💥परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी अर्ज करावेत....!


💥असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विजय लोखंडे यांनी केले💥 

परभणी (दि.06 डिसेंबर) : प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील गहू, हरभरा पिकासाठी 15 डिसेंबर, 2022 तर उन्हाळी भुईमुगासाठी 31 मार्च, 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विजय लोखंडे यांनी केले आहे. 

रब्बी अन्नधान्य व गळीतधान्य यासाठी विमा हप्ता दर दीड टक्का व नगदी पिकासाठी पाच टक्के आहे. अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांचे उंबरठा उत्पन्न हे सर्व पिकांसाठी त्या हंगामातील मागील सात वर्षांपैकी सर्वाधिक उत्पन्नाच्या पाच वर्षांचे सरासरी उत्पन्न गुणिले त्या पिकाचा जोखीमस्तर असेल. उंबरठा उत्पन्न आणि कंपनीने सादर केलेला विमा हप्ता दर दोन्हीही एका वर्षासाठी स्थिर असतील. 

या योजनेंतर्गंत रब्बी हंगाम 2022-23 साठी जोखीमस्तर सर्व अधिसूचित पिकांसाठी 70 टक्के निश्चित करण्यात आला आहे. पिक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग यासारख्या टाळता न येणाऱ्या जोखमींमुळे पिकांच्या उत्पन्नातील घटीपासून व्यापक विमा संरक्षण मिळणार आहे. परभणी जिल्ह्यामध्ये रब्बी हंगाम 2022-23 साठी आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरंस कंपनी लि. या विमा कंपनीकडून राबविण्यात येणार आहे.

परभणी जिल्ह्यासाठी गहू (बागायत) 630 व हरभरा 562.50 आणि उन्हाळी भुईमुगासाठी 644.57 असा पिक निहाय विमा हप्ता दर राहणार आहे. योजनेत सहभागी होणा-या शेतकऱ्यांसाठी गहू (बागायती) व हरभरा पिकासाठी 15 डिसेंबर 2022 आणि उन्हाळी भुईमुगासाठी 31 मार्च, 2023 ही  पिक विमा भरण्यासाठी अंतिम मुदत आहे. पीक विमा भरताना शेतक-यांनी विहीत नमुन्यातील अर्ज, आधारकार्ड आधार नोंदणीची प्रत, सातबारा उतारा, अधिसूचित पिकांची पेरणी केलेले स्वयंघोषणापत्र, भाडेपट्टा करार असलेल्या शेतकऱ्यांचा करारनामा, संमतीपत्र आणि बँक पासबुकची प्रत सोबत ठेवणे आवश्यक आहे.  शेतक-यांना राष्ट्रीयकृत बँक, व्यापारी बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि सामाईक सुविधा केंद्राकडे अर्जदावा करता येणार आहे.  

अधिक माहितीसाठी शेतक-यांनी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, संबंधित तालुका कृषि अधिकारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि राष्ट्रीय बँकेशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी  विजय लोखंडे यांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या