💥पत्रकार दिन विशेष.....राजेंद्र काळे: एक अष्टपैलू पत्रकार.....!


💥‘आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने,शब्दाचीच शस्त्रे यत्ने करु..शब्दची अमुच्या जीवाचे जीवन,शब्द वाटू धन एकमेका’💥

💥जगतगुरु तुकोबाराय यांच्या या अभंगाप्रमाणे शब्दांचा सहवास लाभलेले पत्रकार म्हणजेच राजेंद्र काळे💥 

राजेंद्र काळे यांच्या पत्रकारीतेची सुरुवात शेलसूरसारख्या ग्रामीण भागातून झाली, त्यामुळे ग्रामीण व शेतीविषयक प्रश्नांची व त्याची उकल करण्याची झलक त्यांच्या पत्रकारीतेत दिसते. १९९५ला ते जिल्हा मुख्यालय असणाऱ्या बुलडाणा शहरात आले ते केवळ लेखणी घेवून, या संघर्षमय प्रवासात १९९७ला ते स्थिरावले ‘दै.देशोन्नती’ या वृत्तपत्रात. संपादक प्रकाश पोहरे व आवृत्ती संपादक राजेश राजोरे यांच्या व्यवस्थापनात काम करतांना, बातमीसोबतच जाहीरात क्षेत्रातही त्यांनी वेगळी छाप पाडली.. परंतु त्यांचा श्वास राहीला केवळ बातमी अन् वार्तापत्रच. 

देशोन्नतीमध्ये वार्तांकन करतांना रोखठोक तेवढीच परखड भूमिका, हे त्यांच्या पत्रकारीतेचे वैशिष्ट्य. विविध वृत्तांकने त्यांची, ती गाजलीही.. पण प्रभावी ठरत गेली राजकीय वार्तापत्र. बुलडाणा जिल्ह्याच्या राजकारणाचा सखोल अभ्यास अन् प्रत्येक नेतृत्वाची व्यक्तीगत माहिती, ही त्यांच्या वार्तापत्राची स्त्रोत. प्रस्थापित राजकारण्यांचे ढोल न बडवता जिल्ह्याच्या राजकीय पटलावर नव्या नेतृत्वाची फळी काळे यांनी 'देशोन्नती'च्या माध्यमातून पुढे आणली. 

दर सोमवारी ‘देशोन्नती’त येणारे ‘वृत्तदर्पण’ हे त्यांचे वैशिष्ट्यपुर्ण सदर. आतापर्यंत अविरतपणे कुठलाही खंड न पडता ८८० आठवड्यांच्यावर हा वृत्तदर्पणचा प्रवास सुरु आहे. यासह पूर्वी रविवारी व आता शुक्रवारी येणारे ‘राजरंग’ यातही त्यांच्या निर्भीड लिखाणाची स्वतंत्र छाप दिसते. सडेतोड यासह विविध राजकीय वार्तापत्रही वाचकांची मने वेधून घेतात. १ वर्षे त्यांनी 'आकाशवाणी' या सरकारी प्रसार माध्यमासाठी बुलडाणा जिल्हा वार्तापत्रचंही लेखन केलं आहे. त्यांना आतापर्यंत शासकीय पुरस्कारासह जवळपास १२ पुरस्कार मिळालेले आहेत.

पत्रकारीता हा जरी राजेंद्र काळेंचा श्वास असलातरी, सामाजिक उपक्रम व संघटनात्मक कामातही ते सातत्याने अग्रेसर असतात. स्त्रीभ्रुणहत्येविरोधात बुलडाण्यात उभारली गेलेली ‘लेक माझी’ चळवळीत ते अग्रणी होते. त्यांच्याच आवाजातील ‘जागोजागी भेटत असते माझी मुलगी..’ ही कविता महाराष्ट्रभर गाजली. पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी आंदोलनात्मक भूमिकेत ते बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाच्या माध्यमातून पुढे आले. जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य ते अध्यक्ष, हा त्यांचा प्रवासही प्रभावी राहीला. त्यांच्याच अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत संतनगरी शेगाव येथे मराठी पत्रकार परिषदेचे ४१वे अधिवेशन पहिल्यांदाच ‘राष्ट्रीय अधिवेशन’ म्हणून भव्य दिव्य स्वरुपात पार पडला. त्यानंतर ते मराठी पत्रकार परिषदेचे अमरावती विभागीय सचिव झाले. मराठी पत्रकार परिषदेच्या उपाध्यक्षपदी सलग दोन वेळा त्यांनी काम केले. बुलडाणा जिल्हा पत्रकार संघात लोकशाही पद्धतीने त्यांनी आणलेला पारदर्शकपणा, हा त्यांचा संघटनात्मक कौशल्याचा एक भागच !

परखड पत्रकारीता करतांनाही त्यांनी जमवलेला गोतावळा, हा लक्षणीय आहे. प्रत्येक क्षेत्रात त्यांचा चाहता वर्ग तर आहेच, पण दुसऱ्यासाठी धावून जाण्याची प्रवृत्ती ही त्यांच्या सकारात्मक वृत्तीचे द्योतक आहे. सूत्रसंचालन किंवा निवेदन, हाही त्यांच्या व्यक्तीमत्वाचा एक वेगळा पैलू. 

अशा अष्टपैलू व्यक्तीमत्वाला पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..🌹

✍️मोहन चौकेकर

  *मराठी पत्रकार परिषद बुलढाणा जिल्हा प्रसिध्दी प्रमुख*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या