💥महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीत संत साहित्याचा सर्वात मोठा वाटा - रोजगार हमी मंत्री संदिपान भुमरे


💥परभणी येथे होत असलेल्या 11 व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी💥


परभणी (दि.12 फेब्रुवारी) : राज्यातील वारकरी संप्रदायाने त्यांच्या कार्याने महाराष्ट्राला भक्तिमार्गाचा नवा चेहरा दिला असुन, संत साहित्याने पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्राचा खऱ्या अर्थाने पाया रचला आहे. त्यामुळेच आपल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीत संत साहित्याचा सर्वात मोठा वाटा असल्याचे रोजगार हमी मंत्री भुमरे म्हणाले.


परभणी येथे होत असलेल्या 11 व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी श्री.भुमरे हे बोलत होते. यावेळी सर्वश्री आमदार भरत गोगावले, राहूल पाटील, सुरेश वरपुडकर स्वागताध्यक्ष डॉ. रत्नाकर गुट्टे, संमेलनाध्यक्ष ह.भ.प. तुकाराम महाराज गरुड ठाकूरबुवा (दैठणकर) ह.भ.प. विठ्ठल पाटील, वारकरी साहित्य परिषदेचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष बाळासाहेब महाराज मोहिते, आदिवासी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रदिप व्यास, समाज कल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी आंचल गोयल, पोलीस अधिक्षक रागसुधा आर., जिपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर, माजी खा. सुरेश जाधव, तुकाराम रेंगे, सुरेश देशमुख यांची उपस्थिती होती.

आपण महाराष्ट्रातील मराठी माणसं खूप नशिबवान आहोत. आपल्याला कानावर अगदी लहानपणापासूनच संत ज्ञानोबा माऊली, संत तुकारामचे गजर पडल्याने आपण संतांच्या मौलिक विचारांचे संस्कार कळत-नकळत आपल्यावर झाले. महाराष्ट्रातील संत साहित्य हे जगातले असे एकमेव साहित्य आहे, जे विद्वान लोकांपासून ते सर्वसामान्यापर्यंत पोहोचले आहे. संत ज्ञानेश्वर, जगद्गुरु संत तुकाराम, मुक्ताबाई, संत नामदेव, निवृत्तीनाथ, संत एकनाथ, संत चोखोबा, संत गोरा कुंभार, संत रोहिदास, समर्थ रामदास स्वामी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा यासह अनेक संतांच्या शब्दांनी, तत्वांनी हा महाराष्ट्र घडला आहे. ग्रामगीतेच्या माध्यमातून तुकडोजी महाराजांनी ग्रामविकासाचं सार सांगितला तर गाडगेबाबांनी आपल्या किर्तनातून स्वच्छतेचा संदेश दिला आहे. तसेच संत ज्ञानेश्वरांनी 700 वर्षापूर्वी पसायदानातून ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही संकल्पना मांडली आहे. आज भारताला जी-20 देशांच्या परिषदेचे अध्यक्षपद भूषवत असुन, त्याची ही थीम देखील ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही ठेवण्यात आली आहे. हे आपल्या संतांच्या साहित्याची देणगी असल्याचे रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे म्हणाले. 

जीवनातील सुख-दुःख, संसार, जातीधर्म, भेदभाव, जन्म-मृत्यु, निसर्ग किंवा जगण्यातील व्यवहार या गोष्टींच्या तत्वाचे सार आपल्याला संतांनी त्यांच्या साहित्यातून दिले आहे. संत साहित्य परंपरा हे महाराष्ट्राला मिळालेलं वरदान आहे. संत साहित्य ग्रंथांमधून जसे लोकांपर्यंत पोहोचले, तेवढेच ते तमाम वारकरी बांधवांच्या मुखातून तळागाळापर्यंत पोहचले आहे. संतसाहित्य ही कधीच न बुडणारी गाथा आहे. जी आपल्याला सतत तारक ठरत आली आहे. संत साहित्याचे शब्द इतके प्रभावी आहेत की, त्यांनी जगाला अध्यात्म आणि विश्वशांतीची शिकवण दिली असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच सरकारमध्ये आल्यापासून राज्य शासनाने अनेक विकासकामे सुरु केले आहे. समृध्दी महामार्गामुळे महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थस्थळेही जोडले गेली आहेत. त्याचप्रमाणे जेष्ठ नागरिकांसाठी एसटी प्रवास मोफत केल्याने वारकऱ्यांना त्याचा मोठा फायदा झाला आहे. ही योजना सुरु झाल्यापासून सुमारे 4 कोटी जेष्ठ नागरिकांनी प्रवास केला आहे. यामुळे पर्यटनाबरोबर अनेक जेष्ठ नागरिक पंढरपुरसारख्या तीर्थ क्षेत्रालाही मोठ्या संखेने भेट देत आहेत. या जेष्ठांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत. त्यामुळेच केवळ साहित्यच नव्हे तर सामान्य माणसाचे जीवनही समृद्ध करणाऱ्या संतांप्रती श्री. भुमरे यांनी यावेळी कृतज्ञता व्यक्त केली. तसेच संमेलनाध्यक्ष डॉ. गु्ट्टे यांनी केलेल्या विविध मागण्या मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्री यांच्या समोर ठेवून जास्तीत-जास्त निधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करु असेही श्री. भुमरे यावेळी म्हणाले.

