💥वाचून आश्चर्य वाटेल जिल्हा परिषदेची शाळा भरते फक्त एका विद्यार्थ्यांसाठीच...!


💥गणेशपूरची ही शाळा एका विद्यार्थ्यांसाठीही अखंडपणे सुरू💥

(फुलचंद भगत)

वाशिम:-यापूर्वी जिल्हा परिषदेच्या शाळेत एक शिक्षक असतो अशा अनेक शाळा तुम्ही आम्ही पाहिल्या आहेत.मात्र तुम्ही कधी अशी जिल्हा परिषद शाळा पाहिली आहे का ज्यात फक्त एकच विद्यार्थी आहे? आणि एकच शिक्षक त्या विद्यार्थ्याला शिकवतात? वाशिम जिल्ह्यातील गणेशपुरमध्ये अशीच एक शाळा आहे, गणेशपूरची ही शाळा एका विद्यार्थ्यांसाठीही अखंडपणे सुरू आहे.

          वाशिम जिल्ह्यातील सर्वात लहान गाव गणेशपूर आहे. गावची लोकसंख्या दीडशे ते दोनशेच्या घरात आहे. याच गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची सध्या जिल्ह्यात चर्चा आहे. शाळेत पहिली ते चौथीच्या वर्गांना परवानगी आहे, मात्र शाळेत एकच विद्यार्थी आहे. कार्तिक शेगोकर असं या विद्यार्थ्याचं नाव असून तो तिसरीत शिकतो. कार्तिकला शिकवण्यासाठी शाळेत किशोर मानकर नावाचे एकच शिक्षक आहेत. शाळेत विद्यार्थी संख्या नसल्याने एका विद्यार्थ्यालाच शिक्षण दिले जाते. मात्र तरीही ही शाळा रोज भरते.एकीकडे अनेक विद्यार्थी सरकारी शाळांकडे पाठ फिरवत असताना दुसरीकडे कार्तिक मात्र आपलं शिक्षण पूर्ण करून काहीतरी करून दाखवण्याच्या इराद्याने रोज शाळेत जातो. दररोज त्याचे शिक्षक त्याला शिकवण्यासाठी १२ किमीवरून येतात. हे दोघेच राष्ट्रगीत म्हणतात, प्रार्थना होते आणि नंतर कार्तिकला दिवसभर शाळेत शिकवलं जातं.कार्तिक एकटा असला तरी मी त्याला शिकवतो आणि मला कंटाळाही येत नाही, असं शिक्षक किशोर मानकर सांगितात. तर कार्तिक म्हणाला, मी तिसरीच्या वर्गात शिकतो, शाळेत एकटाच विद्यार्थी आहे आणि शाळेत एकच शिक्षक आहे. तर माझ्या गावात एकच शाळा, एकच विद्यार्थी आहे आणि एकच शिक्षक आहेत, जे चांगल्या प्रकारे शिकवतात, असं एका गावातील तरुणानं सांगितलं.

प्रतीनीधी :- फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या