💥सामाजिक प्रश्नासाठी पत्रकारांनी रस्त्यावर उतरावे का ?


💥लेखणीच्या माध्यमातून प्रश्न सुटत नसेल तर पत्रकारांनी रस्त्यावर उतरुन लोकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे💥


सामाजिक प्रश्नासाठी पत्रकारांनी रस्त्यावर उतरावे का? असा सूर काही जण आळवत असतात.. त्याची काही गरज आहे का असाही सवाल उपस्थित करतात.. मला वाटतं लेखणीच्या माध्यमातून प्रश्न सुटत नसेल तर पत्रकारांनी शक्य असेल ते सर्व मार्ग वापरून लोकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे.. मराठी पत्रकार परिषदेची हीच परंपरा आहे.. परिषदेचे बहुतेक पदाधिकारी हे चळवळीशी नातं सांगणारे होते.. स्वातंत्र्य लढा असो, संयुक्त महाराष्ट्रासाठीचा लढा असो की, वृत्तपत्र स्वातंत्र्यासाठीचा लढा असो की, बिहार प्रेस बिलच्या विरोधात मराठी पत्रकारांनी दिलेला लढा असो.. परिषदेचे अनेक शिलेदार या लढ्यात सहभागी झाले.. काहींनी तुरूंगवासही भोगला... या पार्श्‍वभूमीवर लोकहिताचा विषय घेऊन परिषदेच्या विविध शाखांचे पत्रकार जेव्हा रस्त्यावर उतरतात तेव्हा आम्हाला त्यांचा नक्कीच अभिमान वाटतो आणि आम्ही सर्व शक्तीनिशी त्यांच्या पाठिशी उभे राहतो.. कोकणातील पत्रकारांचा मुंबई गोवा महामार्गासाठीचा लढा असो, सेझ विरोधी लढा असो की, दापोलीतील पत्रकारांनी आरोग्याच्या प्रश्नावर पुकारलेला एल्गार असो. आम्हाला या सर्व "चळवळ्या" पत्रकारांचा नेहमीच अभिमान वाटत आलेला आहे किंवा वाटत असतो.


दापोलीतील पत्रकार आरोग्य सेवा सक्षम करावी, डॉक्टरांच्या रिक्त जागा भराव्यात यामागणीसाठी आज आमरण उपोषण करीत आहेत.. पत्रकारांवर अशी वेळ यावी हे व्यवस्थेसाठी भूषणावह नाही.. त्यामुळे रतनागिरीचे पालकमंत्री असोत,आरोग्यमंत्री असोत किंवा मुख्यमंत्री असोत त्यांनी या प्रश्नात लक्ष घालून दापोलीच्या पत्रकारांचे उपोषण सुटेल या दृष्टीने निर्णय घ्यावा. सामाजिक संस्थांना पत्रकारांचे नेहमीच सहकार्य असते.. आज सामाजिक प्रश्न घेऊन जर पत्रकार रस्त्यावर आले असतील तर सामाजिक संस्थांनी देखील दापोलीच्या पत्रकारांना साथ दिली पाहिजे..

रत्नागिरी आणि महाराष्ट्रातील पत्रकार दापोलीच्या मित्रांसोबत आहेत.. परिषदेच्यावतीने या संबंधीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात येत आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या