💥परभणी जिल्ह्यातील वाहन धारक/नागरिकांने रस्ता सुरक्षा अभियानात सामिल व्हा : अपघातविरहीत जीवन जगा...!


💥केंद्र शासनाच्या निर्देशानुसार देशामध्ये 1987 पासून 'रस्ता सुरक्षा अभियान' राबविण्यात येत आहे💥

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार देशामध्ये 1987 पासून 'रस्ता सुरक्षा अभियान' राबविण्यात येत आहे. दरवर्षी जानेवारी महिन्यात ‘रस्ता सुरक्षा सप्ताह’ राबविण्यात येतो. रस्ता सुरक्षेबाबत समाजात जनजागृती होऊन सामाजिक मानसिकता निर्माण होणे आवश्यक आहे. घडणाऱ्या अपघातामध्ये अनेकदा दुसऱ्याच्या चुकीमुळे अपघात होऊन जीवितहानी होते. यामुळे अनेक कुटूंब उद्ध्वस्त होतात. अपघातानंतर झालेली प्राणहानी टाळता आली असती, असे लक्षात येऊन काही उपयोग होत नाही. अशा सर्व अपघातांची कारणे व त्या संदर्भातील सुस्पष्ट आकडेवारी जनतेसमोर येणे आवश्यक आहे. त्यामुळे जनजागृती होण्यास मदत होणार आहे.

 दर वर्षी नवीन वाहनांची संख्या दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढत असली तरी होणाऱ्या अपघाताची टक्केवारी कमी आहे. वाहतूक नियमांचे पालन करुन आपल्या जीवनाचे रक्षण करावे. कारण यामुळेच सर्वांच्या जीविताचे रक्षण होते. रस्ता सुरक्षेबाबतची ही मोहिम शाळा, महाविद्यालये, कारखाने, विविध ठिकाणी राबविण्यात येत असून यामध्ये नागरिकांनी सहभागी होऊन सहकार्य करावे. रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी  17 जानेवारीपर्यंत  रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येणार असून या अभियानाच्या माध्यमातून विविध जनजागृतीविषयक उपक्रम राबविले जाणार आहे.

महाराष्ट्रात 31 मार्च 1931 पर्यंत केवळ 3 लाख 7 हजार 30 वाहने होती. यामध्ये मागील 10 वर्षातील सरासरी वाढ 28 ते 30% च्या आसपास झाली आहे. सन 2011 च्या जनगननेनुसार राज्याची लोकसंख्या 11 कोटी 24 लाख इतकी आहे. त्यानुसार राज्यातील दर एक लाख लोकसंख्येमागे सुमारे 50 ते 60  हजार वाहने असे प्रमाण दिसून येते. अन्न, वस्त्र, निवारा या प्राचीन काळापासून मानवाच्या मुलभूत गरजा आहेत. आजच्या काळामध्ये परिवहन ही अत्यंत आवश्यक बाब झाली आहे. त्याअनुषंगाने मोटार वाहनांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. वाहनाच्या वाढत्या संख्येबरोबर दळणवळणाची मोठी समस्या दूर होत असताना काही नवीन समस्या निर्माण होत आहेत. वाहतुकीची कोंडी, पार्कींगची जागा, हवा आणि ध्वनी प्रदूषण, मोटार वाहन अपघात या समस्या निर्माण झाल्या असून, त्यामुळे होणारे राष्ट्रीय नुकसानही मोठ्या प्रमाणात आहे.

सन 2019 च्या आकडेवारीनुसार देशात सुमारे दीड लाख लोक रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडले तर सुमारे साडेचार लाख लोक जखमी झाले आहेत. अपघातात मृत्यू होणाऱ्यामध्ये पादचारी, दुचाकीस्वार आणि सायकलस्वार यांची 80 टक्केपेक्षा जास्त समावेश आहे. देशात वेगवेगळे आजारामुळे मृत्यू होतात. परंतु, त्यामध्ये अपघातामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण हे 5 व्या क्रमांकावर आहे. यात तरुणांचे मृत्यूमुखी होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. परभणी जिल्ह्यातील मागील तीन वर्षात 90 टक्के अपघात हे पादचारी, दुचाकीस्वार आणि सायकलस्वार यांचे झाले आहेत. सन 2022 च्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत परभणी जिल्ह्यात 257 अपघाताची नोंद झाली असून, यात 131 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. तर 194 व्यक्ती गंभीररित्या जखमी झाले आहेत. 

