💥'हर घर नर्सरी' उपक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे - जिल्हाधिकारी आंचल गोयल


💥जिल्हाधिकारी कार्यालयात रोपवाटिकाचा उपक्रमाचा प्रारंभ पावसाळ्यात वृक्षारोपणासाठी स्थानिक रोपे मिळणार💥 


परभणी (दि.02 डिसेंबर) : येत्या पावसाळ्यात लोकसहभागातून मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यात वृक्षलागवड करावयाची आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वृक्षाच्छादन वाढविण्यासाठी देशी वृक्षांची रोपे लागणार आहेत. ही गरज 'हर घर नर्सरी' उपक्रमातून पूर्ण होणार असून, सर्व नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी आज येथे केले.


  मराठवाड्यावर हरित आच्छादन वाढविण्यासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या संकल्पनेतून आज जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात 'हर घर नर्सरी' उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक रश्मी खांडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपजिल्हाधिकारी (साप्र) स्वाती दाभाडे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) अरुण जऱ्हाड, जिल्हा पुरवठा अधिकारी मंजुषा मुथा, विभागीय वन अधिकारी अरविंद जोशी, प्रादेशिक वन अधिकारी ऋषिकेश चव्हाण, प्रकाश शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विजय लोखंडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप घोन्सीकर, नायब तहसीलदार नानासाहेब भेंडेकर यावेळी उपस्थित होते.

  राष्ट्रीय वननितीनुसार देशातील 33 टक्के भूभाग हा वनाच्छादित असणे आवश्यक आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी घरोघरी नर्सरी उपक्रम राबवण्यात येत आहे. वृक्षांच्या रोपांमध्ये परभणी जिल्हा स्वावलंबी व्हावा, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू असून, मोठ्या प्रमाणावर रोपे लागणार आहेत. आगामी पावसाळ्यात वृक्षारोपण करताना मोठ्या प्रमाणावर स्थानिकरित्या रोपे उपलब्ध व्हावीत, यासाठी महसूल, कृषि आणि वन विभागाच्या संयुक्त विद्यमाने 'चला श्वास पेरूया'ची संकल्पना राबविण्यात येत आहे. या रोपवाटिकेतून उन्हाळ्यात विविध प्रकारच्या फळबियांपासून रोपे तयार करण्यात येणार आहेत. ही रोपे पावसाळ्यात वृक्षारोपणासाठी वापरण्यात येतील. त्यामध्ये पिंपळ, कवठ, सिताफळ, रक्तचंदन, करंजी, बिबा, बांबू, हादगा, वड, हिरडा, बोर, आवळा, पांढरा शिरस आदी फळबियांचा समावेश करण्यात येत आहे. त्यासाठी महसूल, कृषि आणि वन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्याच्या कुटुंबाने 50 रोपांचे संगोपन करावे, असेही जिल्हाधिकारी श्रीमती गोयल यांनी सांगितले.  

 प्रादेशिक वनाधिकारी ऋषिकेश चव्हाण आणि प्रकाश शिंदे यांनी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांना बियांपासून रोपे तयार करताना त्याची वैज्ञानिक पद्धत, उगवणक्षमता, सूर्यप्रकाश, पाणी, हवा याबाबत तसेच गादीवाफे तयार करण्याच्या पद्धतीबाबत माहिती दिली. 

जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्यासह उपसि्थत महसूल, वन आणि कृषि विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी माती, गांडूळ खत आणि वाळूचे कोरडे मिश्रण पिशव्यांमध्ये भरून त्यामध्ये फळबिया लावून उपक्रमाचा आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रारंभ करण्यात आला.....




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या