💥परभणी महानगर पालिका आयोजित सायक्लोथॉन स्पर्धा म्हणजे केवळ स्टंटच....!


💥प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी केला आरोप💥

परभणी (दि.११ जानेवारी) : परभणी शहर महानगरपालिकेच्यावतीने शहरातील प्रदुषण कमी होण्यासाठी व शहर वायू प्रदुषण मुक्त करण्यासाठी सायकल सारख्या हरीत वाहनांचा जास्तीत जास्त उपयोग करावा या उद्देशाने परभणी शहर महानगरपालिकेकडून स्वच्छ सर्वेक्षण अभियान - २०२३ व माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत दि.१२ जानेवारी २०२३ रोजी सायकल मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे, हे आयोजन म्हणजे मनपा प्रशासनाची निव्वळ कागदावरची स्टंटबाजी असून खऱ्या अर्थाने परभणी मनपा प्रशासनावर असलेली शहर वायू प्रदुषण मुक्त ठेवण्याची जबाबदारीतून सामान्य परभणीकर नागरिकांचे लक्ष विचलित करण्यासाठी केलेला हा स्टंट आहे असा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी केला आहे.


संपूर्ण शहरात मोठ्या प्रमाणावर धुळीचे राज्य असून शहरामध्ये साधी एक चक्कर जरी मारली तरी ईच्छा नसतानाही श्वसन नलिकेद्वारे ५-१० ग्रॅम धुळ शरीरामध्ये जाते शिवाय चेहऱ्यावर व कपड्यावर साचणारी धुळ वेगळीच. परभणी शहरामध्ये सर्वत्र मोठ्याप्रमाणावर असलेले धुळीचे साम्राज्य हे परभणी शहर महानगरपालिकेच्या गलथान कारभाराने परभणी शहरवासियांना दिलेली देणगी आहे. एकीकडे आपल्या मर्जीतील गुत्तेदार पोसण्यासाठी  रस्त्यावर डस्ट व मुरूम टाकून खड्डे बुजवायचे बोगस कामे करायची, संपूर्ण शहराला धुळीच्या हवाली करून शहराचे वायु प्रदुषण वाढवायचे व शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणायचे आणि दुसरीकडे आम्ही पर्यावरण रोखण्यासाठी किती प्रयत्न करतो हे वरिष्ठांना दाखविण्यासाठी व वायू प्रदूषण निर्मूलनासाठी आलेल्या फंडाचा खर्च दाखवण्यासाठी सायक्लोथॉन स्पर्धेचे आयोजन करायचे हा अत्यंत हस्यास्पद प्रकार आहे. सायकल स्पर्धा ही एक खेळ स्पर्धा म्हणून आमचा या खेळाला व या स्पर्धेला विरोध नाही, परंतु वायु प्रदुषण शहरामध्ये पसरविणारेच अश्या प्रकारच्या स्पर्धा घेवून वायु प्रदुषणावर काम करत असल्याचे ढोंग करत असेल तर या गोष्टीला प्रहार जनशक्ती पक्षाचा तीव्र विरोध आहे.

या प्रकारच्या केवळ स्पर्धा घेउन कागदोपत्री स्टंट न करता मनपाने खड्डे बुजविण्याच्या कामातून भ्रष्टाचार करून शहरामध्ये पसरवलेल्या धुळीमुळे वायु प्रदुषण होवून शहर वासियांच्या आरोग्याशी सुरु केलेला खेळ थांबवून महानगरपालिकेने शहरातील धुळीचे प्रमाण कमी करुन शहर वासियांना धुळ मुक्त व प्रदुषण मुक्त परभणी शहर द्यावे अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे असे ही शिवलिंग बोधने म्हणाले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या