💥प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांचा परभणी जिल्हा ‘बालविवाहमुक्त’चा संकल्प....!


💥‘बालविवाहमुक्त जिल्हा’ मोहिमेत सर्वांचा सहभाग आवश्यक - जिल्हाधिकारी आंचल गोयल


परभणी (दि.26 जानेवारी) :  राज्यात बालविवाह प्रथेमध्ये परभणी जिल्हा वरच्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यासाठी ही  चांगली बाब नाही, त्यामुळे आता जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने बालविवाहमुक्त परभणी मोहिमेत सर्वांचा सहभाग आवश्यक आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करूया, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी आज येथे केले.


प्रियदर्शिनी इंदिरा गांधी जिल्हा क्रीडा संकुल येथे भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनाचा मुख्य ध्वजारोहण समारंभ त्यांच्या हस्ते पार पडला. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी श्रीमती गोयल बोलत होत्या.आमदार डॉ. राहुल पाटील, पोलीस अधीक्षक श्रीमती आर. रागसुधा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, मनपा आयुक्त श्रीमती तृप्ती सांडभोर, अपर जिल्हधिकारी डॉ. प्रताप काळे,  जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक श्रीमती रश्मी खांडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उप विभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, उपजिल्हाधिकारी श्रीमती स्वाती दाभाडे, डॉ. अरुण ज-हाड, निवृत्ती गायकवाड, डॉ. सुशांत शिंदे, जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती मंजुषा मुथा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, डॉ. संदीप घोन्सीकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गिते यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


जिल्हा बालविवाहमुक्त करण्यासाठी ग्रामीण भागातील शालेय शिक्षणात मुलींची पटसंख्या वाढली पाहिजे. मुलीचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत तिच्या जाणिवेच्या क्षमता विकसित होतात. त्यामुळे मुलींच्या वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यास शारीरिक, मानसिक असा सर्वांगिण विकास होतो. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नागरिकांसह सर्व प्रशासकीय यंत्रणांनी परभणी जिल्हा बालविवाहमुक्त करण्यासाठी सर्वांनी योगदान देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती गोयल  यांनी केले.जिल्ह्यात श्रमाचा जागर करताना शेतकरी बांधवांना त्यांच्या शेतात रेशीम आणि फळबागांच्या माध्यमातून त्यांची आर्थिक प्रगती साधली जावी. त्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहीजे. ग्रामीण भागातील दिव्यांगांचे सर्वेक्षण होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दिव्यांगांना राज्य शासनाच्या विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यास मदतच होणार असल्याचे जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी सांगितले.

घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अमूल्य योगदानातून भारतीय राज्यघटनेनुसार लोकशाही शासनव्यवस्था स्विकारली आहे. जगात भारत देश प्रजासत्ताक गणराज्य म्हणून 26 जानेवारी 1950 रोजी उदयास आला. राज्यघटनेमुळे नागरिकांना राज्यकारभारात सहभागी होण्याचा अधिकार मिळाल्याने या दिवसाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे,असे जिल्हाधिकारी श्रीमती गोयल यांनी सांगितले.संविधानातील मुल्यांमुळेच भारतीय लोकशाही आज जगात सर्वश्रेष्ठ मानली जाते. राज्याने सर्वच क्षेत्रामध्ये विकासाची मोठी भरारी घेऊन विविध क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. त्याचबरोबर राजकीय, सामाजिक, साहित्य आणि संस्कृती या क्षेत्रातही अभूतपूर्व प्रगती करीत देशाच्या विकासामध्ये नेहमीच सिंहाचा वाटा उचलल्याचा आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले.

संविधानामुळे नागरिकांना राज्यकारभारात सहभागी होण्याचा अधिकार मिळाला, हे आपणांस विदितच आहे. त्यामुळे या दिवसाला विशेष महत्व आहे. म्हणून आपण जनता, लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून देशाच्या सर्वांगिण विकासासाठी काम करत असून, राज्य तसेच परभणी जिल्ह्याची चौफेर प्रगती व्हावी यासाठी जागरुक नागरिक म्हणून आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, शहीद जवान यांच्या वीरमाता, वीरपत्नी व इतर उपस्थितांची भेट घेत प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या