🌟इंटरनेटचा योग्य वापरच सायबर क्राईम पासून समाजाला वाचवू शकतो - आश्रोबा घाटे सहाय्यक पोलीस निरीक्षक


🌟स्वा.सै.सुर्यभानजी पवार महाविद्यालयात 'महिला लैंगिक छळ प्रतिबंधक समितीद्वारा आयोजित कार्यक्रमात ते म्हणाले🌟

पुर्णा (दि.०८ मार्च) - मोबाईल हाताळताना लोकांनी इंटरनेटचा वापर योग्य पध्दतीने केला तरच सायबरक्राईम पासून समाज वाचू शकतो असे प्रतिपादन पुर्णा पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आश्रुबा घाटे यांनी केले पुर्णेतील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात 'महिला लैंगिक छळ प्रतिबंधक समितीच्या' वतीने आयोजित केलेल्या महिला दिनाच्या कार्यक्रमात श्री.घाटे हे प्रमुख म्हणून मार्गदर्शक म्हणून बोलत होते. 


 या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ.रामेश्वर पवार हे होते .पुढे बोलताना घाटे म्हणाले की, सायबर क्राईमच्या माध्यमातून लैंगिक अत्याचार, डाटा चोरी, ईमेल, फिशिंग, हॅकिंग, पायरसी द्वारे ब्लॅकमेल करणे, चॅटिंग, हॅकिंग करणे, मेसेज टाकणे, खोटी माहिती देवून फसवणे, कौटुंबिक फोटोचा गैरवापर करणे आदी गुन्हे सायबर क्राईमद्वारे केले जातात. हे सर्व टाळायचे असेल तर वेबसाईटचा योग्य वापर करणे हाच त्यावर उपाय असून विशेषतः विद्यार्थ्यांनी यापासून सावध राहिले पाहिजे. चांगला वापर करून चांगले ज्ञान घेणे यासाठी ते चांगले आहे पण वाईट वापर झाला तर ते अंगलट येऊ शकते असे ते आपल्या मार्गदर्शनात म्हणाले . या प्रसंगी महाविद्यालयातील महिला लैंगिक छळ प्रतिबंधक समितीच्या' बहिस्थ सदस्य स्मिता कदम यांनी महिला दिनाच्या निमित्ताने आपले मनोगत व्यक्त केले तर महाविद्यालयातील गृहविज्ञान विभागप्रमुख तथा विद्या परिषद सदस्य प्रोफेसर डॉ. सुरेखा भोसले आपल्या मार्गदर्शनात म्हणाल्या की, महिलांनी काळानुसार बदलले पाहिजे तसेच महिलांचा विकास हाच कुटुंबाच्या व समाजाच्या विकासाबरोबरच देशाचा विकास होत असतो म्हणून पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा कमी करून आत्मसन्मानाने जगण्याचा प्रयत्न महिलांनी केला पाहिजे. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपप्रसंगी प्राचार्य प्रोफेसर डॉ. रामेश्वर पवार म्हणाले की, आजच्या महिलांनी स्वतःच्या क्षमता ओळखून परिश्रम घेतले तर निश्चितच प्रत्येक क्षेत्रात महिला यशस्वी होऊ शकतात. स्री पुरुष असा भेद न मानता पुरुषांनीही महिलांचा योग्य सन्मान केला पाहिजे या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शारदा बंडे यांनी मांडले. सूत्रसंचालन डॉ. दीपमाला पाटोदे यांनी केले तर आभार प्रा.वैशाली लोणे यांनी केले .या कार्यक्रमाची सुरुवात प्रा. सुजाता घन यांच्या स्वागत गीताने झाली. इंग्रजी विभागाच्या वतीने काढण्यात आलेल्या भितीपत्रकाचे विमोचन  मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थिनींचा गुलाब पुष्प देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी   प्रा.डॉ.शारदा बंडे, प्रा.डॉ.भारत चापके, डॉ. दीपमाला पाटोदे, प्रा. वैशाली लोणे, महाविद्यालयातील  विद्यार्थिनींनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या