💥विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास मातृभाषेतूनच शक्य - डॉ.भगवानराव ठोंबरे


💥उंदरी येथील ज्ञानराज विद्यालयात आयोजित केलेल्या विद्यार्थी-पालक-शिक्षक मेळाव्यात बोलतांना ते म्हणाले💥


केज (दि.१६ फेब्रुवारी) - मुलांचा जर बौद्धिक, भावनिक व सामाजिक तसेच व्यक्तिमत्व विकास अर्थातच सर्वांगीण विकास वृद्धिंगत करायचा असेल तर, त्यांना मातृभाषेतूनच शिक्षण दिले पाहिजे जेणेकरून त्यांचा विकास अधिक चांगल्या प्रकारे साधला जाईल असे प्रतिपादन किल्ले धारूर येथील प्रख्यात डॉक्टर भगवानराव ठोंबरे यांनी केले. ते उंदरी येथील ज्ञानराज विद्यालयात आयोजित केलेल्या विद्यार्थी- पालक -शिक्षक मेळाव्यास संबोधित करताना बोलत होते. यावेळी डॉ.भगवानराव ठोंबरे पुढे बोलताना म्हणाले की, हल्ली प्रत्येक लहान-मोठ्या शहरांमध्ये इंग्रजी माध्यमांच्या शाळांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या शाळांमधून विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेचे ज्ञान तर अवगत होईल परंतु इतर विषयातील मूलभूत आकलन व संकल्पना व्यवस्थित समजायच्या असतील तर मातृभाषेला पर्याय नाही कारण मातृभाषा ही हृदयाची भाषा असते. मराठी भाषा व शाळा वाचवायच्या असतील आणि आपली संस्कृती टिकवायची असेल तर आपण सर्वांनी आपली मुले मराठी माध्यमांच्या शाळांमधून शिकवली पाहिजेत असे आवाहन त्यांनी केले.


             याप्रसंगी उंदरीचे भूमिपुत्र व लातूर येथील कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी केलेल्या कृषि क्षेत्रातील शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्याबरोबरच निसर्ग, पर्यावरण व वृक्ष संवर्धन या विविध पातळीवर केलेल्या भरीव कार्याची दखल घेऊन त्यांना हल्लीच "प्रभावती नागरी गौरव पुरस्काराने"  सन्मानित करण्यात आले आहे. त्याबद्दल विद्यार्थी -पालक -शिक्षक मेळाव्याचे औचित्य राखून त्यांचा ज्ञानराज विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना डॉ. बाबासाहेब ठोंबरे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी देशहित व सामाजिक बांधिलकी बरोबरच आई-वडील, गुरुजींचा तसेच शेतकऱ्यांप्रती आदरभाव राखला पाहिजे. हीच आपल्या संस्कृतीची शिकवण आहे. पुढे बोलताना डॉ. ठोंबरे म्हणाले की, शिक्षणाचा उद्देशच मुळी एक सुजाण, सुसंस्कृत व जबाबदार नागरिक होणे हा असतो आणि तोच वसा व वारसा ज्ञानराज विद्यालयाने घेतलेला आहे.


         या कार्यक्रमासाठी ज्ञानराज विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक  रामराव ठोंबरे, सचिव सुंदरराव अदमाने, उंदरी से.स.सो. चे चेअरमन  नितीन काका ठोंबरे, विठ्ठल शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी, मु.अ अरुणराव ढाकणे,  भारतराव कुरवडे, परिसरातील पालक, माता पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सुत्र संचलन  प्रमोद ठोंबरे तर आभार प्रदर्शन विलास ठोंबरे यांनी केले. या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी  विलास निरडे,  गोविंद सोळंके, विवेक चव्हाण,  श्याम दिक्षित, कल्पना हंडीबाग मॅडम, अशोक घुगे, राजेभाऊ ठोंबरे व इयत्ता ९ वी चे विद्यर्थी इत्यादींनी परिश्रम घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या