💥महाराष्ट्राच्या 56 व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची जय्यत पूर्वतयारी.....!


💥श्रद्धा,आवड आणि समर्पणाचे अनुपम दृश्य💥


✍️ मोहन चौकेकर 

औरंगाबाद (दि.18 जानेवारी) : महाराष्ट्राच्या 56 व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या तारखा जसजशा जवळ येत चालल्या आहेत तसतसे निरंकारी भक्तगणांकडून समागमाच्या पूर्वतयारीला वेग आला आहे. या विशाल संत समागमाची पूर्वतयारी मागील 25 डिसेंबरपासून विधिवत रूपात सुरु झाली आणि तेव्हापासून केवळ औरंगाबादच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांतून हजारोंच्या संख्येने निरंकारी भक्तगण व निरंकारी सेवादलाचे महिला व पुरुष स्वयंसेवक समागम स्थळावर येऊन मोठ्या श्रद्धेने, आवडीने आणि समर्पणाच्या भावनेने आपल्या निष्काम सेवा निरंतर अर्पण करत आहेत.  


विदित असावे, की औरंगाबादमधील बिडकीन स्थित डीएमआयसीच्या मैदानांवर दिनांक 27 ते 29 जानेवारी, 2023 दरम्यान संत निरंकारी मिशनच्या आध्यात्मिक प्रमुख परम पूज्य सद्गुरु माता सुदीक्षाजी आणि त्यांचे जीवनसाथी निरंकारी राजपिताजी यांच्या पावन सान्निध्यात हा संत समागम आयोजित होत आहे. 

महाराष्ट्राचा वार्षिक निरंकारी संत समागम अनेकतेत एकता, भक्ती, प्रेम व मानवता यांचा एक अनुपम संगम असतो ज्यामध्ये केवळ निरंकारी भक्तगणच नव्हे तर ईश्वरामध्ये आस्था बाळगणारा प्रत्येक मनुष्य सहभागी होऊन मिशनच्या दिव्य शिकवणूकीतून प्रेरणा घेऊन स्वत:ला धन्य समजत असतो. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी या संत समागमामध्ये विविध संस्कृती, सभ्यता यांचा विलोभनीय मिलाफ झाल्याचे सुंदर दृश्य साकार होईल ज्यातून अलौकिक आनंदाची अनुभूती प्रत्येकाला प्राप्त होऊ शकेल.  

समागम स्थळावर स्वच्छतेविषयक सेवा असो, ट्रॅक्टरची सेवा असो, राजमिस्त्रींची सेवा असो, लंगरची सेवा असो किंवा अन्य कोणत्याही प्रकारची सेवा असो समस्त भक्तगण त्यामध्ये हिरीरिने भाग घेऊन आपले भरपूर योगदान देत आहेत. यामध्ये बालक असोत, युवावर्ग असो किंवा वयस्कर मंडळी असोत सर्वांमध्ये एक नवऊर्जा व उत्साहाचा संचार झाल्याचे चित्र दिसत आहे. संत समागमाच्या सेवेत भाग घेता आला याबद्दल हे भक्तगण स्वत:ला भाग्यवान समजत असून सद्गुरु माताजींच्या प्रति कृतज्ञतेचे भाव व्यक्त करत आहेत......

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या