💥स्वतः बदला जग निश्‍चित बदलेल : परम पुज्य पंडीत प्रदीपजी मिश्रा महाराज यांचे प्रतिपादन.....!


💥परम पुज्य पंडीत प्रदीपजी मिश्रा यांनी शिवपुराण कथा सोहळ्या प्रसंगी व्यक्त केले विचार💥

परभणी (दि.16 जानेवारी) : आज प्रत्येक माणूस इतरांना बदलण्याचा सल्ला देतोय, खरेतर प्रत्येकाने स्वतः बदल केले पाहिजेत, तरच जगसुध्दा निश्‍चितच बदलेल, असा विश्‍वास सुप्रसिध्द शिवपुराण कथाकार पं.पू. पंडीत प्रदीपजी मिश्रा महाराज यांनी आज सोमवार दि.16 जानेवारी 2023 रोजी शिवपुराण कथा सोहळ्याप्रसंगी आपले विचार व्यक्त केले.

        पाथरी महामार्गावरील लक्ष्मी नगरीत शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी आयोजित केलेल्या शिवपुराण कथा सोहळ्यात सोमवारी म्हणजे चौथ्या दिवशी कथा विशद करतेवेळी ते बोलत होते. स्वतःतील बदल, परस्परांवरील विश्‍वास, चूकांमधून सुधारणा, माणूस म्हणून माणसासारखं वागणं, व्यसनाधीनता यासह भक्तीमार्गातून, शिवभक्तीतून परीवर्तन या विषयी सुंदर असे विवेचन केले.

        अलिकडे मोठ्या प्रमाणावर माणसं इतरांनाच बदलण्याचा वारंवार सल्ला देत आहेत. सासू सूनेस, वडील मुलास, पती पत्नीस, मालक नोकरास ‘तू सुधार, तू बदल’ एवढाच कानमंत्र देतायेत, परंतु  आपण सुधारले पाहिजे, आपल्यात काळानुरूप बदल झाले पाहिजेत, स्वतः आत्मपरीक्षण केले पाहिजे, हेच प्रत्येकजण पध्दतशीरपणे विसरतोय, असे स्पष्ट करीत प.पू. मिश्राजी महाराज यांनी आधी स्वतः बदला, असा संदेश देवून स्वतः बदलले तरच निश्‍चितपणे जगही बदलेले असेल, असे नमूद केले.

       अलिकडे दुसर्‍यांची निंदा करण्याचे प्रकारसुध्दा मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. खरेतर आपण स्वतः चांगले आहोत, असा समज करीत इतरांची सातत्याने निंदा करणे, हे एक पापच आहे. परंतु, निंदा करणार्‍यांपेक्षाही निंदा ऐकणारा महापापी आहे, असेही प.पू. पंडीत मिश्राजी यांनी स्पष्ट करीत नारद मुनी आणि भगवान विष्णू यांचे एक उदाहरण दिले.

      अलिकडे मोठ्या प्रमाणावर एकमेकांवर अविश्‍वास दाखवला जातो आहे. खरेतर एकमेकांवर विश्‍वास असलाच पाहिजे, त्यासाठी एकमेकांवर विश्‍वास ठेवला पाहिजे, असे स्पष्ट करतेवेळी प.पू. मिश्राजी महाराज यांनी जोपर्यंत एकमेकांवरचा विश्‍वास दृढ होणार नाही, तोपर्यंत जीवनात सर्वार्थाने सुख मिळणार नाही, असे नमूद केले. त्सुनामीत सापडलेल्या एका दांम्पत्याचे उदाहरण विशद करतेवेळी प.पू. मिश्राजी महाराज यांनी शिवभक्तीवर विश्‍वास ठेवा निश्‍चिपणे शिवभक्तीच तारणहार ठरेल, असा विश्‍वास व्यक्त केला. गुरुकडून शिक्षा घेतेवेळी गुरुवर दृढ असा विश्‍वास असलाच पाहिजे, तरच सर्वकाही मिळू शकेल, असेही नमूद केले.

        समाजात चार प्रकारच्या व्यक्ती आहेत. कोणी तेज, कोणी चंचल तर कोणी बोलके तर कोणी भोळे आहेत, परंतु कोणाच्या भोळेपणाचा कोणीही फायदा लाभ उठवू नये, भोळेपणावर अन्याय करु नये, असा सल्लाही दिला.

माणूस हा चुकीचा पुतळा आहे. चूका ह्या होणारच, परंतु एक चूक वारंवार होणार नाही, याची प्रत्येकाने खबरदारी घेतली पाहिजे. एका चुकीतून सुधारणा केली पाहिजे. ती चूक पुन्हा पुन्हा करणे म्हणजे आयुष्यभर रडण्यासारखे आहे, असेही ते म्हणाले. देव बनू नका, आपण माणसं आहोत, माणसासारखं रहा, माणसांसारखं वागा, असेही आवाहन प.पू. मिश्राजी महाराज यांनी भक्तांना केले.

        दुधाने भरलेल्या मोठ्या भांड्यात एक चमचाभर दही टाकले तर संपूर्ण भांडभर दही तयार होतं. वेगवेगळ्या वस्तूंद्वारे, मसाल्यातून स्वादिष्ट भोजन तयार होतं. एक थेंब रक्तानेसुध्दा माणूस जिवंत राहतो. त्याप्रमाणेच एका मिनिटाची शिवपुराण कथासुध्दा आयुष्य उभारणारी, जीवनमान सुधारणारी ठरू शकते, असाही विश्‍वास प.पू. मिश्राजी महाराज यांनी व्यक्त केला.

       साधू-संतांनी कधीही माणसांना प्रपंच सोडा अन् भक्तीमार्गाचाच अवलंब करा, असे सांगितलेले नाही. परंतु, सोडायचंच असेल तर माणसाने स्वतःतील दुर्र्गुण, व्यसने सोडली पाहिजेत, त्याऐवजी देव-देवतांचे स्मरण केले पाहिजे, भक्तीमार्गाला लागले पाहिजे तरच माणूस सुधारणेकडे वाटचाल करु लागेल, असेही ते म्हणाले.

       परमार्थापर्यंत पोहोचण्याचा शिवभक्ती हाच एकमेव मार्ग आहे. शिवपुराण ऐकले तरच माणूस सुधारु शकेल, असा विश्‍वास व्यक्त करतेवेळी, शंकर महादेवाने विष पचवलं, परंतु इतरांना अमृत दिलं, याचे उदाहरण दिले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या