💥लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदार नोंदणी प्रक्रियेत सहभागी व्हा - अपर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे


💥राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त प्रभातफेरी,जनजागृती रॅली💥

परभणी (दि.25 जानेवारी) :  देशाच्या इतर राष्ट्रीय दिनांप्रमाणेच राष्ट्रीय मतदार दिनाचेही भारतीय लोकशाहीत महत्त्व आहे. त्यामुळे देशातील लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी जास्तीत-जास्त युवकांनी मतदार नोंदणी प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी आज येथे केले. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आज जिल्हा निवडणूक विभाग आणि शिवाजी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात डॉ. काळे बोलत होते.  


उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी निवृत्ती गायकवाड, तहसीलदार गणेश चव्हाण, शिक्षणाधिकारी (मा.) श्रीमती आशा गरुड, शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब जाधव,  नायब तहसीलदार लक्ष्मीकांत खळीकर, उपशिक्षणाधिकारी गजराज यरमळ, मंगेश नरवाडकर, मनपाचे विकास रत्नपारखी उपस्थित होते. ‘माझं मत, माझं भाग्य’ हे यंदाचे घोषवाक्य असून, याप्रमाणे प्रत्येक नवमतदाराने मतदारयादीत नाव नोंदवून मतदान करणे आवश्यक आहे. लोकशाही टिकविण्यासाठी मतदान करणे हे प्रथम कर्तव्य मानून सहभागी व्हावे, असे आवाहन करुन समाजातील वंचित घटकांनाही या प्रक्रियेत सहभागी करुन घेणे आवश्यक असल्याचे अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी सांगितले.  


भारतीय निवडणूक आयोग मतदानाची पूर्ण प्रक्रिया ही एक उत्सव म्हणून साजरा करत आहे. देशातील एकही नागरिक मतदानापासून वंचित राहू नये. प्रत्येकाचा मतदान प्रक्रियेत सक्रिय सहभाग राहावा. यासाठी निवडणूक आयोग वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या युवक-युवतींची नावनोंदणी करण्यासाठी कार्यरत आहे. ही नावनोंदणी एनव्हीएसपी या संकेतस्थळावर कधीही करू शकतात. तसेच विशेष मतदार नावनोंदणी अभियानातून ऑफलाईन पद्धतीनेही मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडेही फॉर्म भरता येतो असे सांगून युवा पिढीने लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन अपर जिल्हाधिकारी डॉ. काळे यांनी केले. 


भारतीय निवडणूक आयोगाच्या निवडणूक आणि मतदान प्रक्रियेत काळानुरुप बदल आणि सुधारणा होत आहेत. हे करताना निवडणूक विभागाला अत्यंत पारदर्शकपणे काम करावे लागते. देशाची लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी भारत निवडणूक आयोग अविरतपणे कार्य करत आहे, असे सांगून भविष्यात स्थलांतरितांना टपाली मतदानाऐवजी देशातील कोणत्याही मतदाराच्या मतदारसंघात ऑनलाईन मतदानाचा हक्क बजावता यावा, त्यादृष्टीनेही निवडणूक आयोगाचे काम सुरु असल्याचे डॉ. काळे यांनी सांगितले.    

भविष्यात एकही मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही, यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग काम करत आहे. पुढील दशकभरात जगात इतर देशांच्या तुलनेत भारतात तरुणांची संख्या मोठी राहणार असून, ही मोठी उपलब्धही असेल. या तरुणांना मतदान प्रक्रियेत सहभागी करुन घेण्याचे निवडणूक आयोगाचे मुख्य उद्दिष्ट राहणार असल्याचे डॉ. काळे यांनी सांगितले.उप जिल्हा निवडणूक अधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी प्रास्ताविकातून भारत निवडणुक आयोग आणि त्याचा उद्देश्य, कार्य आणि अंमलबजावणी याबाबत उपस्थितांना माहिती दिली. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त अपर जिल्हधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी उपस्थित बीएलओ, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना मतदानाची शपथ दिली.  

 प्रफुल्ल शहाणे आणि त्यांच्या चमूने 'करा तुम्ही मतदान, जनहो' पोवाड्याच्या माध्यमातून मतदारांना मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनीही पोवाड्याला टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला. अपर जिल्हाधिकारी डॉ. काळे यांच्या हस्ते यावेळी निवडणूक विभागातील उत्कृष्ट सहायक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून तहसीलदार पल्लवी टेमकर, नायब तहसीलदार लक्ष्मीकांत खळीकर तसेच इतर अधिकारी, कर्मचारी, डाटा एन्ट्री ऑपरेटर, प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी, दिव्यांग, तृतीयपंथी, शरीरविक्रय करणा-या महिलांचा सत्कार करण्यात आला. अभिनेते गंगाधर टिपरे यांनी शिवाजी कॉलेजमध्ये राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी मतदारदूत होऊन मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जनजागृतीबाबत साभिनय मार्गदर्शन केले. निवडणूक आयोगाच्या nvsp च्या संकेतस्थळावर जावून किंवा voter helpline app डाऊनलोड करून कधीही ऑनलाईन मतदार नोंदणी करता येऊ शकते, असेही त्यांनी सांगितले नायब तहसीलदार लक्ष्मीकांत खळीकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या