💥परभणी येथील पंडीत प्रदीपजी मिश्रांच्या 05 दिवशीय शिवपुराण कथेच्या समारोपीय कथेस उलटला भक्तांचा जनसागर....!


💥मैदान अपूरे,रस्तेही गजबजले : भक्तांद्वारे अभूतपूर्व प्रतिसाद💥

परभणी (दि.17 जानेवारी) : पंडीत प्रदीपजी मिश्रा यांच्या पाच दिवशीय शिवपुराण कथेच्या समारोपास म्हणजे आज मंगळवार दि.17 जानेवारी 2023 रोजी उलटलेल्या भक्तांच्या जनसागराने कथा स्थळाचे मैदान, दुतर्फा रस्तेही अपूरे पडले. पाथरी महामार्गावर दोन्ही बाजूंनी पार्कींग स्थळाच्या पलिकडेपर्यंत मोकळी जागा दिसेल तिथपर्यंत भक्तांनी ठाण मांडून ही शिवपुराण कथा श्रवण केली.

          शिवपुराण कथा सोहळ्याच्या पहिल्या दिवसापासूनच उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. उलट प्रत्येक दिवस कथेस जोरदार प्रतिसाद  मिळत गेला. भक्तांची गर्दी दिवसागणिक वाढतच राहीली. मंगळवारी म्हणजे समारोपीय दिवशी या कथा सोहळ्यातील गर्दीने अक्षरशः उच्चांक केला.

          मंगळवारी पहाटेपासून रेल्वेसह एसटी महामंडळाच्या बसेसने मराठवाड्यासह राज्याच्या अन्य भागातूनही मोठ्या प्रमाणावर भाविक दाखल होत गेले. महानगराच्या चोहोबाजूंनीही भाविकांचे जथ्ये  कथा सोहळ्याकडे रवाना होत होते. वसमत रस्ता, स्टेशन रोड पासून जिंतूर रस्त्यावर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. चोहोबाजूंच्या वसाहतीतून कार्यकर्त्यांनी केलेल्या मोफत वाहन व्यवस्थेचा भाविकांना मोठा आधार झाला.         बसस्थानकावर एकाच वेळी दहा-दहा बसेसमधून भाविकांचे होणारे आगमन व कथा सोहळ्याकडील रांगा या समारोपीय सत्रात अभूतपूर्व गर्दी करणार, हे चित्र स्पष्ट झाले होते.

            या पार्श्‍वभूमीवर संयोजन समितीसह वाहतूक पोलिस यंत्रणा, स्वयंसेवी संस्था वगैरेंनीही या भाविकांकरीता सर्वतोपरी मदतीचा हात पुढे केला. त्यामुळे जो तो भाविक विसावा नाक्यापासून कथा सोहळ्याकडे सुरळीतपणे प्रस्थान करीत राहीला. परंतु, सकाळी 8 च्या सुमारास कथा सोहळ्याचा संपूर्ण परिसर गर्दीने ब्लॉक झाला. त्यामुळे भाविकांनी पाथरी महामार्गावर दोन्ही बाजूंनी जागा मिळेल त्या ठिकाणी ठाण मांडले. स्क्रिनची व्यवस्था नसतांनासुध्दा कथा कानावर पडतेय, हे ओळखून जागा हेरल्या. अन् कथा श्रवण केली. सकाळी 9 नंतरसुध्दा भाविकांचे जथ्ये पाथरी रस्त्यावर दाखल होत होते. त्यामुळे मुख्य मंडपापासून चोहोबाजूंनी अभूतपूर्व अशा गर्दीचे चित्र ड्रोन कॅमेर्‍यांनी टिपले. माध्यमांच्या प्रतिनिधी, छायाचित्रकारांनी आपल्या कॅमेर्‍यांमधून गर्दी टिपण्याचा प्रयत्न केला. परंतु, या अभूतपूर्व गर्दीचे, जनसागराचे क्षण फक्त डोळ्यात टिपता आले. कॅमेर्‍यांमधूनसुध्दा हे दृश्य एकत्रितपणे टिपता आले नाहीत.

         समारोपीय सत्रातील या अभूतपूर्व गर्दीने संयोजक खासदार जाधव व त्यांचे कार्यकर्ते, पदाधिकारी अक्षरशः भाराहून गेले. खासदार जाधव हे भावूक झाले. कथाकार प.पू. मिश्राजी महाराज यांनीसुध्दा आपल्या समारोपीय सत्रातून भाविकांच्या गर्दीची, शांतपणाची दखल घेतली. पाच दिवशीय सोहळा अतीशय सुरळीतपणे पार पडला.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या