💥राजमा लागवड प्रक्षेत्रावर शास्त्रज्ञांच्या विशेष भेटींचे आयोजन....!


💥जिल्ह्यात नवीन पिक म्हणुन राजमा या पिकाची लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल💥


परभणी जिल्ह्यात कापुस,तुर,सोयाबीन,हळद,ऊस,हरभरा या पारंपारीक पिकांबरोबर नाविन्यपुर्ण आणि बाजारात चांगला भाव मिळणाऱ्या पिकांची लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. या वर्षीच्या रब्बी हंगामात जिल्ह्यात नवीन पिक म्हणुन राजमा या पिकाची लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसुन येत आहे. 


मागील काही हंगामात हरभऱ्यामध्ये मर लागल्यामुळे पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात होत असल्याने शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल पाहता वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी, कृषि विज्ञान केंद्र, परभणी आणि कृषियोद्धा शेतकरी उत्पादन कंपनी,ताडकळस यांच्या मार्फत या पिकाचा प्रचार व प्रसार करण्यात येत आहे. या मोहिमे अंतर्गत पुर्ण तालुक्यात राजमा या पिकाची विविध ठिकाणी लागवड करण्यात आली आहे. राजमा हे पिक रब्बी हंगामात मराठवाड्यामध्ये चांगले उत्पादन देणारे असुन त्याचे लागवड तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत योग्य रीतीने पोहोचण्यासाठी कृषि विज्ञान केंद्र, परभणी व कृषियोध्दा शेतकरी उत्पादक कंपनी मार्फत विशेष मोहीम राबवण्यात येत आहे.त्या अनुषंगाने डॉ. जी. डी. गडदे,व्यवस्थापक कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र,वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी,अमित तुपे शास्त्रज्ञ,उद्यानविद्या व सवाई सिंह निठारवाल,शास्त्रज्ञ,कृषिविद्या,कृषि विज्ञान केंद्र,परभणी यांनी पुर्णा तालुक्यातील लिमला,देवठाणा,देऊळगाव, गोळेगाव,ताडकळस इत्यादी ठिकाणी भेटी देवुन राजमा व इतर पिकांची पाहणी केली. 

                    या प्रक्षेत्र भेटी दरम्यान डॉ.जी.डी. गडदे यांनी राजमा या पिकाच्या मुळावर गाठी नसल्यामुळे नत्राची उपलब्धता कमी पडु शकते त्यामुळे पिकाला गरज पडल्यावर नत्राचा पुरवठा करण्याची सुचना केली. तसेच हरभरा या पिकाला हा चांगला पर्याय राहील असे नमुद केले. राजम्यामध्ये जिवनसत्व व प्रथिने भरपुर प्रमाणात असल्यामुळे याला बाजारपेठेतही चांगली मागणी राहील अशी अपेक्षा व्यक्त केली.यावेळी अमित तुपे यांनी पिक लागवडीबरोबरच बिजप्रक्रिया,वरुन व फुले राजमा या वाणांची माहिती,खत व फवारणीचे नियोजन आणि राजमा पिकाची काढणी करताना घ्यावयाची विषेश काळजी या बाबत संबंधितांना मार्गदर्शन केले.राजमा पिकाच्या शेंगामध्ये दाने भरण्याच्या अवस्थेत ०:५२:३४ या खताची ५० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी आणि पेरणीनंतर ४५ ते ५० दिवसांनी क्लोरँट्रेनीलीप्रौल ९.३ % + लॅमडा सायहॅलोथ्रीन ४.६ % झेडसी ४ ग्रॅम या संयुक्त किटकनाशकाची प्रति १० लिटर पाण्यामध्ये फवारणी करावी.तसेच काही ठिकाणी राजमा या पिकावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसुन येत असल्याने त्याच्या नियंत्रणासाठी ॲझोक्सीस्ट्रॉबीन १८.२ % + डायफेनकोनॅझोल ११.४ % एससी १० मिली या संयुक्त बुरशीनाशकाची प्रति १० लिटर पाण्यामध्ये टाकुन त्याची फवारणी करावी असे आवाहन केले.

सवाई सिंह निठारवाल यांनी राजमा पिकाच्या काढणी दरम्यान घ्यावयाची विषेश काळजी या बाबत माहिती दिली. तसेच या पिकाबरोबरच पुर्ण तालुक्यात ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असल्याने त्याचे योग्य व्यवस्थापन करुन प्रति हेक्टरी उत्पादकता वाढविणे गरजेचे असल्याचे नमुद केले.तसेच ऊसातील पाचट व्यवस्थापन हा सेंद्रिय कर्ब वाढविण्याचा एक उत्तम मार्ग असल्याची माहिती उपस्थितांना दिली. 

या भेटी दरम्यान कृषियोध्दा शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष उद्यान पंडीत पुरस्कार प्राप्त शेतकरी प्रताप काळे यांनी शेतकऱ्यांना राजमा लागवड ही रब्बी हंगामात शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारी बदल घडवेल अशी अपेक्षा व्यक्त केली. राजमा हे ७० ते ८० दिवसाच्या कमी कालावधीचे पिक असल्यामुळे त्याच्याकडे काटेकोरपणे लक्ष देण्याची गरज व्यक्त केली.रासायनिक पध्दतीबरोबर भौतिक व जैविक पध्दतीचा वापर वाढण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांसाठी चिकट सापळे, फेरोमन ट्रॅप, निंबोळी अर्क अशा निविष्ठा त्यांच्या शेतकरी उत्पादक कंपनी मार्फत कमी दरात उपलब्ध करुन दिल्या जात आहेत असे सांगितले. तसेच शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातुन राजमा या पिकाचे विक्री व्यवस्थापन करण्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी शेतकऱ्यांना दिली. 

या प्रक्षेत्र भेट कार्यक्रमासाठी कंपनीचे सचिव गजानन अंबोरे,पांडुरंग शिंदे, गोविंदराव दुधाटे,मुंजाभाऊ जोगदंड, श्यामराव जोगदंड,पंढरीनाथ शिंदे, विश्वनाथ जोगदंड ,सुदामराव दुधाटे, मोतीराम दुधाटे,उध्दवराव दुधाटे, हे प्रगतशील शेतकरी उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या