 या अपघातामध्ये गंभीररित्या जखमींची संख्या वाढते आहे. अपघातामुळे होणारी मनुष्यहानी तसेच मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीच्या नियमासंदर्भात जनतेमध्ये जागृती निर्माण करणे हाच एकमेव पर्याय आहे. या अंतर्गत रहदारीच्या नियमांची जनतेमध्ये जागृती निर्माण करण्याचे काम मोटार वाहन विभागामार्फत सुरू आहे.

परभणी जिल्ह्यात लोकसंख्येच्या प्रमाणात वाहनांची संख्या भरमसाठ वाढत असून, सार्वजनीक रहदारीच्या रस्त्यावर सुरक्षित वाहतुक नियमाचे पालन केले जात नाही. दिवसेंदिवस वाढणाऱ्या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी 'रस्ता सुरक्षा अभियान' राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये वाहतूकीचे नियम व वाहन चालविण्यासंबंधी जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. प्रवासी वाहतूक सुरळीत व सक्षम व्हावी यासाठी माहिती पत्रक, बॅनर, पोस्टरद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच चारचाकी वाहनांवर असलेल्या काळ्या फिल्मसची तपासणी, ओव्हरलोड, ड्रंक न ड्राईव्ह, मोबाईलचा वापर व अवैध वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे. बैलगाडी, ट्रॅक्टरवर परावर्तीत लावण्यात येणार असून जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यामध्ये हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. वाहनचालकांसाठी प्रबोधन व प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणार असून सार्वजनीक बांधकाम विभागाच्या समन्वायाने ब्लॅकस्पॉटची दुरुस्ती, फलक लावणे,  रस्त्यावर पट्टे लावणे, तुटलेले दुभाजक दुरुस्ती आदी उपक्रम या अभियानातंर्गत घेण्यात येणार आहे.

रस्त्यावरील होणारे बहुतांश मोटार वाहन अपघात हे वाहनचालकाच्या निष्काळजीपणामुळे होतात. शिकाऊ अनुज्ञप्ती प्राप्त करण्यापूर्वी रस्त्यावरील तीन प्रकारची वाहतुकीची चिन्हे सक्तीची चिन्हे, सावध करणारी चिन्हे, माहिती देणारी चिन्हे असे एकूण (36+37+22) 95 वाहतुकीच्या चिन्हांची माहिती करून घेणे आवश्यक आहे. नियमामध्ये प्रामुख्याने कलम 118 अंतर्गत विनियमन केलेले एकूण 31 नियम व कलम 112 ते 207 मधील 11 नियम असे 42 नियमांची माहिती असणे आवश्यक आहे. मोटार वाहनचालकाकडे सार्वजनिक रस्त्यावर वाहन चालवताना सभ्यता, जबाबदारीची जाणीव, एकाग्रता, आत्मविश्वाास, संयम हे गुणधर्म असणे आवश्यक आहे.

रस्त्यावरील सुरक्षेमध्ये विद्यार्थ्यांवर मोठी जबाबदारी असून, रस्ते अपघातात होणारे तरुण पिढीचे नुकसान हे देशाचे मोठे नुकसान आहे. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शालेय विद्यार्थ्यांचा जर विचार केला तर त्यांना त्यात घर, रस्त्यावरील आणि शालेय शिस्त अशा तीनही ठिकाणांवर शिस्त पाळावी लागते.  

