💥निकोप समाजासाठी विवेकशील संवाद आवश्यक - डॉ.दिप्ती गंगावणे


💥'तत्त्व-प्रकाश व्याख्यानमालेचे' 16 वे पुष्प डॉ.दीप्ती गंगावणे यांनी गुंफले💥

वाशिम (दि.16 जानेवारी) - 15 जानेवारी 2023 रोजी मातोश्री शांताबाई गोटे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील तत्त्वज्ञान विभागाद्वारे, तत्त्वज्ञान विषयातील संशोधन आणि संशोधन पद्धत्तिशास्त्राला वाहिलेल्या 'तत्त्व-प्रकाश' व्याख्यानमालेचे 16 वे पुष्प सम्पन्न झाले. हे पुष्प पुण्याच्या फर्ग्युसन. कॉलेज येथील सेवानिवृत्त तत्त्वज्ञान विभाग प्रमुख डॉ. दीप्ती गंगावणे यांनी गुंफले. 

डॉ. गंगावणे यांनी 1991 या वर्षी पुणे विद्यापीठातून डॉ. एस. सुंदरराजन यांच्या मार्गदर्शनात ''Towards a theory of persuasive competence : Studies in language and rhetoric" या विषयावर संशोधन केले. सदर संशोधन विषय व त्यातील पद्धत्तिशास्त्राला अनुसरुन त्यांनी 'विवेकशील संवाद' या विषयावर आपले व्याख्यान दिले. डॉ. गंगावणे यांनी आपल्या व्याख्यानातून, पहिल्यांदा संशोधन विषयातील पद्धतीशास्त्रावर प्रकाश टाकला. तसेच त्यांनी आपल्या संशोधन कार्यामध्ये निर्माण झालेल्या समस्या आणि त्यातील प्रकरण याविषयी माहिती दिली. 

आपल्या व्याख्यान विषयावर बोलत असताना डॉ. गंगावणे यांनी पहिल्यांदा, 'Rhetoric' म्हणजे एक प्रकारची वक्तृत्व कला आहे. या कलेच्या माध्यमातून प्रामुख्याने आपण आपले मत दुसऱ्याला पटवून देत असतो. किंबहुना दुसऱ्याला आपल्या मताशी सहमत होण्याकरिता त्याचे मन वळवीत असतो. पाश्चात्य परंपरेमध्ये सोफिस्ट संप्रदायाच्या लोकांनी पहिल्यांदा या कलेचा अवलंब केला, प्रामुख्याने त्यांनी राजकीय सभा आणि न्यायसभा इत्यादी ठिकाणी ही कला वापरण्याला सुरुवात केली. विशेष म्हणजे पैसे घेऊन ही कला तरुणांना शिकवण्याचीही त्यांनी सुरुवात केली, असे सांगत वक्तृत्व कला ही प्राचीन असल्याचे मत मांडले.

डॉ. गंगावणे यांनी प्लेटोच्या 'गॉरजिआस' आणि 'फिएड्रस' या ग्रंथातील विचाराचा तपशील देत सोफिस्टांच्या वक्तृत्व कलेची चिकित्सा केली. सोफिस्टांकडे वाकचातुर्य होते. परंतु त्यांच्या त्या कौशल्यामध्ये ज्ञाननिष्ठा, सत्यनिष्ठा, नैतिकता, मूल्यनिष्ठा, निरपेक्षता अर्थात विवेकशीलता नव्हती हे प्लेटोच्या दृष्टिकोनातून पटवून सांगितले. तसेच त्यांनी ऑरिस्टॉटल यांच्या 'रेटोरिका' या ग्रंथाचाही तपशील देत वक्तृत्व कलेविषयी त्याची भूमिका ही विशद केली. 

