🌟शिक्षण क्षेत्रामध्ये धर्म आणि राजकारणाचा शिरकाव हा लोकशाही पुढील धोका आहे - प्रा.डॉ.प्रकाश भांगे


🌟स्वा.सै.पवार महाविद्यालयात भाररत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात ते म्हणाले🌟

पूर्णा (दि.१७ एप्रिल) - आज वर्तमानामध्ये शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात धर्म आणि राजकारणाचा शिरकाव मोठ्या प्रमाणात होतोय हा लोकशाही पुढील फार मोठा धोका असल्याचे प्रतिपादन प्रा. डॉ. प्रकाश भांगे यांनी केले. 

ते येथील स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या व्याख्यान कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जीवनात ज्ञानाला आणि शिक्षणाला फार महत्त्व दिले. परंतु आज शिक्षणाचे खाजगीकरण करून शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य माणसाला शिक्षणाच्या प्रवाहातून दूर ठेवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न शासन व्यवस्थेकडून केला जात आहे. शिक्षण म्हणजे सामर्थ्याची, क्षमतेची व धैर्याची जाणीव करून देणे. आज मात्र क्षमताहीन विद्यार्थी  घडविले जातील असेच शिक्षण दिले जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रज्ञा, शील, करुणा सोबतच स्वाभिमानाला महत्त्व दिले होते हे मानवी मूल्यांचे विचार आजच्या विद्यार्थ्यांनी अंगीकारले तरच ते समाजाला दिशा देऊ शकतील. आज जगाला हिंसेची गरज नसून ज्ञानाची व शांतीची गरज असल्याचेही त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले. याप्रसंगी प्रा. नंदा चारलवाड यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शूद्र  अतिशूद्र आणि स्त्रियांच्या उध्दाराचे अनेक कायदे करून भारतीय स्त्रियांना सन्मानाचे जीवन  दिले. सतीप्रथा, जरठविवाह, बालविवाह, हुंडाबंदी     अशा स्त्रियांना अवमानित करणार्‍या प्रथा कायद्याने बंद केल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान सर्व भारतीयांच्या उद्धाराचे होते ते एका जातीत बांधून ठेवणे हे कृतघ्नपणाचे लक्षण असल्याचेही त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले. तर यावेळी प्रा. डॉ. विजय भोपाळे यांनी आपल्या मनोगतात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्थशास्त्रीय विचारावर प्रकाश टाकला .

या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप प्रभारी प्राचार्य डॉ. संतोष कुऱ्हे यांनी  केला तर प्रास्ताविक विद्यार्थी विकास विभागाचे प्रा. डॉ. प्रकाश सूर्यवंशी यांनी मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. संजय कसाब यांनी केले तर आभार प्रा. डॉ. पी. डी. सूर्यवंशी यांनी मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या