🌟जालना-नांदेड या समृध्दी महामार्गाच्या भूसंपादनाच्या दृष्टीने कारवाई सुरु....!


🌟अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे🌟

परभणी (दि.०२ मार्च) : जालना ते नांदेड या समृध्दी महामार्गाच्या भूसंपादनाच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून कारवाई सुरु असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

             राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार बाबाजानी दुर्राणी, शशीकांत शिंदे व अमोल मिटकरी यांनी तारांकित प्रश्‍नाद्वारे विधान परिषदेचे या विषयाकडे लक्ष वेधले. जालना ते नांदेड समृध्दी महामार्ग उभारणीचा निर्णय झाल्यानंतर जालना, परतूर, मंठा, सेलू, जिंतूर, परभणी, पूर्णा व नांदेड या तालुक्यातील जमीनी या प्रकल्पासाठी संपादित करण्याकरीता संयुक्त मोहिमेची कामे प्रगतीपथावर होती. भूसंपादनाचा मोबदला अदा करण्याच्या दृष्टीने पुढे कारवाई सुरु झाली नाही. जानेवारी २०२३ मध्ये या संदर्भातील कारवाई संथ असल्याचे निदर्शनास आले आहे,असे या आमदार महोदायांनी म्हटले.

            त्यास उत्तर देतेवेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी, सद्यस्थितीत संयुक्त मोजणी पूर्ण केली असून महाराष्ट्र महामार्ग अधिनियम कलम १८ (१) अन्वये अधिसूचना प्रसिध्द झाली आहे. भूसंपादनाचा मोबदला देण्याच्या दृष्टीने पुढील कारवाई सुरू आहे. ३१ नोव्हेंबर २०२२ रोजी तालुकानिहाय अंतीम अधिसूचना राजपत्रात प्रसिध्द केल्या आहेत. संबंधित तालुक्यांच्या उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी यांच्यामार्फत निवाडा घोषित करण्याच्या अनुषंगाने व जमीन निगडीत घटकांच्या मूल्यांकनाचे काम प्रगतीपथावर आहे. त्यामुळे आजपर्यंत सदर प्रकल्पाच्या आखणीत समाविष्ट जमीनीच्या भूसंपादनासाठी भूधारकांना कोणत्याही प्रकारचा मोबदला वितरीत करण्यात आलेला नाही, असे शिंदे यांनी स्पष्ट करीत हे काम जलदगतीने पूर्ण केले जाईल, असे आश्‍वासित केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या