🌟नवी मुंबईतील खारघर घटनेबद्दल अधिवेशन बोलवा....!


🌟काँग्रेस आमदार अमर राजूरकर यांची पत्रकार परिषद🌟

परभणी(दि.24 एप्रिल) : नवी मुंबईतील खारघर येथील राज्य सरकारच्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमातील 14 श्रीसदस्यांच्या मृत्यू प्रकरणात राज्य सरकारने तातडीने विधीमंडळाचे अधिवेशन बोलावून बेजबाबदार व नियोजनशून्य कारभाराबद्दल चर्चा करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार अमर राजूरकर यांनी केली.


             येथील जिल्हा काँग्रेस कमिटीच्या शनिवार बाजारातील काँग्रेस भवनात सोमवार दि.24 एप्रिल रोजी दुपारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी  प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख, प्रा. रामभाऊ घाटगे, माजी उपमहापौर भगवानराव वाघमारे, महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष मलेका गफार, शहराध्यक्षा खानम दुर्राणी, तालुकाध्यक्ष पंजाबराव देशमुख, माजी नगराध्यक्ष बंडू पाचलिंग, गफार अहमद खान, नानासाहेब राउत, सचिन आंबिलवादे, अमोल जाधव, बाळासाहेब फुलारी, सय्यद लाला हाश्मी, सुहास पंडीत यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी आमदार राजूरकर यांनी खारगर प्रकरणात प्रसार माध्यमात येत असलेल्या बातम्या पाहता हे मृत्यू उष्माघाताने झाले की चेंगराचेंगरीने हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. हा सदोष मनुष्यवधाचा प्रकार असून शिंदे-फडणवीस सरकार या घटनेतील सत्य लपवत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी या घटनेची नैतिक जबाबदारी स्विकारून तात्काळ राजीनामे द्यावेत आणि सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून विधीमंडळाचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे अशी मागणी आमदार राजुरकर यांनी केली.

            सरकार सत्य  परिस्थिती दडवत असून सरकारच्या नाकर्तेपणामुळे ही घटना झाली असल्याचा आरोप करीत सरकारने या घटनेची सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी या करिता काँग्रेस पक्षातर्फे सोमवारी (दि.24) राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पत्रकार परिषद घेण्यात येत आहे, असे ते म्हणाले.

             ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना मानणारे जवळपास 20 लाख श्रीसदस्य राज्यभरातून या कार्यक्रमासाठी आले होते. हा सोहळा राज्य सरकारने आयोजित केला होता. तसेच यासाठी तब्बल 13 कोटी रुपये सरकारी तिजोरीतून खर्च केले गेले. एवढा मोठा खर्च करुनही श्रीसदस्यांसाठी मंडपही घालण्यात आला नाही, त्यांना कडक उन्हात तासन तास बसावे लागले, या लोकांना पिण्याचे पाणीही मिळू शकले नाही.  यातील आणखी धक्कादायक बाब म्हणजे उष्माघाताबरोबर चेंगराचेंगरी झाल्याच्या बातम्याही विविध प्रसार माध्यमातून येत आहेत, हा प्रकार अत्यंत गंभीर आहे, अशी खंत व्यक्त केली......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या