💥पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या हत्येचा मराठी पत्रकार परिषद व बुलढाणा जिल्हा पत्रकार संघा तर्फे निषेध....!


💥या प्रसंगी मराठी पत्रकार परिषदचे राज्य उपाध्यक्ष राजेंद्र काळे यांची प्रामुख्याने उपस्थिती💥 

✍️मोहन चौकेकर                        

 बुलढाणा : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांची निर्घृण हत्या झाली. या घटनेचा निषेध करण्यासाठी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम. देशमुख यांनी  राज्यातील सर्व पत्रकार संघटनाना सर्व जिल्हा तालुका पातळीवर निदर्शने तसेच निवेदन देऊन निषेध व्यक्त करावे असे आवाहन केले होते त्यानुसार मराठी पत्रकार परिषद तसेच बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाने बुलढाणा जिल्हा अधिकारी यांना निवेदन दिले तसेच झालेल्या घटनेचा निषेध केला या प्रसंगी मराठी पत्रकार परिषदचे राज्य उपाध्यक्ष राजेंद्र काळे,बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रकांत बर्दे ,अजय बिल्लारी, रणजितसिंह राजपूत, रविंद्र गणेशे,  विष्णु कंकाळ,  यांच्यासह असंख्य पत्रकार उपस्थित होते....

💥चिखली तालुका मराठी पत्रकार संघाने ही केला राजापुरचे पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या हत्येचा निषेध...!


चिखली  : राजापूरचे पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्या व राज्यभर वाढत असलेल्या पत्रकारांवरील हल्ल्याचा निषेध करीत पत्रकारांवर हल्ले करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी चिखली तालुका पत्रकार संघाच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

  सदर निवेदनात असे नमुद करण्यात आले आहे की,  सभ्य आणि सुसंस्कृत महाराष्ट्रात भूमिका घेऊन पत्रकारिता करणार्‍या पत्रकारांचा आवाज कायमचा बंद केला जातो, पत्रकारांवर हल्ले करून किंवा त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होताना दिसतोय, पत्रकार संरक्षण कायदा आहे मात्र या कलमाखाली गुन्हे दाखल करायलाही टाळाटाळ केली जाते. त्यामुळे  निर्धोकपणे काम करणे पत्रकारांना कठीण झाले आहे. या घटना सातत्यानं वाढत असल्याने पत्रकारांमध्ये भिंतीची भावना निर्माण होत आहे.

महानगर टाईम्सचे राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीसे हे सोमवारी कोदवली येथून आपल्या दुचाकीने जात होते. यावेळी भरधाव वेगाने येणार्‍या महेंद्रा थार गाडीने त्यांच्या गाडीला धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, शशिकांत वारीसे गंभीर जखमी होवून त्यांचा मृत्यू झाला. मात्र हा अपघात नसून घातपात आहे हे उघडच आहे.. शशिकांतने ज्याच्या विरोधात बातमी प्रसिध्द केली ते कारचालक पंढरीनाथ आंबेरकर होते. सकाळी पंढरीनाथ आंबेरकर याच्या विरोधात बातमी लागते आणि त्याच व्यक्तीची कार वारीसे यांच्या गाडीला जोरदार धडक देते, त्यात वारिशे यांचा दुर्दैवी मृत्यू होतो हा केवळ योगायोग नसून कट रचून केलेला हा खूनच आहे... या घटनेचा आम्ही राज्यातील सर्व पत्रकार तीव्र शब्दात निषेध करीत आहोत.. तसेच आरोपीवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, या घटल्याची सुनावणी जलदगती न्यायालया मार्फत  व्हावी आणि राज्यात पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी अशी आमची मागणी आहे..

  त्याचबरोबर राज्यातील पत्रकारांचा विविध पध्दतीने आवाज बंद करण्याचा होत असलेला प्रयत्न पुरोगामी महाराष्ट्राला शोभा देणारा नाही.. वारंवार पत्रकारांवर होणारे हल्ले, त्यांच्यावर दाखल केले जाणारे खोटे गुन्हे थांबले नाहीत तर राज्यातील पत्रकारांना उग्र आंदोलन करावे लागेल असा इशारा आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून देत आहोत... राज्यात गेल्या आठ दिवसात पत्रकारांचा आवाज बंद करण्याच्या किमान आठ घटना घडल्या आहेत.  हत्या झालेले पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा अशी आमची विनंती आहे.. तसेच राज्यात पत्रकारांना मुक्तपणे आपले काम करण्यासारखे वातावरण तयार करण्याची सरकारची जबाबदारी आहे.. त्यादृष्टीनं भविष्यात प्रयत्न व्हावेत अशी मागणी या निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी योगेश शर्मा, कैलास गाडेकर, कैलास शर्मा, रेणुकादास मुळे, मोहन चौकेकर , महेश गोंधणे, रविंद्र फोलाने,भिकू लोळगे, कमलाकर खेडेकर,नितीन फुलझाडे, छोटू कांबळे, तौफीक अहेमद,  भरत जोगदंडे, शे.साबीर, शे.मुख्तार, मनोज जाधव, समीर, राजेश बिडवे, पियुष भिमेवाल यांच्यासह अनेक पत्रकार बांधव उपस्थित होते...

 ✍️ मोहन चौकेकर


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या