आज वाढत्या वाहनाच्या संख्येमुळे पर्यावरण देखील मोठ्या प्रमाणावर दूषित होत असून यामुळे कॅन्सर, दम्याचे रुग्ण वाढत आहेत. कोरड्या हवेमध्ये साधारणपणे प्रमाण 78% आणि ऑक्सिजनचे 20% असते. याशिवाय हवेमध्ये इतर घटक असतात. साधारण हवेमध्ये जेव्हा इतर घटकांची वाजवीपेक्षा अधिक प्रमाणात वाढ होते. तेव्हा हवा दूषित होते. त्यास आपण हवेचे प्रदूषण असे म्हणतो. पेट्रोल किंवा डिझेल सारख्या इंधनात हायड्रोकार्बन्स असतात. वाहनातील यंत्रामध्ये जेव्हा इंधन पूर्ण जळते तेव्हा त्यातून फक्त कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो परंतु असे झाले नाही व अर्धवट ज्वलन झाले तर त्यातून कार्बन मोनोक्साईड निर्माण होत व हवेमध्ये पसरतो. काही प्रमाणात लेड ऑक्साईड व सल्फरडायऑक्साईड व ऑक्साईड ऑफ नायट्रोजन वाहनांच्या धुरावाटे बाहेर फेकले जातात, या सर्व गोष्टी हवेस दूषित बनवतात.

मोटार वाहन कायदा, 1988 मधील कलम 112 ते 207 यादरम्यान विविध प्रकारच्या नियमांची तरतुद केलेली आहे. त्याअनुषंगाने सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे नियम 118 अंतर्गत खालील नियम विहीत केलेले आहेत. त्याचेही पालन करणे गरजेचे आहे. सार्वजनिक रस्त्याचा वापर करणाऱ्या प्रत्येक वाहन चालकासाठी नियम पालन करणे संदर्भात तरतुदी विहीत केलेल्या आहेत. त्या अनुषंगाने त्याचे प्रत्येकाने पालन करणे आवश्यक आहे. सदर कायद्यातंर्गत रस्त्यावर वाहन आणण्यापूर्वी सदर वाहनाचे नोंदणी करणे अनिवार्य आहे. त्याचप्रमाणे वाहन चालकाकडे विधिग्राह्य अनुज्ञप्ती असणे आवश्यक आहे. त्या व्यतिरिक्त सदर वाहनाचे विमा, पी.यु.सी. प्रमाणपत्र, आणि भाडोत्री वाहनाच्या बाबतीमध्ये योग्यता प्रमाणपत्र व परवाना असणे आवश्यक आहे.

रस्त्यावरील अपघातामध्ये मृत्युमुखी पडणारी व्यक्ती चालक, मालक, पादचारी, कोणीही असो तो कुटुंबाचा जबाबदार व्यक्ती असतो. अपघात टाळण्यासाठी रस्त्यावरील विविध सिग्नल्स, वाहतुकीची चिन्हे, वाहतुकीचे नियम, प्रामुख्याने वेगावर नियंत्रण, समोरील वाहनास ओव्हरटेक करताना घ्यावयाची काळजी याबाबत प्रत्येकाने जागरूक असणे अत्यावश्यक आहे. रस्ता सुरक्षासंदर्भात प्रत्येक नागरिकांनी प्राधान्य दिलेच पाहिजे. आपल्या घरापासूनच रस्ता सुरक्षासंदर्भात प्रबोधन कार्य करणे आवश्यक आहे. प्रत्येक पालकांनी आपल्या रहदारीचे नियम पाळण्याबाबत योग्य शिक्षण दिले पाहिजे, त्याचप्रमाणे सार्वजनिक रस्त्याचा वापर करताना शिस्त पाळली तर निश्चित पुढील जीवनास शिस्त निर्माण होईल याची जबाबदारीने जाणीव करून देणे आवश्यक आहे. याकरीता परभणीच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विबनी स्वामी यांच्या नेतृत्वात नागरिकांच्या सुरक्षेसाठी रस्ता सुरक्षा अभियानातंर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, परभणी व्यापक जनजागृती करीत आहेत. आपण संयुक्तपणे रस्ता सुरक्षा संदर्भात समाजामध्ये वाहतुकीचे नियम पालन करून अपघात रोखणे व राष्ट्रीय नुकसान कमी करणेबाबत प्रबोधन करू या. आपण सर्वजण रहदारीचे नियम पाळू या आणि रस्त्यावरील अपघात कमी करू या...

अरुण सुर्यवंशी

जिल्हा माहिती अधिकारी परभणी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या