🌟संतश्रेष्ठ गोरोबाकाका कुंभार स्मृतिदिन विशेष : महती संताची संत गोरोबा काकांची...!


🌟सदर लेख श्रीकृष्णदास (बापू) निरंकारी यांच्या शब्दांत🌟

यातील आख्यायिकेच्या मागे चमत्काराचा भाग असलेला दिसून येतो. संतांच्या चरित्रात असे अनेकविध चैतन्याचे चमत्कार वर्णिलेले आहेत. चमत्काराचे चैतन्य असते. पण बऱ्याचदा समृद्ध समाजाला अशा चमत्कारातून चेतना मिळण्याऐवजी त्यांच्या ठिकाणी अंधश्रद्धा बळावताना दिसते. संतांचे जीवनदर्शन घडविताना सुद्धा केवळ चमत्कार हे त्यांचे साध्य नव्हते तर साधन होते, याचे भान राखावे. म्हणून फक्त तो त्यांच्या जीवनातील एक चमत्काराचा भाग समजावा. फार तर त्याचा सरळ सरळ अर्थ घेणे योग्य नाही. याबाबत असे म्हणता येईल की माधवबुवा धार्मिक व सहिष्णुवृत्तीचे होते. काळेश्वरावर त्यांची निस्सीम श्रद्धा व भक्ती होती. सात मुले एका मागोमाग गेली परंतु आठवा मुलगा गोरोबा जिवंत राहिला. म्हणून माधवबुवांना तो आपल्या श्रध्देचा, भक्तीचा, महिमा वाटला. यावरुन एवढाच तर्क करता येतो किंवा अंदाज बांधता येतो की, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गारोबांचा जन्म झाला आहे. सदर लेख श्रीकृष्णदास (बापू) निरंकारी यांच्या शब्दांत जरूर वाचा... संपादक._

    माधवबुवांना आठ मुले झाली, पण ती जगत नव्हती. त्यांनी आपली सर्व मुले काळेश्वराजवळील स्मशानातील गोरीत पुरली होती. ती सर्व मुले जिवंत कशी झाली? यासंबंधी एक आख्यायिका संत गोरोबा काका चरित्रामध्ये महादेव बाळाजी कुंभार यांनी सांगितली आहे. ते आपल्या चरित्रामध्ये म्हणतात, की श्री माधवबुवा तेर येथील काळेश्वराची उपासना करीत होते. पुढे कालांतराने परमात्मा पांडुरंग ब्राह्मणाचा वेष घेऊन त्यांचे घरी आले. तेव्हा खिन्न मुद्रा पाहून देवाने त्यांना विचारले, की दुःखी का? माधबुवांनी सांगितले, की आपली आठही मुले देवाने नेली. नंतर देवाने आठ मुलांना जेथे मूठमाती दिली, ती जागा दाखविण्यास सागितले. माधवबुवांनी काळेश्वर जवळील स्मशानात नेले व देवास आठही मुले पुरलेली जागा दाखविली. देवाने सर्व मुलांची प्रेते उकरण्यास सांगितली. बुवांनी त्याप्रमाणेच केले. देवाने पाहिले व सात मुलांना आपल्या हाताच्या स्पर्शाने जिवंत करून त्यांना स्वर्गात पाठविले. नंतर आठवा मुलगा जिवंत केला. तोही स्वर्गाच्या मार्गाने निघाला. परंतु देवाने त्यास जाऊ दिले नाही. भगवंताने त्याला आपल्या हातात घेऊन माधवबुवा व रखुमाईच्या स्वाधीन केले. त्यास गोरीतून काढले, म्हणून देवाने त्याचे नाव गोरोबा ठेवले. संतश्रेष्ठ गोरोबाकाका कुंभार हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते. ते संत नामदेव व संत ज्ञानेश्वरांचे समकालीन मानले जातात. तज्ज्ञांच्या मते शा.श. ११८९ अर्थात इ.स.१२६७ साली त्यांचा जन्म झाला असावा. त्यांनी अनेक अंभग लिहिले आहेत. ते विठ्ठलाचे- पांडुरंगाचे मोठे भक्त होते. तेर नगरीत गोरोबांच्या घराण्याची परंपरा धार्मिक  व सदाचारी वृत्तीची होती. तेथील काळेश्वर या ग्रामदैवतांचे त्यांचे घराणे उपासक होते. दोघे नवराबायको कुंभारकाम व काबाडकष्ट करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. सदाचारी, सच्छिल वृत्तीमुळे तेरगावात माधवबुवांना संत म्हणून गावकरी ओळखत होते.

