💥सामाजिक जाणिवेने ओतप्रोत भरलेला काव्यसंग्रह जगणे इथेच संपत नाही.....!


💥हणमंत पडवळ लिखित जगणे इथेच संपत नाही हा काव्यसंग्रह खरंतर काव्यसंग्रहाचे नावच आशादायी💥

✍️ लेखक : महेश लांडगे

सहायक पोलीस निरीक्षक,नांदेड

*मो.क्र. 9822417500*

             हणमंत पडवळ लिखित जगणे इथेच संपत नाही हा काव्यसंग्रह खरंतर काव्यसंग्रहाचे नावच आशादायी आहे जगणे इथेच संपत नाही अर्थात आलेल्या संकटांना सामोरे जाऊन त्यावर मात करणे आहे ८१ कवितांचा समावेश असलेला कविता संग्रह जगणे इथेच संपत नाही वाचताना विविध विषयांना हळूवार साद घालत मांडणी करताना दिसून येतो. विशेषत त्यात सामाजिक जाणीव ठळकपणे अधोरेखित झाली आहे ग्रामीण भागात राहणारा कवी त्याला तेथील समस्यांची असलेली जाण शहरीकरणाचा ग्रामीण भागावर झालेला परिणाम, आजची बदलत असलेली पिढी, शेतकरी, महिला इत्यादी विषयांवर कवीने मार्मिकपणे बोट ठेवले आहे सहज, सोप्या आणि ओघावत्या शैलीत कवीने आपला दृष्टिकोन मांडला आहे. कविता लिहिताना कवीने एकसुरी प्रकारच्या कविता न लिहिता विविध प्रकार हाताळलेले आहे.

        खरंतर कविता ही कशी जन्माला येते त्याचे वर्णन कवी अतिशय सुंदर पणे कवितेचा जन्म या कवितेत करतो

वेदनेची कळ काळजाला टोचते

तेव्हाच मला कविता सुचते

     स्त्रियांची दुःखे विदारकपणे मांडली आहेत. स्त्री म्हणून कवितेत कवी म्हणतो

वया आधीच लग्न उरकले

हुंड्यासाठी त्यांनी छळले

स्त्री म्हणून मी जन्माला आले

जीवनात मी कित्येकदा मेले

तर कोण आहे माझं ? या कवितेमध्ये

बेइज्जतीची किनार होती कौरवांच्या सभेला

कोण आहे माझं वाटले असेल द्रौपदीला

असे मांडणी करतात. त्याचवेळी आईविषयी नव्या पिढीच्या दिखाऊ वृत्तीवरही मातृदिन या कवितेत मार्मिकपणे बोट ठेवतात.

ते म्हणतात

छळून छळून आईला तिची

महती सांगतात सारे...

चार चौघात मिरवणारे

भासवितात आम्ही कसे खरे

       सध्या समाजात आई वडिलांना न सांभाळता वृद्धाश्रमात पाठविण्याची चढाओढ लागलेली दिसते त्याविषयी व्यक्त होताना कवी म्हणतो

कळतं केलं मी ज्याला

तोच म्हणतो कळत नाही मला

कानावर हात ठेवून

उघड्या डोळ्याने बघतो जगाला

     बदल हा निसर्गाचा नियम आहे परंतु माणसात असलेली नाती गोती, भावना, माणुसकी विचार कसे बदलत चालले आहेत हे कवीने अत्यंत कमी शब्दात वर्णन केले आहे समाजमन यामध्ये

स्वार्थाची हिरवळ

दारोदारी पसरली

मनातील माणुसकी

माणसे विसरली

तसेच विरह या कवितेत

रसाळ आंबा टोकरला

पाखरांनी झाडावरती

कोयीस कोण पुसतो

रस संपून गेल्यावरती

          अशा मार्मिक शब्दात व समर्पक प्रतीकांचा वापर करून विचारांची मांडणी केली आहे

        देवाच्या शोधात या कवितेत

दगडात देव शोधण्यात जन्म अमुचा गेला

रस्त्याच्या कडेला भिकारी उपाशी मेला

माळावरल्या दगडांना आम्ही राऊळात नेले

घरातील दैवतांना आम्ही आश्रमात सोडले"

असे सत्य परिस्थितीचे विदारक वास्तव मांडले आहे

     सध्या समाजात असलेले जातीपातीचे वातावरण गंभीरता निर्माण करणारे आहे. त्याविषयी कवी समता नि एकता कवितेमध्ये म्हणतो

गुलामीच्या सोसताना कळा

एकता आम्हाला कळली होती

स्वातंत्र्यात स्वच्छंद वावरताना

जात आम्ही पाळली होती

      शेतकरी हा खरंतर सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय कवीने काव्यसंग्रहात शेतकरी यांचे कष्ण पीडा, त्रास आणि आवळून घेतलेला फास या विषयी मांडले आहे. शेतकरी आत्महत्या करतो पण त्यानेही कवीच्या विचाराचे अवलोकन केले तर

      अवहेलना यात कवी म्हणतो,

माझ्या

मरणाची 

धमकी

घरात 

कोणीच 

मनावर

घेतली

नाही

म्हणून

मी

आत्महत्येचा विचार

सोडून दिला

यात खूप मोठे सार दडलेले आहे, असे मला वाटते.

        कवीने आपल्या भावनांची गुंफण करताना कविता लय व नादमय केली आहे तरीही काही ठिकाणी वाचताना लय हरवल्या सारखे वाटते. मुक्तछंद प्रकारातही कवितांचा समावेश केलेला आहे. एवढे किरकोळ अपवाद आहेत. खरंतर याला त्रुटी म्हणता येणार नाहीत कारण ते अपवाद सुद्धा असू शकतात कविता वाचताना कवीचा हा पहिलाच काव्यसंग्रह आहे असे कुठेही वाटत नाही. मुखपृष्ठ सुद्धा अतिशय सुंदर आणि नावाला साजेसे असे झाले आहे

         एकंदरीत जगणे इथेच संपत नाही" हा काव्यसंग्रह वाचकाला जगण्याची नवी उमेद आणि सामाजिक जाणिवांची जाणिव खऱ्या अर्थाने करून देतो, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या