💥मराठी पत्रकार परिषदेच्या चळवळ वाढीसाठी ‘सोशल मिडीया’चे योगदान मोठे - मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख


💥एस.एम.देशमुख यांचे प्रसिद्धी प्रमुखांच्या ऑनलाईन बैठकीत प्रतिपादन💥 

💥प्रसिध्दी प्रमुखांना राज्यस्तरीय ‘उत्कृष्ठ जनसंपर्क प्रमुख’ पुरस्कार देण्याची घोषणा💥

✍️ मोहन चौकेकर 

मुंबई (दि.14 जानेवारी) - मराठी पत्रकार परिषद या 85 वर्षाची संघटनेचे नियतीने दिलेले उत्तरदायित्व निभाऊन आपण मराठी पत्रकार परिषद भरभक्कमपणे उभी केली आहे. मराठी पत्रकार परिषदेमुळेच आज संपूर्ण महाराष्ट्रात 6 जानेवारी ‘पत्रकार दिन’ म्हणून साजरा होतो. त्या निमित्ताने आपण राबविलेल्या विविध उपक्रमातून संघटनेसोबतच मराठी पत्रकार परिषदेची मोठी चळवळ पाहून आज कृतकृत्य होण्याची संधी लाभली, त्यामुळेच भांडवलदारी मालकवर्गाची पोटदूखी वाढल्याने मराठी पत्रकार परिषदेमुळे मोठे झालेले चार चौघे व काहींची ‘मजबुरी’ असलेल्यांना हाताशी धरून भांडवलदारी मालकधार्जिण्या पत्रकार संघटना उभ्या केल्या जात आहेत. तरीही परिषद त्यांना पुरुन उरली असून याचे श्रेय सर्वस्वी  ‘सोशल मिडीयाचे’ आहे. परिषदेच्या चळवळ वाढीसाठी ‘सोशल मिडीया’ हा महत्त्वाचा घटक असून पत्रकारांच्या कल्याणासाठी परिषदेची धोरणात्मक भूमिका पत्रकारांसहीत समाजसमोर पोहोचविण्याचे काम जागृतपणे प्रसिद्धी प्रमुखांनी करावे असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी काल रात्री राज्यातील पदाधिकारी व जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांच्या ऑनलाईन बैठकीत मार्गदर्शन करतांना केले. या ऑन लाईन बैठकीस परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलींद अष्टीवकर, कोषाध्यक्ष विजय जोशी, राज्य जनसंपर्क प्रमुख अनिल महाजन आदी पदाधिकारी उपस्थित होते.


मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख मार्गदर्शन करतांना पुढे म्हणाले, आदर्श जिल्हा व तालुका संघ पुरस्कार सोहळा 5 मार्च रोजी चाकुर येथे होणार असून राज्यातील 354 तालुक्यातील अधिकाधिक तालुकाध्यक्षांनी या मेळाव्यास यावे. 3 मार्च रोजी पिंप्री-चिंचवड ते चाकुर या शिक्रापुर, रांजणगाव, शिखर, पारनेर, फाटा, जामखेड, पाटोदा, बीड, अंबेजोगाई, लातूर मार्गे चाकूर येथे पोहचणाऱ्या भव्यदिव्य एकता ज्योत रॅलीत आपल्या वाहनास परिषदेचा झेंडा, स्टिकर लावून मोठ्या संख्येने सामील होऊन गावागावात सरपंच पदाधिकारी यांच्याशी संवाद साधत परिषदेची भूमिका समजावून सांगावी. लाईव्ह कव्हरेज करावे असे आवाहन केले. फेब्रुवारी महिन्यात 10 व 11 तारखेस सिंधुदुर्ग जिल्ह्यात आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारकाच्या लोकार्पण समारंभासह  डिजीटल मिडीया राज्य प्रमुख अनिल वाघमारे व सरचिटणीस हाजीर मन्सुरभाई शेख यांच्या पुढाकाराने फेब्रुवारी अखेर नगर येथे डिजीटल मिडीयाचे नियोजित राज्यव्यापी मेळाव्यात उपस्थित राहात उपक्रमशील राहण्याचे आवाहन केले. तसेच चाकुर येथील मेळाव्यात मराठी पत्रकार परिषदेचे माजी सरचिटणीस, रायगडचे झुंजार पत्रकार स्व. संतोष पवार यांच्या स्मरणार्थ राज्यातील एका प्रसिद्धी प्रमुखास ‘उत्कृष्ट जनसंपर्क प्रमुख’ पुरस्काराने गौरविण्यात येईल अशी घोषणा केली. या घोषित केलेल्या पुरस्कारामुळे राज्यातील जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अधिक जोमाने कार्यरत असल्याने चुरस दिसून येत आहे.

परिषदेचे विश्वस्त किरण नाईक यावेळी मार्गदर्शन करतांना म्हणाले, मराठी पत्रकार परिषदेच्या कार्याचा राज्यकर्त्यांनी धसका घेतला आहे. कारण परिषद कुणाचीही मिंधी नाही. सरकारने ‘अ’ वर्गाच्या धनाढ्य मालकवर्गाला कामाला लावून भांडवलदारी मालकांच्या पत्रकार संघटना उभ्या करणे सुरु केले आहे. मात्र ‘ब’ आणि ‘क’ वर्गाचे मालक आपल्या संघटनेसोबत आहेत, त्यामुळे निराश होण्याचे कारण नाही. परिषदेचे काम उत्तम आहे. जो उत्तम काम करेल त्याला आपोआप पोच मिळेल. त्यामुळे मराठी पत्रकार परिषद एकूणच पत्रसृष्टीत अग्रभागी आपली प्रतिमा टिकवून असल्याचे किरण नाईक यांनी नमूद केले. पुणे ते चाकुर अशा नियोजित एकता ज्योत रॅली राज्यातून 100 वाहने सहभागी होतील असे कोषाध्यक्ष विजय जोशी यांनी नमूद केले.

मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शरदजी पाबळे यांनी बैठकीच्या प्रारंभी बैठकीच्या आयोजनाबाबत भूमिका विषद केली व बैठकीचे सुत्रसंचलन केले.  राज्य जनसंपर्क प्रमुख अनिल महाजन यांनी आभार मानले. या बैठकीस प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कोषाध्यक्ष विजय जोशी, सरचिटणीस हाजी मन्सुरभाई शेख , भारत निगडे (पुणे), सुभाष राऊत (नागपूर), संदीप कुलकर्णी (अहमदनगर),  जमीर खलपे (रत्नागिरी), अमोल वैद्य (अहमदनगर), अमर राऊत (बुलढाणा), सुरेश नाईकवाडे (परभणी), संजय हंगे (बीड), मोहन चौकेकर (बुलढाणा), प्रशांत साळुंके (लातुर), यशवंत पोटे (भंडारा), ॲड. दिगंबर गायकवाड (नांदेड), प्रकाश इंगोले (हिंगोली), लंकेश बारांडे (गडचिरोली), आदींसह तीस जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांनी यावेळी चर्चेत आपला सहभाग नोंदविला.....  

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या