💥भारतीय संविधानाने दिलेले हक्क नागरिकांनी सर्वप्रथम समजून घ्यावेत आणि आपल्या हक्कांबाबत जागरुक राहावे....!


💥विशेष चर्चासत्रात मान्यवरांचा सूर : ग्राहकांनी आपल्या हक्कांबाबत जागरुक‍ व्हावे💥


परभणी, दि. 22 (जिमाका): प्रत्येक नागरिक दैनंदिन जीवनात ग्राहक असून, त्याला भारतीय संविधानाने दिलेले हक्क  सर्वप्रथम समजून घ्यावेत आणि आपल्या हक्कांबाबत जागरुक राहावे, असा सर्व मान्यवरांनी सूर व्यक्त केला. राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी विविध मान्यवरांनी सहभाग नोंदवला.  


या चर्चासत्राला अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती मंजुषा मुथा, जिल्हा तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्ष श्रीमती ए. जी. सातपुते, ॲड. अजय व्यास, डी. यु. दराडे, ॲड. व्यवहारे, ॲड. गजानन चव्हाण, अखिल भारतीय ग्राहक पंचायत देवगिरी प्रांत अध्यक्ष ॲड. विलास मोरे, परदेशी  ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या यांची प्रमुख उपस्थिती होती.   

दरवर्षी 24 डिसेंबर हा ‘राष्ट्रीय ग्राहक दिन’ म्हणून साजरा केला जातो. यावर्षी राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या ‘ग्राहक आयोगातील तक्रारी प्रभावीपणे निकाली काढणे’ (इफेक्टीव्ह डिस्पोजल ऑफ केसेस इन कन्झ्युमर कमिशन) या संकल्पनेवर आधारित हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.शेतक-यांनी प्रधानमंत्री पिक विमा काढल्यानंतर त्याची पोचपावती जपून ठेवावी. त्यावर दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. नैसर्गिक आपत्तीमध्ये पिकांचे नुकसान झाले असल्यास त्यांनी 72 तासाच्या आत पंचनामे करावेत. त्याचा तसा अहवाल विमा कंपनी किंवा कृषि विभागाकडे पाठवावा. त्यामुळे शेतक-यांना पिक विम्याच्या माध्यमातून नुकसान भरपाई मिळण्यास मदत होऊ शकेल. तसेच या 72 तासांची अट शिथिल करुन त्याची कालमर्यादा वाढवावी. क्षेत्रीय स्तरावर प्रत्येक शेतक-याच्या बांधावर जावून नुकसानीचे पंचनामे करणे शक्य होणार नाही. त्यामुळे शक्य असल्यास ड्रोनद्वारे पंचनामे करता येतील, तसेच ड्रोनद्वारे नुकसानी पंचनामे करणा-या  कंपन्यांनाच विमा खरेदीसाठी राज्य शासनाने परवानगी द्यावी, अशा सूचना शेतक-यांनी केल्या.

ग्राहकांचे हित, त्यांचे हक्क अबाधित ठेवण्यात आले असून, त्यांच्या हक्कांचे संरक्षण झाले पाहिजे. त्यांच्या वस्तूची सुरक्षितता आणि त्याचा दर्जा उच्च असला पाहिजे. हे समजण्यासाठी ग्राहकाला त्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. कंपनीकडून ग्राहक फसविला गेला असल्यास त्याला त्याविरोधात तक्रार करुन दाद मागण्याची सोयही करुन देण्यात आली असल्याचे अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी सांगितले.

प्रधानमंत्री पिक विमा योजनेत अनेक शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत. त्यासाठी विमा कंपन्यांनी त्या सोडविण्यासाठी त्या कालावधीत अतिरिक्त मनुष्यबळाचा वापर करुन शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविणे आवश्यक असते. महसूल विभागाकडून कृषि विभाग आणि विमा कंपन्यांचे अधिकाऱ्यांसोबत बैठका घेत आढावा घेण्यात येतो. पिक विमा भरताना शेतक-यांनी कंपन्यांनी टाकलेल्या अटी शर्तींचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असल्याचे डॉ. काळे यांनी सांगितले. त्यावर विमा कंपन्यांच्या काही जाचक अटी बदलण्याच्या सूचना शेतक-यांनी केल्या. नैसर्गिक आपत्तीचे संकट आल्यानंतर महसूल यंत्रणा संवेदनशिलतेने काम करते. शेतक-यांना विमा भरताना किंवा पिकाची आणेवारी, टक्केवारी काढताना कंपन्यांनी मदत करणे अपेक्षित असते. मात्र, नेमके तेव्हाच विमा प्रतिनिधी बेजबाबदार वागतात, असे अपर जिल्हाधिकारी डॉ. काळे यांनी सांगितले. तरीही भविष्यात महसूल प्रशासन शेतक-यांना येणाऱ्या अडचणी, त्यांनी केलेल्या सूचना राज्य शासनाकडे पाठवून पाठपुरावा करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ग्राहकांनी त्यांच्या तक्रारी जिल्हा तक्रार निवारण मंचाकडे दाखल केल्या पाहिजेत. त्यांच्या तक्रारी सकारात्मकपणे आयोगाकडून विनाविलंब निकाली काढल्या जातात, असे सांगून त्यांनी कोविड19 काळात तक्रारींच्या निपटाऱ्याबाबत माहिती दिली. तसेच ग्राहकांनी त्यांच्या हक्कांबाबत योग्यत ती माहिती घ्यावी. निवारण मंचाकडे तक्रार नोंदवताना आणि ती केस लढताना ग्राहकाला वकील लावण्याची आवश्यकता नसते, असे आयोगाच्या अध्यक्ष श्रीमती ए. जी. सातपुते यांनी सांगितले.

ग्राहकांच्या सहा हक्कांची त्यांनी उपस्थितांना माहिती दिली. सोबतच ग्राहक तक्रार निवारण कायद्यात सुधारणा झाली पाहिजे, असे सांगून हे कायदे सुटसुटीत आणि सर्वसामान्य नागरिकाला, ग्राहकाला समजतील अशा सोप्या भाषेत यायला हवेत. तसेच आयोगाकडे दाखल करावयाच्या तक्रारीची किचकट पद्धत बदलून त्यात सुटसुटीपणा येणे आवश्यक आहे. त्यामुळे मंचाकडे येणारी प्रकरणे लवकर निकाली निघतील आणि ग्राहकाला न्याय मिळाल्याचे समाधान मिळेल, असे श्रीमती सातपुते यांनी सांगितले.

 विविध विषयाशी निगडीत तक्रारींचा प्रभावीपणे निपटारा करण्यासाठी शेतकरी किंवा ग्राहकांनी घ्यावयाची खबरदारी, दक्षता आणि टाळावयाच्या चुका याचे मार्गदर्शन मान्यवरांनी केले. जिल्ह्यातील नायब तहसीलदार, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण परिषदेचे सदस्य दक्षता समितीचे शासकीय सदस्य, बार कौन्सिलचे पदाधिकारी-वकील, शेतकरी उपस्थ्िा त होते.

यावेळी श्रीमती किरण मंडोद, विमा कंपनीतर्फे ॲङ अजय व्यास, विलास मोरे यांची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती मंजुषा मुथा यांनी केले....

 

****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या