🌟महानुभवांचे पंथाचे साहित्य मराठी भाषेचा गौरव वाढविणारे आहे - डॉ. विजय भोपाळे


🌟मराठी भाषा गौरव दिना निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलतांना ते म्हणाले🌟

पूर्णा (दि.२७ फेब्रुवारी) प्रतिनिधी -  महानुभव पंथाचे साहित्य हे  मराठी भाषेचा गौरव वाढविणारे पहिले सार्वजनिक साहित्य  असल्याचे  प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडचे अधिसभा सदस्य तथा अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ. विजय भोपाळे यांनी केले. ते येथील स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयाच्या मराठी भाषा वाङमय विभागातर्फे घेण्यात आलेल्या ' मराठी भाषा गौरव दिनाच्या ' कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संतोष कुऱ्हे हे होते. डॉ. भोपाळे पुढे बोलताना म्हणाले की, व्यवहारात अनेक भाषेचे ज्ञान घेतले तरी चालते परंतु घराघरात मराठी भाषेचा वापर झालाच पाहिजे तरच मराठी भाषा टिकेल.


याप्रसंगी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या विद्या परिषद सदस्य तथा गृहविज्ञान विभागप्रमुख डॉ. सुरेखा भोसले यांनी मातृभाषा मराठी विषयाचे महत्व अनेक उदाहरणासह पटवून दिले. आपली भाषा शिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी शब्दसंग्रह वाढविला पाहिजे. तसेच अनेक उत्तम दर्जाची पुस्तके वाचली पाहिजे व आपली भाषा कशी समृद्ध होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत असे सांगितले. या कार्यक्रमाचे संयोजक प्राध्यापक डॉ. संजय कसाब यांनी आपल्या प्रास्ताविकात मराठी  भाषेची पूर्वपिठिका व  वर्तमानात मराठीचे वास्तव यावर भाष्य केले. अध्यक्षीय समारोपप्रसंगी प्रभारी प्राचार्य डॉ. संतोष कुऱ्हे यांनी मराठी भाषा ही समृद्ध असून तिचे वैश्विकरण झाले आहे. अनेक प्रांतात मराठी बोलली जात असून यापुढे मराठी भाषेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञान आले तर मराठी भाषेची व्याप्ती आपोआप वाढेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. प्रभाकर किर्तनकार यांनी केले तर आभार प्रा . वैशाली लोणे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील  प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  कार्यक्रमाचे संयोजक मराठी विभागाचे प्राध्यापक डॉ. संजय कसाब व मराठी विभागाच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या