💥चाचणी स्पर्धेतील कबड्डीपटूंना राष्ट्रीय पातळीवर चमकण्याची सुवर्णसंधी - सहकार मंत्री अतुल सावे


💥मातोश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठान आयोजित कुमार/कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत मंत्री सावे बोलत होते💥


परभणी (दि.07 डिसेंबर) :- महाराष्ट्राच्या लाल मातीवर खेळला जाणारा कबड्डी हा खेळ केवळ शहरी भागापुरता मर्यादित न राहता ग्रामीण भागातील खेळाडूंनी यामध्ये आपला ठसा उमटवावा. ग्रामीण भागातील क्रीडापटूंनी खेळाकडे देशपातळीवर चमकण्याची एक सुवर्णसंधी म्हणून पाहावे, असे आवाहन सहकार, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी विजेत्या संघांना केले


महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आणि परभणी जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने मातोश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठान,गंगाखेड आयोजित 49 व्या कुमार - कुमारी गट राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचा स्व. माणिकराव गुट्टे क्रीडा नगरीत त्यांच्या हस्ते बक्षीस वितरणाचा सोहळा नुकताच पार पडला. सहकार मंत्री श्री. सावे त्याकवेळी बोलत होते आमदार रत्नाकर गुट्टे,समाज कल्याण उपायुक्त गीता गुठ्ठे व्यासपीठावर उपस्थित होत्या.

गंगाखेड येथे आयोजित कबड्डी चाचणी स्पर्धेतून राज्याचा देशपातळीवर नावलौकिक कमावतील. कबड्डी हा खेळ राकट, दणकट आणि चापल्यानिर्मिती करणारा आहे. आमदार रत्नाकर गुट्टे यांनी ग्रामीण भागातील मुलांना या स्पर्धेच्या माध्यमातून गंगाखेड येथे राज्यस्तरीय क्रीडास्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन करुन संधी उपलब्ध करुन दिल्याचे सांगत सहकार मंत्री श्री. सावे यांनी मुंबईच्या विजयी दोन्ही संघांचे अभिनंदन केले तर उपविजेत्या संघांना पुन्हा नव्याने तयारी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

गंगाखेड येथे झालेल्या चारदिवसीय स्पर्धेत राज्यभरातील मुला-मुलींचे 50 संघ सहभागी झाले. साखळी पद्धतीने सामने झाले. कुमार गटात अहमदनगर विरुद्ध ठाणे व मुंबई उपनगर विरुद्ध पुणे संघात उपांत्य लढत झाली. कुमारी गटात मुंबई उपनगर विरुद्ध परभणी व पुणे विरुद्ध मुंबई शहर संघादरम्यान उपांत्य लढत झाली. कुमार गटाच्या लढतीमध्ये अहमदनगर व मुंबई उपनगर तर कुमारी गटाचा मुंबई उपनगर, पुणे संघ अंतिम लढतीमध्ये पोहचला. अंतिम फेरीतील कुमार –कुमारी दोन्ही गटातील सामन्यात मुंबई उपनगर संघाने प्रथम पारितोषिक पटकावले.  सहकार मंत्री अतुल सावे, आमदार डॉ. गुट्टे व अन्य मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघास स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

कुमारी गटातून परभणीच्या संघाला तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. कुमार गटात तिस-या क्रमांकावर पुणे संघ राहिला कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विठ्ठल सातपुते यांनी केले. जिल्ह्यातील क्रीडाप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या