💥आरोग्य शिक्षणाच्या माध्यमातून जिल्हा कुष्‌ठरोगमुक्त करूया - मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मून


💥‘कुष्ठरोगाविरुद्ध लढा देऊन,कुष्ठरोगाला इतिहास जमा करुयात’ यंदाचे घोषवाक्य💥

परभणी (दि.19 जानेवारी): जिल्ह्यातील कुष्ठरुग्णांना योग्य उपचार करण्यासाठी व्यापक प्रमाणावर जनजागृती करणे आवश्यक असून, जिल्हा कुष्ठरोगमुक्त करण्यासाठी आरोग्य विभागातील सर्वांनी सहभागी होऊन कुष्ठरुग्णांच्या आरोग्य शिक्षणावर भर देण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून यांनी आज येथे सांगितले. 

जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित कुष्ठरोग निवारण दिन आणि पंधरवाड्याचे आयोजनाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. आरोग्य सेवा (कुष्ठरोग) सहायक संचालक तथा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहूल गिते, यांच्यासह जिल्हा आरोग्य यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.

दर वर्षीप्रमाणे जिल्ह्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रीय तसेच अंतरराष्ट्रीय स्तरावर कुष्ठरोग निवारण दिन साजरा करण्याबाबत केंद्र शासनाच्या निर्देशानुसार स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानांतर्गत कुष्ठरोग निवारण दिन व ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०२३ या पंधरवड्यात आरोग्य शिक्षणाचे विविध जनजागृतीविषयक कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे श्री. मून यांनी सांगितले. 

कुष्ठरोगाविरुद्ध लढा देऊन, कुष्ठरोगाला इतिहास जमा करुयात’ यंदाचे घोषवाक्य असून, स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानांतर्गत अनेक जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.  पंधरवड्यात शाळेमध्ये प्राथनेनंतर कुष्ठरोगाबाबतच्या प्रतिज्ञाचे वाचन करण्यात येणार आहे.  शाळेतील सूचना फलकावर कुष्ठरोगाबाबत संदेश लिहिण्यात येणार आहे.  शाळेमध्ये नुक्कड़ नाटक, प्रश्नमंजुषा स्पर्धा, निबंध स्पर्धा, कुष्ठरोगावरील गाणी, कविता वाचन, कटपुतळी, चित्रकला स्पर्धा पथनाट्य आदी जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. लवकर निदान व वेळेवर उपचाराचे महत्त्व तसेच कुष्ठरोगाविषयीचे गैरसमज आदींबाबात जनतेमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. 

 जिल्ह्यातील कुष्ठरोग जनजागृती अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निय मून यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय समितीची बैठक आज पार पडली.  या  बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मून यांनी कार्यक्रम राबविण्यासाठी उपस्थितांना निर्देश दिले. 

भारतीय प्रजासत्ताक दिनी म्हणजेच २६ जानेवारी रोजी आयोजित ग्रामसभेमध्ये ‘स्पर्श कुष्ठरोग जनजागृती मोहीम’ अंतर्गत कुष्ठरोग जनजागृती करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या कुष्ठरोगाबाबतच्या घोषणापत्राचे वाचन करण्यात येणार असून,  यावेळी ग्रामप्रमुख, सरपंच गावकऱ्यांना मार्गदर्शन करतील. तसेच कुष्ठरोगाबाबत प्रतिज्ञा घेणे, ग्रामसभेमध्ये महात्मा गांधी यांचा पेहराव करणाऱ्या व्यक्तीने संदेश देण्यात येणार असून, कुष्ठरोगाविषयी प्रश्नोत्तरे, कुष्ठरुग्णांचा सत्कार व त्यांच्यामार्फत कुष्ठरोगविषयक संदेश देणे, त्याचे वाचन करणे, आभार प्रदर्शन करुन घेणे आदी कार्यक्रमांचा त्यात समावेश आहे.

स्थानिक महिला मंडळे, बचत गट, तरुण मंडळाच्या सभा आयोजित करण्यात येणार असून, खासगी वैद्यकीय व्यावसायिकांच्या कार्यशाळेचे आयोजन तसेच बाजाराच्या ठिकाणी प्रदर्शन व आरोग्य मेळावे घेण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मून यांनी उपस्थितांना सांगितले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या