💥भारतात वैचारिक परंपरेमध्ये कधीही खंड पडला नव्हता - डॉ. वैजयंती बेलसरे


💥तत्त्व-प्रकाश व्याख्यानमालेचे' 15 वे पुष्प डॉ. वैजयंती बेलसरे यांनी गुंफले💥

वाशिम : 15 डिसेंबर 2022 रोजी मातोश्री शांताबाई गोटे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील तत्त्वज्ञान विभागाद्वारे, तत्त्वज्ञान विषयातील संशोधन आणि संशोधन पद्धत्तिशास्त्राला वाहिलेल्या 'तत्त्व-प्रकाश' व्याख्यानमालेचे 15 वे पुष्प सम्पन्न झाले. हे पुष्प पुण्याच्या एस. पी. कॉलेज येथील सेवानिवृत्त तत्त्वज्ञान विभाग प्रमुख डॉ. वैजयंती बेलसरे यांनी गुंफले. 

डॉ. बेलसरे यांनी 1999 या वर्षी पुणे विद्यापीठातून डॉ. सुरेंद्र बारलिंगे यांच्या मार्गदर्शनात ''Indian Renaissance : A fresh study" या विषयावर संशोधन केले. सदर संशोधन विषय व त्यातील पद्धत्तिशास्त्राला अनुसरुन त्यांनी 'भारतीय प्रबोधन' या विषयावर आपले व्याख्यान दिले. डॉ. बेलसरे यांनी आपल्या व्याख्यानातून, पहिल्यांदा संशोधन विषयातील पद्धतीशास्त्रावर प्रकाश टाकला. तसेच त्यांनी आपल्या संशोधन कार्यामध्ये निर्माण झालेल्या समस्या आणि त्यातील प्रकरण याविषयी माहिती दिली. 

आपल्या व्याख्यान विषयावर बोलत असताना डॉ. बेलसरे यांनी युरोपियन देशांमध्ये प्रबोधनाची आवश्यकता कशी उद्भवली यावर सुरुवातीला प्रकाश टाकला. त्याला अनुसरून त्या म्हणाल्या की, युरोपियन देशाची ऐतिहासिक पार्श्वभूमी ही अस्थिर स्वरूपाची होती. ग्रीक देशामध्ये असलेले वैचारिक मतभेद, व त्यानंतर मध्ययुगीन कालखंडामध्ये धर्माने निर्माण केलेले वर्चस्व आणि त्याच धर्मांतर्गत निर्माण झालेले कलह यातून खऱ्या अर्थाने तेराव्या शतकानंतर युरोपियन देशांमध्ये प्रबोधनाची सुरुवात झाली. 

युरोपियन संस्कृतीच्या तुलनेत भारताची संस्कृती ही अत्यंत प्राचीन आहे. भारतीय संस्कृतीमध्ये वेद, उपनिषद, दर्शने, जैन व बुद्ध यांची श्रमण परंपरा, संत परंपरा या वैचारिक परंपरा सतत विकसित होत गेलेल्या आहेत. विशेष म्हणजे भारतामध्ये धर्म विविधता, पंथ विविधता, भाषा विविधता असताना देखील भारतीय संस्कृती कधीही लयाला गेली नाही. मात्र युरोपियन प्रबोधनाच्या कालखंडानंतर युरोपियन देशातील काही लोक प्रामुख्याने ब्रिटिश जेव्हा भारताकडे येऊ लागले तेव्हा त्यांनी भारतातील जातीव्यवस्था, आर्थिक विषमता, लिंग विषमता, धार्मिक विषमता, धर्मातील कर्मकांड अशा काही बाबींना पाहून भारतातही प्रबोधन होणे आवश्यक असल्याचे मानले होते. विशेष म्हणजे युरोपियन प्रबोधनाने प्रभावित होऊन राजा राममोहन रॉय यांनीही आधुनिकतेची कास धरली. आणि धर्म, पंथ, जाती, जमातीमध्ये विभागलेल्या भारतीय समाजात एकात्मता आणण्याचा प्रयत्न केला. 

वस्तुस्थिती पाहता भारतामध्ये जातीवर आधारित अर्थ आणि समाज व्यवस्थेमुळे सामाजिक गतिमानता क्षीण होत गेली. मात्र भारतात वैचारिक परंपरेमध्ये कधीही खंड पडला नव्हता. आणि हीच बाब स्वामी विवेकानंद, न्या. रानडे अशा काही भारतीय विचारवंतांनी निदर्शनास आणून दिले. तर महात्मा फुलेंनी भारतीय परंपरेची चिकित्सा वंचित समाजाच्या दृष्टिोनातून केली. आणि यातून खऱ्या अर्थाने प्रबोधनाचा विचार रुजायला सुरुवात झाली. प्रबोधनाच्या प्रक्रियेला महात्मा गांधी, नेहरू, डॉ. आंबेडकर यांचे ही वेगवेगळ्या स्वरूपात महत्वपूर्ण योगदान लाभले. असा आशय डॉ. बेलसरे यांनी आपल्या व्याख्यानातून व्यक्त केला.

शेवटी डॉ. वैजयंती बेलसरे म्हणाल्या की, जेव्हा आपण प्रबोधन करण्यासंबंधी प्रयत्न करीत असतो तेव्हा आपण परंपरेचे विरोधक नसतो तर आपण त्या परंपरांना नवीन रूप देण्याचा प्रयत्न करीत असतो अर्थात परंपरा ह्या कधीही संपत नाहीत तर त्या सतत प्रवाहित होत असतात. म्हणूनच खऱ्या अर्थाने आपण परंपरा आणि आधुनिकता यात समतोल राखण्याचा दृष्टिकोन ठेवला पाहिजे. विशेष म्हणजे वर्तमानामध्ये आपण ज्या कुठल्या गोष्टी पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न करतो त्या यांत्रिक स्वरूपाच्या नसाव्यात. तर त्या परिवर्तनाला घेऊन जाणाऱ्या सर्वसमावेशक असाव्यात, असे आवाहन त्यांनी उपस्थितांसमोर केले.

व्याख्यानाच्या प्रारंभी व्याख्यानमालेचे आयोजक तत्त्वज्ञान विभाग प्रमुख डॉ. वेदप्रकाश डोणगावकर यांनी वक्त्यांचा परिचय करुन देत व्याख्यानमालेचा उद्देश स्पष्ट केला आणि व्याख्यानानंतर व्याख्यात्यांचे व उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रतील विद्यापीठाचे प्राध्यापक, अभ्यासक, संशोधक, विद्यार्थी आणि तत्त्वज्ञान प्रेमी उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या