💥बालविवाहमुक्त परभणी सेल्फी पॉईंटने वेधले सर्वांचेच लक्ष....!


💥या सेल्फी पॉईंटच्या माध्यमातून जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या बालविवाहमुक्त परभणी या महत्त्वाकांक्षी मोहिमेला बळ💥


परभणी (दि.26 जानेवारी) : प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य कार्यक्रमस्थळी उभारण्यात आलेल्या बालविवाहमुक्त परभणी या सेल्फी पॉईंटने सर्व उपस्थितांचे लक्ष वेधले.

या सेल्फी पाईंटवर जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल, आमदार डॉ. राहुल पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती आर. रागसुधा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गिते, तसेच मुख्य समारंभात सहभागी झालेल्या मुली, विद्यार्थिनींनी सेल्फी घेतल्या. या सेल्फी पॉईंटच्या माध्यमातून जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या बालविवाहमुक्त परभणी या महत्त्वाकांक्षी मोहिमेला बळ मिळाले असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

 * ‘बालविवाहमुक्त परभणी’ ठरले मुख्य आकर्षण :-


जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या महत्त्वाकांक्षी ‘बालविवाहमुक्त परभणी’ हे आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभाचे प्रमुख आकर्षण ठरले असून, जिल्ह्यात होणारे बालविवाह पूर्ण प्रशासकीय क्षमतेने रोखण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे दिसून आले. पथसंचलन करणाऱ्या सर्व पथकांच्या हातात ‘बालविवाहमुक्त परभणी’चे फलक झळकत होते आणि ते उपस्थित सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. येथील सेल्फी पॉईंट, चित्रफलक, विविध शासकीय विभागांचे चित्ररथ, जिवंत देखावे, बालविवाह केल्यास होणारी शिक्षा, त्यात शिक्षा होणाऱ्यांचा समावेश, ऊर्जस्वती देशमुख आणि सायली शितळे यांचे सूत्रसंचालनाने हे अधोरेखित केले. 

* पथसंचालनातील सहभाग :-

प्रियदर्शिनी इंदिरा गांधी क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य ध्वजारोहण समारंभात परेड कमांडर विजय मुंढे, सेकंड इन कमांडर श्रीमती भावसार यांच्यासह पुरुष पोलीस अंमलदार प्लाटून, महिला पोलीस अंमलदार, पुरुष होमगार्ड, महिला होमगार्ड, आपत्ती व्यवस्थापन विभाग, महसूल विभाग, पृथ्वीराज देशमुख मुलींची सैनिकी शाळा, नेताजी सुभाषचंद्र बोस मुलांची सैनिक शाळा, स्काऊट गाईड मुलींचे प्लाटून, जवाहर नवोदय विद्यालय, जिल्हा परिषद कन्या शाळा, शीघ्र कृती दल, निर्भया पथक, श्वान पथक, बॉम्बशोधक व नाशक पथक, आरसीपी पथक आणि अग्निशामक देवदूत पथकांचा पथसंचालनामध्ये समावेश होता.

* उत्कष्ट कामगिरीबद्दल बक्षीस वितरण :-

 इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत जुलै 2022 च्या राज्य गुणवत्ता यादीत आलेल्या आर्यन शिंदे आणि आदित्य नांदुरे, सायली भोंगे आणि सुदर्शन नखाते यांचा जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते बक्षीस प्रदान करण्यात आले. तसेच एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालय आणि मानवत मल्टीस्पेशालिटी रुग्णालयांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल राष्ट्रपती पदक घोषित झालेल्या होमगार्ड पथकाचे तालुका समादेशक अधिकारी परमेश्वर जवादे यांचाही जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

महात्मा गांधी सेवासंघ या संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यात दिव्यांग पुनर्वसन केंद्राची सुरुवात झाली. विधायक कार्याबददल केंद्र शासनाने ३ डिसेंबर रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते दिव्यांगजन सक्षमीकरणासाठी कार्यरत सर्वश्रेष्ठ संस्था म्हणून महात्मा गांधी सेवा संघाचे सचिव विजय कान्हेकर यांना राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आल्याने त्यांचाही गौरव करण्यात आला..... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या