🌟परभणीकर रसिकांचा ’संगीत संत तुकाराम’ नाटकाला उस्फुर्त प्रतिसाद....!


🌟श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात शुक्रवार दि.२४ मार्च २०२३ रोजी नाट्य रसिकांच्या उस्फुर्त प्रतिसादाने पार पडले🌟

परभणी (दि.२५ मार्च) - सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य आयोजित आणि यशवंतराव चव्हाण सेंटर, शाखा परभणीच्या सहकार्याने अत्यंत वस्तुनिष्ठ विश्लेषणात्मक नाटकाचा अनुभव परभणीकर रसिकांनी अनुभवला.मनोहर नरे संस्थापित,ओम नाट्य गंधा निर्मित धमाल विनोदी प्रासादिक नाटक’संगीत संत तुकाराम’ परभणी येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात शुक्रवार दि.२४ मार्च २०२३ रोजी नाट्य रसिकांच्या उस्फुर्त प्रतिसादाने पार पडले.

नाट्यकर्मी ज्ञानेश महाराव आणि सर्व कलावंतांचे स्वागत केंद्राचे अध्यक्ष विलास पानखडे, सचिव विजय कान्हेकर, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक डॉ. आसाराम लोमटे, कॉम्रेड कीर्ती कुमार बुरांडे, सुमंत वाघ, गयाबाई भालेराव आणि अरुण चव्हाळ यांनी पुस्तक आणि गुलाब पुष्प भेट देऊन केले.

 मराठीतील हे पहिले खरे नाटक आहे. गेल्या सोळा वर्षांपासून या नाटकाचे प्रयोग महाराष्ट्रात रसिकांच्या उपस्थितीत भरभरून पावलेले आहेत आणि पावत आहेत. तुकाराम महाराजांचे अमीट’अभंग’, शाश्वत जीवन सत्य दर्शन, आवलीचे पत्नी म्हणून वस्तुनिष्ठ जगणे आणि परोपकारी तुकारामांची जीवन वृत्ती क्षणोक्षणी नाटक पाहताना जाणवते.

🌟या नाटकाविषयी :-

मंबाजी आणि तुंबाजी हे दोन्ही पात्र नाट्य आणि हास्य साकारतात. प्रबोधनकार तुकाराम आणि शिवाजींना’छत्रपती’पदवी देणारे तुकाराम, निर्मोही पणाने जगणारे तुकाराम जगापुढे आणण्यात हे नाटक महत्त्वाची भूमिका बजावते. तुकाराम आणि शिवाजी राजे यांच्या भेटीचा प्रसंग अविस्मरणीय आहे. संसाराची आसक्ती आवलीची आहे तर अपेक्षा विरहित जगणे तुकारामांचे आहे. आणि यातीलच द्वंद्व नाटक साकारते. अभ्यासू दाखले आणि वर्णन, समकालीन घटना आणि आजच्या वर्तमान काळातील संदर्भ यांचा गोफ पाहायला मिळतो. सुश्राव्य अभंग वाणी, खटकेदार संवाद, अप्रतिम सादरीकरण नाटकात रंग भरते. नाटकाचे नेपथ्य आणि संगीत अप्रतिम आहे. या नाटकाचे लेखक बाबाजीराव राणे, दिग्दर्शक संतोष पवार, संगीतकार डॉ. राम पंडित, निर्माता ज्ञानेश महाराव आणि सूत्रधार उदय तांगडी आहेत. तर नाट्यकर्मी ज्ञानेश महाराव, लीना पाळेकर, भाग्यश्री जोईल, श्रद्धा मोहिते, कुशल कोळी, मयुरेश कोटकर, सुजीत मेस्त्री, देव कांगणे, विक्रांत आजगावकर यांनी कलेत जीव ओतलेला आहे. वादक म्हणून संदीप पवार, सागर मेस्त्री यांनी बाजू सांभाळलेली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या