     गोरोबांच्या मनावर बालपणापासूनच भगवद्भक्तीचे संस्कार झाले होते. त्यांना लेखन-वाचन येत होते. संत ज्ञानदेव, संत नामदेव यांच्या पूर्वकाळात पंढरपूर हे शिव उपासकांचे- भक्तांचे केंद्र होते. अनेक शिवभक्त त्याठिकाणी आपली साधना करीत होते. ते भक्त, योगी, सिद्ध व साधकही होते. गोरोबाकाका जेव्हा जेव्हा पंढरपूरला जात, तेंव्हा त्यांना या सिद्ध पुरुषांचे दर्शन होई. त्यांच्या योगसाधनेचे त्यांना कौतुक व आकर्षण वाटे. असे करता करता गोरोबांचा प्रपंच आता परमार्थमय झाला होता. ते सकाळी उठून अंघोळ करून, देवाची पूजा करत. नंतर नामस्मरण करावे, ध्यानात पांडुरंगाचे रूप साठवून त्याला मनी-मानसी मुरवून घ्यावे आणि मग न्याहारी करून कामाला लागावे, असा त्यांचा दिनक्रम असे. दुपारचे जेवण झाल्यावर गोरोबा घराच्या ओसरीवरच्या खांबाला टेकून देवाचे नामस्मरण करीत, अभंग म्हणत विश्रांती घेत. त्यामुळे त्यांच्या चित्ताला समाधान मिळत असे. पुन्हा लगेच मोठ्या जोमाने कामाला लागत. दिवस मावळल्यानंतर हातपाय धुऊन पुन्हा घराच्या ओसरीवर एकतारीवर चिपळ्याच्या साथीने भजन सुरू होई आणि रात्रीच्या जेवण्याचेवेळी ते थांबे. रात्रीचे जेवण झाल्यानंतर पुन्हा भजन सुरु होई. शेजारपाजारची मंडळीही त्यात सामील होत असत. नंतर परमेश्वराचे नामस्मरण करीतच झोपी जात. संतशिरोमणी गोरोबाकाका पायाने चिखल तुडवित असत. त्यांचे सर्व ध्यान पांडुरंगचरणी लागलेले असे. ते जरी संसारात दंग होते; तरी विठ्ठलभक्ती आणि विठ्ठलाचे नामस्मरण हेच त्यांचे जीवन झाले होते. पांडुरंगाच्या नामस्मरणात ते आपली तहानभूक हरपून जात. स्वदेहाचे भानच त्यांना राहत नसे. संत नामदेवजी महाराज गोरोबा काकांच्या या तन्मयवृत्तीबद्दल लिहितात- प्रेमे अंगी सदा वाचे भगवंत। प्रेमळ तो भक्त कुंभार गोरा।। कालवुनी माती तुडवीत गोरा। आठवीत वरा रखुमाईच्या।। प्रेमे अंगी असे झाकुनी नयन। करीत भजन विठोबाचे।।"