मध्ययुगीन कालखंडामध्ये धर्माचे प्राबल्य होतो परंतु अशा या कालखंडात देखील वक्तृत्व कलेला शैलीच्या रूपामध्ये स्वीकारण्यात आलेले होते. आधुनिक काळातील देकार्तने मात्र याच वक्तृत्व कलेला नाकारले. कारण आपण जे काही जाणतो किंवा आपल्याला जे काही ज्ञात होते त्याचा एकमेव आधार म्हणजे आपणच असतो आणि म्हणून इतरांच्या मताचा हिताचे इतरांच्या संवादाचा आपल्यावर काही परिणाम होतो असे तो मानत नसत. कांट या तत्त्ववेत्याने सुद्धा वक्तृत्व कलेला आपल्या चिंतनाचा विषय मांडला मात्र त्याने वक्तृत्व किंवा संभाषण करीत असताना नैतिकता हा त्याचा आधार असला पाहिजे ही अपेक्षा केली. 

पाश्चात्य परंपरेमध्ये वक्तृत्व कलेविषयी सर्वाधिक चर्चा ही विसावा शतकानंतर झाली. केनेथ बर्क यांनी ''Permanence and change'' आणि  ''Rhetoric of motives'' या पुस्तकातून तर पर्लमन यांनी ''New Rhetoric and The Humanities'' आणि ''The idea of justice and the problem of argument'' या पुस्तकातून आणि युर्गेन हाबरमास यांनी ''Towards A theory of communicative competence'' आणि ''The theory of communicative action, Vol. 1'' या पुस्तकातून वक्तृत्व कलेविषयी आपल्या चिंतन मांडले आहे. वक्तृत्व कला ही शेवटी भाषेचाच एक प्रकार मानावा लागतो आणि यामध्ये संवाद, संवादाचे नियम, युक्तिवाद आणि त्या युक्तिवादाला अनुसरून घेतले जाणारे निर्णय या सर्वांचाही विचार केला जातो. याच अनुषंगाने स्टीफन तुलमिन यांनी युक्तिवादांच्या स्वरुपाची केलेली चिकित्सा डॉ. गंगावणे यांनी विशद करून सांगितली.

आपल्या व्याख्यानाचा शेवट करीत डॉ. दीप्ती गंगावणे यांनी विविध तत्त्ववेत्यांच्या भूमिकांच्या अभ्यासावरून आपलेही मत मांडले. त्यांनी वक्तृत्व कलेला 'विवेकशील संवाद' असे नाव दिले. त्याला अनुसरून त्यांनी, "वक्तृत्व कलेमध्ये अर्थात आपले मत दुसऱ्याला पटवून देताना आपण नैतिकतेचा वापर करावा. आपण इतरांच्या मताचाही विचार करावा. विशेष म्हणजे आपण आपल्या मतांचा सुद्धा विचार केला पाहिजे. जर आपण आपल्या मताचे चिंतन केले नाही तर सामाजिक, राजकीय परिस्थिती बिघडत जाते.  समाजातील व्यक्ती म्हणून आपण असहिष्ण होता कामा नये. सामाजिक जीवन जगत असताना विवेकशील संवाद होणे आवश्यक आहे. विवेकशील संवादामध्ये बुद्धीचा आधार घेतला पाहिले. त्या आधारे नैतिक व सामाजिक मूल्यांची जोपासना झाली पाहिजे आणि असा हा विवेकशील संवादच खऱ्या अर्थाने निकोप समाजासाठी आवश्यक असतो," असा आशय व्यक्त केला.

व्याख्यानाच्या प्रारंभी व्याख्यानमालेचे आयोजक तत्त्वज्ञान विभाग प्रमुख डॉ. वेदप्रकाश डोणगावकर यांनी वक्त्यांचा परिचय करुन देत व्याख्यानमालेचा उद्देश स्पष्ट केला आणि व्याख्यानानंतर व्याख्यात्यांचे व उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रतील व राज्याबाहेरील विद्यापीठाचे प्राध्यापक, अभ्यासक, संशोधक, विद्यार्थी आणि तत्त्वज्ञान प्रेमी उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या