💥परभणी जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी भूसारे व माध्यमिक शिक्षणाधिकारी गरुड यांना तात्काळ निलंबीत करा...!


💥या मागणीसाठी ज्येष्ठ नागरीक एस.आर. कादरी व अल्का सोनेकर यांचे पुण्यातील आयुक्त कार्यालया समोर उपोषण💥 

परभणी (दि.20 फेब्रुवारी) :  परभणी जिल्हा परिषदेंतर्गत प्राथमिक शिक्षणाधिकारी विठ्ठल भूसारे व माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती आशा गरुड या दोघा वादग्रस्त अधिकार्‍यांकडील पदभार तात्काळ काढून घ्यावा व या दोन्ही शिक्षणाधिकार्‍यांना शिक्षण विभागाने तात्काळ सेवेतून निलंबित करावे या मागणीसाठी ज्येष्ठ नागरीक एस.आर.कादरी व श्रीमती अल्का सोनेकर या दोघांनी पुण्यातील शिक्षण आयुक्तांच्या कार्यालयासमोर आजा सेामवार दि.२० फेब्रुवारी पासून आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.

            भूसारे व गरुड या दोघा शिक्षणाधिकार्‍यांविरोधात राज्य सरकारने चौकशी करीता वेगवेगळ्या समित्या नियुक्त केल्या. या समित्यांनी या दोन्ही शिक्षणाधिकार्‍यांविरुध्द गंभीर स्वरुपाचे ठपके ठेवून तात्काळ निलंबित करावे, अशी शिफारस केली. वैयक्तिक मान्यता व वाढीव पदाच्या संच मान्यतेत या दोघांनी ‘अर्थ’पूर्ण अशा खेळ्या करीत सरकारी तिजोरीस कोट्यवधी रुपयांचा तडाखा दिला, हे स्पष्ट झाले असतांना सुध्दा अद्याप या दोघांकडील पदभार काढला जात नाही व त्या दोघांना निलंबित केले जात नसल्याबद्दल कादरी व सोनेकर यांनी आश्‍चर्य व्यक्त केले. शासन निर्णय 2 मे 2012 ची अंमलबजावणी करुन दिलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांच्या वैयक्तिक मान्यता रद्द कराव्यात, एनआयसी मार्फत दिलेल्या प्राथमिक व माध्यमिक विभागातील शाळांना दिलेल्या बोगस संच मान्यता रद्द कराव्यात, आर.आर. रोराळे, स.द. माने, स्वप्नील कापडणीस व गुंजाळ यांच्या बोगस आदेशानुसार दिलेल्या वर्गतुकड्या व वैयक्तिक मान्यता रद्द कराव्यात, 53 उपरि जावक नोंद वहीतील दिलेल्या वैयक्तिक मान्यतेची सुनावनी पूर्ण करुन, दिलेले आदेश रद्द करुन शासनास आर्थिक नुकसान करणार्‍या अधिकारी कर्मचार्‍यांविरोधात कठोर कारवाई करावी, तसेच या दोघा अधिकार्‍यांकडून आर्थिक भूर्दंडाची रक्कम वसूल करीत आर्थिक अपहाराचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी स.र. कादरी व अल्का सोनेकर यांनी केली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या