🌟परभणी जिल्ह्यात ३९ केंद्रांवर ८ हजार ४९ उमेदवारांनी दिली परीक्षा....!


🌟२ हजार २४२ परीक्षार्थी अनुपस्थित🌟 

परभणी (दि. ३० एप्रिल) :- अराजपत्रित गट ब व क पदासाठीची सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा आज रविवारी जिल्ह्यातील ३९ परीक्षा केंद्रावर पार पडली. या परीक्षेला १० हजार २९१ उमेदवारांनी अर्ज भरले होते. त्यापैकी ८ हजार ४९ परीक्षार्थींनी परीक्षा दिली. तर २ हजार २४२ परीक्षार्थी अनुपस्थित होते. 

अराजपत्रित गट ब व क पदासाठीची सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेसाठी आज जिल्ह्यातील ३९ परीक्षा केंद्रावर जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनात महसूल व पोलीस प्रशासनाकडून योग्य समन्वय ठेवून नियोजन करण्यात आले होते. 

या सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेला जिल्ह्यातील १० हजारावर उमेदवारांची बैठक व्यवस्था करण्यात आली होती. त्यापैकी परभणी तालुक्यातील ३१ आणि सेलू तालुक्यातील ८ उपकेंद्रावर उमेदवारांची बैठकव्यवस्था तयार करण्यात आली होती. 

जिल्ह्यात आज रविवारी पार पडलेल्या या परीक्षेसाठी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांची जिल्हा केंद्र प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी श्रीमती गोयल यांनी नियुक्ती केली होती. त्यांच्यासह दहा समन्वय अधिकारी, दोन भरारी पथके, ३९ उपकेंद्रप्रमुख, १५७ पर्यवेक्षक, ४७३ समवेक्षक, ८१ सहायक कर्मचारी आणि ७८ शिपाई नियुक्त करण्यात आले होते. 

परीक्षा केंद्रावर गैरप्रकार टाळण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ मधील प्राप्त अधिकाराचा वापर करून १०० मीटर परिसरातील सर्व टेलीफोन, एसटीडी, भ्रमणध्वनी, आयएसडी, फॅक्स केंद्र, झेरॉक्स केंद्र व ध्वनिक्षेपक बंद ठेवण्यात आले होते. तसेच प्रत्येक केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्तही होता. ही परीक्षा सकाळी ११ ते १२ वाजे दरम्यान आयोजित करण्यात आली होती.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या