💥परभणी जिल्ह्यात ज्येष्ठांच्या समस्या निराकरणासाठी 14567 क्रमांकावर नि:शुल्क सेवा.......!


💥जेष्ठ नागरिकांनी 14567 या नि:शुल्क क्रमांकावर संपर्क साधून समस्यांचे निराकरण करुन घ्यावे - सहा.आयुक्त गिता गुठ्ठे 

परभणी (दि.25 जानेवारी) :  घरगुती समस्यांसह ज्येष्ठ नागरिकांना इतर अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशा ज्येष्ठ नागरिकांना या समस्येतून बाहेर काढण्यासाठी केंद्र शासनाच्या मदतीने एल्डर लाइन उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गंत 14567 या नि:शुल्क क्रमांकावर संपर्क साधून समस्यांचे निराकरण करुन घ्यावे, असे आवाहन  समाजकल्याणच्या सहायक आयुक्त श्रीमती गिता गुठ्ठे यांनी केले आहे. 

ज्येष्ठ नागरिकांनी या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधल्यास माहिती, मार्गदर्शन, भावनिक आधार आणि मदत या पातळीवर आधार दिला जातो. गेल्या दोन-तीन महिन्यात परभणी जिल्ह्यात अनेक ज्येष्ठांना या उपक्रमाचा आधार मिळाला आहे. जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून, अनेकांना मुले सांभाळत नाहीत. यासह इतरही घरगुती समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या सर्व समस्यांच्या सोडवणुकीसाठी केंद्र शासनाच्या अंतर्गत 14567 या हेल्पलाइन नंबरवर सेवा सुरु आहे. या क्रमांकावर संपर्क साधल्यास ज्येष्ठांच्या तक्रारीनुसार त्यांची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. या एल्डर लाइनचे जिल्हा क्षेत्रीय अधिकारी दिपक कन्हाळे हे याबाबत मार्गदर्शन करत आहेत.   

  यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन, भावनिक आधार आणि क्षेत्रीय पातळीवर मदत केली जाते.  वृद्ध अथवा ज्येष्ठ नागरिकांना निवास, वृद्धाश्रमाबाबत माहिती हवी असेल तर ती दिली जाते. सांस्कृतिक, आध्यात्मिक, कला, करमणूक, कायदेविषयक माहितीही दिली जाते. कौटुंबिक स्तरावर विवाद असेल, मालमत्ताबाबत तसेच पेन्शन, सरकारी योजनांची दिरंगाई याबाबतही ज्येष्ठांना मदत केली जाते. आई वडिल व जेष्ठ नागरीक यांच्या चरितार्थ अधिनियम 2007 नियम 2010 अन्वये नमुना प्रमथ- 'अ' 'मध्ये जेष्ठांना न्याय मिळविण्यासाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, जायकवाडी वसाहत, परभणी येथे अथवा उपविभागीय अधिकारी, परभणी, गंगाखेड, सेलू आणि पाथरी येथे अर्ज करू शकतात, असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण श्रीमती गुठ्ठे यांनी कळविले आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या