💥डॉक्टर स्मिता सोलंकी यांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी चा 'उत्कृष्ट शास्त्रज्ञ' पुरस्कार....!


💥कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ.इंद्रमणी हे होते💥

परभणी (दि.०९ जानेवारी) - येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालय, बदनापूर कृषी विज्ञान केंद्र, सामुदायिक विज्ञान महाविद्यालय, महिला आर्थिक विकास महामंडळ (जालना) आणि नाबार्ड (जालना) यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 3 जानेवारी रोजी बदनापूर कृषी विज्ञान केंद्रात महिला शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता.


उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मा. डॉ. इंद्रमणी होते तर अन्नमाता सेंद्रिय शेती संशोधन व प्रसारक श्रीमती ममताबाई भांगरे या उद्घाटक म्हणून उपस्थित होत्या. व्यासपीठावर विस्तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, सहयोगी अधिष्ठाता जया बंगाळे, मावीम चे जिल्हा समन्वयक अधिकारी उमेश कहाते, जिल्हा उपमहाव्यवस्थापक श्री तेजल क्षीरसागर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मेळाव्यात विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी क्षेत्रात शिक्षण संशोधन आणि विस्ताराच्या माध्यमातून भरीव असे योगदानाबाबत कृषी अभियंता डॉ. स्मिता सोलंकी यांचे *उत्कृष्ट* *शास्त्रज्ञ* म्हणून सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन कुलगुरूंच्या हस्ते गौरवण्यात आले. मा. कुलगुरूंनी यांचा *यंत्रमाता* ही उपाधी देऊन सन्मान केला.

डॉक्टर स्मिता सोलंकी यांनी 40 हून जास्त बैलचलित, मनुष्यचलित तसेच ट्रॅक्टरचलित अवजारांवर संशोधन करून ते शेतकऱ्यांमध्ये प्रचलित केले व त्यांच्या त्या कार्यामुळे लहान तसेच मध्यम शेतकरी आदिवासी यांच्या जीवनात अमुलाग्र बदल झाला त्यांनी रुंद वरंभा सरी यंत्र, बैलचलित सौर फवारणी यंत्र, विविध प्रकारचे कोळपणी यंत्र, गो शाळे मध्ये लागणारे यांत्रिकीकरण त्यासाठी भरीव असे योगदान दिलेले आहे.

भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली अंतर्गत अ. भा. स. सं. प्रकल्प पशु शक्तीचा योग्य वापर योजना व ना म कृ वी मार्फत गोविज्ञान अनुसंधान केंद्र देवलापार, नागपूर येथे व ना म, कृ वी विकसित सुधारित बैलचलित अवजारे तसेच बैलचलित रोटरी मोडवर शेवई मशीन, पिठाची गिरणी, पापड मशीन, मिरची कांडप इत्यादी अवजारांचे तंत्रज्ञान स्तोत्र केंद्र (टीआरसी) विकसित केले आहे तसेच महाराष्ट्रात प्रथमच व ना म कृ वी विकसित बैलचलित अवजारांचे भाडेतत्त्वावर केंद्र (कस्टम हायरिंग सेंटर ) श्री. छत्रपती शिवाजी महाराज गोशाळा राणी सावरगाव येथे स्थापित करण्यामध्ये त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. त्याचा फायदा या परिसरातील लघु व मध्यम शेतकऱ्यांना होत आहे. ट्रॅक्टरचलित सुधारित बी बी एफ (फोर इन वन) चे प्रत्यक्षीके परभणी जिल्ह्यातील सातशे ते आठशे एकर क्षेत्रावर देऊन सदरील यंत्राद्वारे सोयाबीन, हरभरा पिकातील निविष्ठांची बचत, कमी श्रम व अधिक उत्पादनाद्वारे शेतकऱ्यांमध्ये आत्मनिर्भरता व आत्मविश्वास निर्माण केला. त्यांच्यावर सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या