💥‘गाथा मराठवाडा मुक्ती संग्रामाची’ हा विशेष कार्यक्रम रविवार दि.15 जानेवारी पासून आकाशवाणी केंद्रावर....!


💥श्रोत्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी अरुण सूर्यवंशी व आकाशवाणी केंद्र प्रमुख जोशी यांनी केले💥 

परभणी (दि.13 जानेवारी) : मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त जिल्हा माहिती कार्यालय आणि आकाशवाणी केंद्र परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाडा मुक्तीसंग्रामात परभणी जिल्ह्याने दिलेल्या योगदानाच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी ‘गाथा मराठवाडा मुक्ती संग्रामाची’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा आकाशवाणीच्या श्रोत्यांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी अरुण सूर्यवंशी आणि आकाशवाणी परभणी केंद्र प्रमुख सतिष जोशी यांनी केले आहे.

मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्तच्या परभणी आकाशवाणी केंद्रांवर १५ ते २१ जानेवारी या कालावधीत जिल्ह्यातील तज्ज्ञ इतिहास अभ्यासक, प्राध्यापक परभणी जिल्ह्याने मुक्ति संग्रामात दिलेल्या योगदानाच्या स्मृतींना उजाळा देणार आहेत. आकाशवाणी केंद्र परभणी येथून प्रसारित होणारा हा विशेष कार्यक्रम सकाळी 7.40 वाजता ऐकता येणार आहे. 

रविवारी (दि. 15) ‘मराठवाडा मुक्ती संग्रामात गीताबाई चारठाणकर यांचे योगदान’ याविषयी दिलीप देशपांडे चारठाणकर हे श्रोत्यांना माहिती देतील. सोमवारी (दि.16) ‘मराठवाडा मुक्ती संग्रामात महिलांचे  योगदान’ याविषयी डॉ. मधुबाला बोराडे या बोलतील. त्यानंतर मंगळवारी (दि. 17) ‘मराठवाडा मुक्ती संग्रामात स्वातंत्र्य सैनिक मुकुंदराव पेडगावकर यांचे मुक्ती संग्रामातील योगदान’ याविषयी प्राध्यापक जाधव हे बोलतील. बुधवारी (दि.18 ) विशेष कार्यक्रमामध्ये ‘मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांच्या गाथा’ याविषयी प्रा. डॉ. गणपत पिसे यांनी दिलेली माहिती श्रोत्यांना ऐकायला मिळणार आहे.

गुरुवारी (दि.19) ‘परभणी जिल्ह्याचे महाराष्ट्र परिषदांमधून मुक्तिसंग्रामातील योगदान’ याविषयी प्राध्यापक मोतीराम कदम यांच्याकडून माहिती ऐकता येणार आहे. तसेच शुक्रवारी (दि.20) परभणी आकाशवाणी केंद्रावर ‘स्वामी रामानंद तीर्थ आणि मराठवाडा मुक्ती संग्राम’ याविषयी प्रा. डॉ. नितीन बावळे स्वामी रामानंद तीर्थांच्या स्मृतींना उजाळा देतील. तर शेवटच्या दिवशी शनिवारी (दि. 21) सकाळी 07:40 वाजता गाथा मराठवाडा मुक्ती संग्रामाची या मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात ‘मराठवाडा मुक्ती संग्रामात राष्ट्रीय शाळांचे योगदान’ याविषयावर पत्रकार दिनकर देशपांडे श्रोत्यांना माहिती देतील. सलग सात दिवस परभणी जिल्ह्याने दिलेल्या योगदानाच्या महान कार्याच्या स्मृतींना उजाळा देणाऱ्या या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा माहिती कार्यालय आणि परभणी आाकाशवाणी केंद्राच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या