🌟बालविवाह रोखण्यासाठी समाजाची मानसिकता बदलणे गरजेचे - श्रीमती रुपाली चाकणकर


🌟‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमांतर्गंत जनसुनावणी कार्यवाहीचे अहवाल १५ दिवसांत सादर करण्याचे आदेश🌟 

🌟बदल न जाणवल्यास महिला आयोगाकडे तक्रार करा🌟


परभणी, दि. ३ (जिमाका) : बालविवाह रोखण्यासाठी कठोर कायदे तयार करण्यात आले आहेत. मात्र तरीही बालविवाह होत आहेत. ही खरोखर चिंतनीय बाब असून, समाजाने यासाठी जागरुक होणे आवश्यक आहे. 

मुलींचे उज्ज्वल भविष्य आणि निरोगी आरोग्यासाठी समाजाने आपली मानसिकता बदलणे गरजेचे आहे. विशेषत: पालकांनीच बालविवाहासाठी पुढाकार घेऊ नये, असे आवाहन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात आज ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत जनसुनावणी घेण्यात आली. त्याप्रसंगी श्रीमती चाकणकर बोलत होत्या व्यासपीठावर महिला आयोगाच्या सदस्या संगीता चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर., प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कैलास तिडके उपस्थित होते.


शहरी  व ग्रामीण तसेच दुर्गम भागातील महिलांना मुंबई येथील महिला आयोगाच्या कार्यालयात येऊन तक्रार करणे, सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणे आर्थिकदृष्ट्या तसेच इतर कारणांमुळे शक्य होत नसल्यामुळे ‘महिला आयोग आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. आतापर्यंत वीसपेक्षा जास्त जिल्ह्यात हा उपक्रम राबविण्यात आला आहे. जागेवर महिलांच्या तक्रारी सोडवण्याचा प्रयत्न या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात येतो. महिलांच्या अनेक तक्रारी असतात. कौटुंबिक हिंसाचार, लैंगिक अत्याचार, बालविवाह, हुंड्यासाठी छळ अशा अनेक समस्या सुनावणीतून समोर येत आहे, असेही श्रीमती चाकणकर यांनी सांगितले.

बालविवाहासारख्या अनिष्ट प्रथेला खरेतर पालकच जबाबदार असतात. वयाच्या १८ वर्षापूर्वी मुलीचे लग्न करू नये, कारण ती शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम झालेली नसते. तिच्या लग्नासाठी हुंडाही दिला जातो. हुंडा देणे कायद्याने गुन्हा आहे. हुंड्याचा हाच पैसा मुलीच्या शिक्षणासाठी उपयोगात आणल्यास मुलगी खऱ्या अर्थाने स्वावलंबी होईल. तसेच मुलींवर अत्याचारही होणार नाहीत. बालविवाह होऊ नये यासाठी समाजाने मानसिकता बदलणे खूप गरजेचे आहे. महिला आयोग तुमच्यासाठीच आहे. पीडितांना न्याय देण्याची आयोगाची भूमिका आहे. यासाठीच ‘महिला आयोग आपल्या दारी’ हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीमध्ये आज जनसुनावणी घेण्यात आली.  आयोगाच्या सदस्यांचा समावेश असलेल्या तीन पॅनलने उपस्थित महिलांच्या समस्या व त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. पॅनलमध्ये संरक्षण अधिकारी, वकील व समुपदेशन अधिकारीही होते. एकूण १०४ तक्रारी जनसुनावणीत प्राप्त झाल्या.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलनाने जनसुनावणीस सुरुवात झाली. प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी त्यांना ‘बालविवाहमुक्त परभणी’ मोहिमेचे स्मृतिचिन्ह भेट देऊन स्वागत केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या