संमेलनाध्यक्ष ह.भ.प. तुकाराम महाराज गरुड ठाकूरबुवा (दैठणकर) आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, संत साहित्य संमेलन म्हणजे वारकरी संप्रदायचे वैभव आहे. आज मी मानव संसाधन हा अत्यंत महत्वाचा विषय घेतला आहे. साधारणपणे मानव संसाधन विकासाच्या संदर्भात भारतीय सरकार, महाराष्ट्र सरकार व सर्व उद्योग सर्व काही प्रयत्न करीत असतात. मानव संसाधन विकास प्रशासनासाठी, उद्योगासाठी, युध्दासाठी, शिक्षणासाठी व्हावा असा सातत्याने आमचा प्रयत्न सुरु आहे. मानव संसाधनाचे जे ध्येय आहे. ते ध्येय विश्वशांतीचे आहे. संताना विश्व शांतीची चिंता आहे. संत मानवी जीवनाच्या विकासासाठी जो प्रयत्न करतात. ते  मानव जीवन विकसीत होणे ही काळाची गरज आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथाचा विचार केला तर स्पष्टपणे लक्षात येते की, संताची आणि साहित्याची जी भूमिका आहे ती समाजासाठी अत्यंत महत्वाची आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथ हा वारकरी संप्रदायाचा अधिष्ठता आहे. या ग्रंथाचा मुळ हेतु शांती आहे. म्हणूनच ग्रंथाच्या समारोपामध्ये विश्वशांती पसायदान आहे. या अधिष्ठान ग्रंथाचा मुख्य हेतूच मानवी जीवनांची शांती आहे. परंतु संतानी जे शांतीचे सूत्र सांगितले आहे, ते समजून घेणे आवश्य्क आहे. मानव हा ऐहिकतेकडे वळला आहे. विज्ञानामध्ये सुत शक्ती व विध्वंसक शक्ती अशा दोन शक्ती आहेत. विज्ञानाने जर विध्वंसक शक्तीचा वापर केल्यास विश्वाचे विध्वंस होण्यास वेळ लागणार नाही. मानवी जीवनावर विज्ञान, आध्यात्म व साहित्य या तीन गोष्टी परिणाम करीत असतात. आणि या गोष्टीतून मानवी जीवनाची जडणघडण होत असते. विज्ञानाचा दुरउपयोग थांबविण्याचे काम अध्यात्म करु शकते. आणि वारकारी संप्रादाय आध्यात्माचे माहेर घर आहे. विज्ञानाला वेसन घालण्याचे सामर्थ फक्त अध्यात्मा मध्येच आहे. म्हणून विश्व शांतीसाठी संत साहित्य व संत वाड्मयाची मोलाजी गरज असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले. 

स्वागताध्यक्ष आ. डॉ. रत्नाकरु गुट्टे म्हणाले की, संताची पावनभूमी परभणी मध्ये 11 वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन होत असल्याने परभणीचा सन्मान होत आहे. संत साहित्यातील तत्वज्ञानातून आपल्या जगण्याला एक दिशा मिळून सुसंस्कृत समाजाची उभारणी होत असते. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक समाज उभारणीमध्ये संत साहित्याचे सर्वात मोठे योगदान आहे. गंगाखेड ही संत जनाबाई यांची जन्मभूमी आहे. यामुळे राज्यातून अनेक दिंडी किंवा वारकरी हे गंगाखेडला येत असतात. परंतू येणाऱ्या यात्रेकरुसाठी याठिकाणी भक्त निवास, स्वच्छता गृह आदी कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत. तसेच गंगाखेडला अद्यापपर्यंत तिर्थस्थळाचा दर्जा ही प्राप्त झालेला नाही. याकरीता राज्य शासनाने लवकरात-लवकर तिर्थस्थळाचा दर्जा देवून येथील विकासकामासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा. तसेच गंगाखेड येथे यात्रा भरविण्यासाठी देखील राज्य शासनाने मदत करावी अशी मागणी श्री. गुट्टे यांनी यावेळी केली यावेळी आमदार भरत गोगावले, आमदार सुरेश वरपुडकर आदींनी समयोचित भाषणे केली.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते ह.भ.प.भाऊसाहेब महाराज गोसावी आणि आरोग्य विभागाचे अतिरीक्त मुख्य सचिव प्रदिप व्यास यांना वारकरी विठ्ठल पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच स्मरणीकेचेही यावेळी विमोचन करण्यात आले आहे यावेळी संमेलनास मोठ्या संख्येने वारकरी संप्रदाय उपस्थित होते......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या