💥‘सुकन्ये’साठी डाकघराचे दोन दिवस विशेष अभियान सर्व डाकघर कार्यालयात सुविधा उपलब्ध💥
परभणी (दि.01 फेब्रुवारी) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विभागातील सर्व डाक कार्यालयांमध्ये सुकन्या समृद्धी योजनेंतर्गंत पालकांनी त्यांच्या कन्येचे खाते उघडून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी गुंतवणूक करावी, असे आवाहन परभणीचे डाकघर अधीक्षक मोहम्मद खदिर यांनी केले आहे. त्यासाठी 9 आणि 10 फेब्रुवारी रोजी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी कळविले आहे.
पालकांमध्ये बचतीचे महत्त्व वाढावे तसेच मुलींचे शिक्षण आणि तिच्या उज्ज्वल भवितव्यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वपूर्ण असून, याबाबत डाक कर्मचारी ग्रामपंचायत, अंगणवाडी व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात येत आहे. या विशेष अभियानात जवळच्या डाकघर येथे सुकन्या समृद्धी योजनेमध्ये मुलींचे खाते उघडता येणार आहे.
केवळ 250 रुपये भरून हे खाते उघडता येत असून, खाते उघडल्यानंतर पुढील 15 वर्षांपर्यंत खात्यात दरमहा कमीत कमी 250 ते जास्तीत जास्त दीड लाख रुपयांपर्यंत एका आर्थिक वर्षात बचत करता येते. मुलगी 18 वर्षांची झाल्यावर, बारावी उत्तीर्ण किंवा मुलीचे लग्न जुळल्यानंतर जमा झालेल्या रकमेतून 50 टक्के रक्कम फक्त मुलीला काढता येते. खात्याचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर खात्यातील एकूण रक्कम काढून खाते बंद करता येते.
त्यासाठी योजनेचा डाक कार्यालयातील विहित नमुन्यातील अर्ज, मुलीचे जन्म प्रमाणपत्र, मुलीचे आणि पालकाचे आधार कार्ड व पॅनकार्ड आणि मुलगी व पालकांचे प्रत्येकी दोन फोटो व रहिवाशी पुराव्यासाठी आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत. तरी सर्व मुलींच्या पालकांनी मुलीच्या उज्जवल आणि सुरक्षित भविष्यासाठी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन श्री. खदिर यांनी केले आहे......
0 टिप्पण्या