    एके दिवशी संत गोरोबाकाका देहभान हरपून अभंग म्हणत माती तुडवीत होते. त्यांचे सर्व ध्यान ईश्वरचरणी लागले होते. अशावेळी त्यांची बायको- संती मुलगा- मकरेंद्राला ठेवून म्हणाली- धनी, बाळावर जरा लक्ष ठेवा. घरी त्याला सांभाळण्यास कोणी नाही. असे सांगून ती पाणी आणण्याकरिता निघून गेली. गोरोबाकाका चिखल तुडवित असताना बाळ रांगत रांगत पित्याकडे गेले अन् ते खेळत खेळत बापाचा पाय धरून उभा राहण्याचा प्रयत्न करू लागले. हसत हसत पित्याच्या पायाला धरता धरता ते चिखलात पडते. गोरोबाकाका डोळे मिटून मन देवस्वरूपी एकाग्र झाले असताना त्या चिखलात त्यांचा एकलुता एक मुलगा पायाखाली आला. ते चिखलासवे मुलालाही तुडवू लागले. त्याचा व्हायचा तो अटळ परिणाम झाला. त्याविषयी संत एकनाथजी महाराज सांगतात- "नेणेवेचि बाळ की हे मृत्तिका। मन गुंतलेले देखा पांडुरंगी।। मृतिकेसम जाहला असे गोळा। बाळ मिसळला मृतिकेत।।" अशाप्रकारे मुलाचे रक्तमांस, हाडे चिखलात मिसळली. मुलाचा प्राण ताबडतोब गेला. मुलाच्या रक्तमांसाने चिखल रंगला. परमेश्वर भक्तीत तन्मय असलेल्या गोरोबांना बाळाचा स्पर्शही जाणवला नाही. संती पाणी घेऊन घरी आली. पण तिला दारात मूल दिसले नाही. पाण्याची एक घागर डोईवर व दुसरी कमरेवर ठेवून ती सगळीकडे बाळाचा शोध घेऊ लागली. पण बाळाचा शोध कुठे लागेना! तिने गोरोबांना विचारले, धनी, आपला बाळ कुठे आहे? परंतु गोरोबांचे लक्ष संतीकडे नव्हतेच, ते परमेश्वराच्या नामस्मरणात दंग होते. संतीने गोरोबांना खूप विचारले पण त्यांना सांगता आले नाही. शेवटी ती मनात दचकली आणि तिची नजर चिखलाकडे गेली. आपला बाळ चिखलात तुडविला गेला आहे, हे तिच्या लक्षात आले. संतीने आक्रोश सुरु केला. बायकोचा आक्रोश कानावर येताच गोरोबा ध्यानावर आले.  संती रागारागाने गोरोबाला बोलू लागली. याचे संत नामदेवजी आपल्या शब्दात वर्णन करतात- "जळो हे भजन तुझे आता। डोळे असोनिया जाहलासी आंधळा। कोठोनी कपाळा पडलासी। कसाबासी तरी काही येती दया।का रे बाळराया तुडविले।" संतीच्या आकांताने मूल आपल्या पायाखाली तुडविलेले गेले आहे, हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांना या गोष्टीचे अत्यंत वाईट वाटले. त्यांच्या अंत:करणाला खूप वेदना झाल्या. हातून झालेली चूक दुरुस्त करता येणारी नव्हती. परंतु संतीने विठ्ठलाविषयी जे अनुद्गार काढले, त्याने ते खवळले. त्यांनी तिला हातातील चिपळ्या फेकून मारल्या आणि चाकाचे दांडके काढून मारायला धावले. त्यावेळी तिने त्यांना विठ्ठलाची आण घातली. मारता मारता ते थबकले. तिचा आकांत सुरूच होता. शेजारपाजारचे पुरुषबायका जमा झाले व गोरोबांना दूषण देऊ लागले. संती तर माझा बाळा कुठे आहे? माझा बाळा कुठे आहे, म्हणून छाती बडवून घेत होती. हा सगळा प्रकार आता त्यांना उमजला अन् गोरोबा संतीला म्हणाले, कारभारणी, माझ्या हातून फार मोठी चूक झाली म्हणून त्यांनी आपल्या बायकोची क्षमा मागितली.

