी निवडणुकीत भाजपा व मोदींना घरी बसवा.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की,  नागपूर ही क्रांतीकारकांची भूमी आहे, नागपुरमध्ये जे ठरते त्याचा संदेश देशात जातो. विदर्भातील शेतकऱ्यांची व सामान्य जनतेची वज्रमुठ शिंदे सरकारला विचारत आहे की १० महिन्यात काय दिले? अवकाळी संकटाने झालेली नुकसानभरपाई दिली नही. या सरकारने फक्त सुडाचे राजकारण दिले, विरोधकांना शत्रु मानण्याचे काम सध्या सुरु आहे.जे त्यांच्यासोबत जात नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. या सरकारने मविआ सरकारने घेतलेल्या निर्णयाला स्थगिती देण्याचे काम केले. विरोधी बोलणाऱ्यावर कारवाई करणे हेच या सरकारचे काम आहे. हे बहुजनांचे सरकार नाही. शिंदे सरकार घाबरले आहे म्हणून निवडणुकाही घेत नाही. हिम्मत असेल तर मुंबई महापालिकेसह सर्व निवडणुका घेऊन दाखवा, असे आव्हान पाटील यांनी दिले माजी मंत्री सुनिल केदार, विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड यांनाही यावेळी जनतेला संबोधित केले.........                       

✍️मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या