     काही दिवस गोरोबा-संतीचा अबोला चालला, कोणीही कोणाशीच बोलेना चालेना! एके दिवशी संतीने असा विचार केला की, असा अबोला धरून आपला संसार कसा चालणार? संतीला मुलाची आणि मातृत्वाची ओढ होती. उगीच आपण धन्याला विठ्ठलाची आण घातली. त्यामुळेच त्यांनी प्रपंचाविषयी विरक्ती स्विकारली, संसारापासून दूर जाऊ लागले असे तिला वाटू लागले. गोरोबा संसारात उदास राहून परमेश्वरात आणि त्याच्या नामस्मरणात अधिक एकरूप होऊ लागले. गोरोबांची संसाराविषयीची उदासीनता तिला सहन होत नव्हती. एक वंशाचा दिवा गेला, आता वंशाला दुसरा दिवा हवा.  एक वर्ष होऊन गेले तरी त्यांनी संतीच्या अंगाला स्पर्श केला नाही. दुरुनच बोलणे, वागणे सुरू होते. संतीसारखी भावूक मनाची प्रेमळ, संसारी स्त्री हा दुरावा किती दिवस सहन करणार? तिने आपल्या बहिणीलाच सवत करून घेतले. रामी ऊर्फ राणी आणि संत गोरोबाकाका यांचा विवाह आनंदात पार पडला. परंतु गोरोबांनी संतीप्रमाणे रामीलाही स्पर्श केला नाही. तिच्या हितासाठी संतीने एक युक्ती योजिली. संतीने काय करायचे ते रामीला समजावून सांगितले. एका रात्री दोघींनी मिळून त्याप्रमाणे विचार केला आणि गोरोबा दिवसभर नामस्मरण व भजन करून शांतपणे झोली गेले. तेव्हा संती आणि रामी संत गोरोबांच्या दोन्ही बाजूस झोपल्या. संतीने ठरल्याप्रमाणे गोरोबांचा एक हात तर रामीने दुसरा हात उचलून आपापल्या छातीवर ठेवला व दोघीही शांतपणे झोपी गेल्या. पहाटे त्यांना जाग आली, तेव्हा गोरोबा पाप, महापाप... म्हणत झटकन् उठले. अरेरे! घात झाला, आपणच आपल्या हातांनी विठ्ठलाची शपथ मोडली, असे त्यांना वाटले. संत नामदेव महाराजांनी गोरोबांच्या या स्थितीचे वर्णन असे केले- "विठोबाची माझ्या मोडियेली आण। घेऊनिया शस्त्र तोडियले कर। आनंदला फार गोरा तेव्हा।।" संत गोरोबांनी शस्त्र घेऊन आपले दोन्ही हात मनगटापासून तोडून घेतले. गोरोबांच्या या सर्व कृतीतून आपल्या माणसाबद्दलची आत्मीयता आणि भक्ती मार्गावरील अढळ श्रद्धा किती प्रभावी होती, हे स्पष्ट होते.

      संतशिरोमणी गोरोबांनी आपल्या पारंपरिक व्यवसायाचा त्याग केला, संतीने आणि रामीने त्यांचे मोठेपण मान्य केले व त्या दोघी संसार करू लागल्या, पण गोरोबांनी वैराग्यवृत्ती धारण केल्याने घरात धन-धान्याची कमतरता भासू लागली. दोघी चिंतातुर होऊन कसाबसा संसार सावरू लागल्या. मात्र शेवटी भक्ताच्या संसाराची काळजी परमेश्वरालाच असते नाही का?कुंभारवेशात देव त्यांच्या घरी काम करू लागले. नानाप्रकारची मडकी घडू लागले. प्रेमाने भक्ताच्या घरी काम करु लागले (भाविकांनी ही मूळ कथा ब्रह्म-वैवर्त्य पुराणात पहावी.) गरुड माती वाही. विठ्ठल चिखल तुडवी. रुक्मिणी पाणी भरी अन् विठ्ठल चाकावर नाना प्रकारची गाडगी-मडकी तयार करु लागले. भगवंत विठ्ठल आपल्या भक्ताच्या नानाप्रकारची कलाकुसरीची मडकी तयार करु लागला आणि ती गाडगी मडकी जाळ्यामध्ये बांधून विठ्ठल आणि रुक्मिणी आसपासच्या गावी बाजारात विकू लागले. विठ्ठलाने कुंभारवेषात तयार केलेली मडकी घेण्यासाठी आसपासच्या गावातील व तेरमधील स्त्रिया येऊ लागल्या. स्त्रिया विठ्ठलरुपी कुंभाराचे कौतुक करू लागल्या.  संतश्रेष्ठ गोरोबाकाका यांनी भक्ती आणि नामस्मरण या साधनांच्याद्वारे करणी करेल तो नरका नारायण होईल म्हणजेच “विठ्ठल भक्तच विठ्ठल होऊन गेले" अशी ही पंढरीच्या पांडुरंगाची किमया त्यांनी सर्वांना पटवून दिली. संत गोरोबा संत-मंडळात वडील होतेच इतकेच नव्हे तर महाभागवतानाही आदरणीय, वंदनीय होते. संत गोरोबा विरागी पुरुष होते. अनंत, निर्गुण, निराकार अंश परब्रह्माचे लौकिक रुप म्हणजे “गोरोबा" म्हणून सर्व संत त्यांना "काका" उपाधी बहाल करतात. पंढरीच्या पांडुरंगाचे नाम महात्म्य सांगताना संत गोरोबा म्हणतात- ”तूझे रुप चित्ती राहो।मुखी तुझे नाम। देह प्रपंचाचा दास। सुखे करो काम।। देहधारी जो तो त्याचे। विहीत नित्यकर्म।। तुझ्या परी वाहिला मी। देहभाव सारा।। उडे अंतराळी आत्मा सोडुनी पसारा।। नाम तुझे गोरा। होऊनि निष्काम।।"

     संत गोरोबा संसारात राहत होते. तरीही त्यांची पांडुरंग चरणी एकनिष्ठा होती- “कासयासी बहु घालिसी मळण। तुज येणेविण काय काज। एकपणे एक एकपणे एक। एकाचे अनेक विस्तारले।।" हा त्यांचा पारमार्थिक भाव होता. त्यांनी भागवत धर्माची प्रतिज्ञा भक्तीचा प्रचार व प्रसार करणे. त्यांनी स्वतःचा पारंपारिक कुंभार व्यवसाय करीत संसारही केला आणि संतपणाही सांभाळीत भागवत धर्माची प्रतिज्ञा पार पाडली. भागवत धर्माच्या या प्रतिज्ञेशिवाय पंढरीचा वारकरी मनुष्यच ठरत नाही. जो उगवला दिवस देवाला स्मरुन सार्थकी लावतो तोच वारकरी ठरतो. मग तो आपल्या घरीदारी, नियत कर्तव्यकर्मात, अरण्यात, डोंगर दऱ्याखोऱ्यात कोठेही असो. जे स्वार्थनिष्ठ, लोभी ते वारकरी संत नाहीत. संत शिरोमणी गोरोबाकाका यांची अभंग संख्या कमी असली तरी अभंगवाणीत आढळणारी उत्कटता, भावसमृद्धी यामुळे संतमेळ्यातील त्यांची अभंगरचना त्यांच्या कर्तृत्वाची ग्वाही देणारी आहे. इतकेच नव्हे तर त्यांचे अभंग त्यांच्या जीवनाशी निगडीत आहेत. त्यांच्या अभंगवाणीतून साक्षात्कार, आत्मसाक्षात्कार, उत्कट भक्तीचा अनुभव, अनुभवाची संपन्नता, पवित्र आणि समृध्द असा ज्ञानानुभूतीचा प्रत्यय ही त्यांच्या अभंगवाणीतून प्रत्ययास येतो. अद्वैताचा हा अवर्णनीय आनंद आपल्या दरिद्री प्रपंचात राहूनच त्यांनी प्राप्त केला आहे. अभेदाचे बौध्दिक ज्ञान वेगळे, हे सुखाचे सुख, हे भाग्याचे सौभाग्य, हा अत्यानंदाचा आनंदकंद, गोरोबाकाका आपल्या भक्तिभाव बळावर मिळवू शकले. "मौनं सर्वार्थ साधनम्" असे ब्रीद उरी बाळगणाऱ्या शीलवान कर्मयोग्यास अवघे पन्नास वर्षाचे आयुष्यमान लाभले होते. संत गोरोबाकाकांनी अनंत काळाला आपल्या जीवनचरित्राचा आणि कार्याचा, कर्तृत्वाचा जो आदर्श निर्माण केला होता तो इतिहासाला कदापिही विसरता येणार नाही. नामाचा गजर करुन दि.२० एप्रिल १३१७- शके १२६७ साली कृष्णपक्ष त्रैयोदशीस दुपारच्या समयी तेर येथे गोरोबाकाकांनी  समाधी घेतली. अशारितीने संत गोरोबाकाका यांचे व्यक्तिमत्व, जीवन चरित्र अलौकिक असेच होते. ते परग्रह्म होऊन जीवनमुक्तांचे जीवन जगले.

!! जंग ऐ अजित न्युज परिवारातर्फे संतश्रेष्ठ गोरोबा काकांना पावन स्मृतिदिनी विनम्र अभिवादन !!

 श्रीकृष्णदास (बापू) निरंकारी.

 द्वारा- श्रीगुरुदेव प्रार्थना मंदिराजवळ,रामनगर. 

गडचिरोली, मो. ७७७५०४१०८६.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या