💥स्व.भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी अर्ज आमंत्रित.....!


💥योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विजय लोखंडे यांनी केले💥

 परभणी (दि.08 डिसेंबर) : स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सन 2022-23 साठी जिल्ह्यातील सर्वसाधारण, अनुसूचित जाती आणि जमातीच्या शेतक-यांनी 100 टक्के अनुदानित योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विजय लोखंडे यांनी केले आहे. 

या योजनेत सर्वसाधारण प्रवर्गासाठी 267.89 लाख, अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 10.32 लाख व अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी 1.34 लाख आर्थिक लक्षांक प्राप्त झाला आहे. आंबा, काजू, पेरु, डाळिंब, कागदी लिंबू, मोसंबी, संत्रा, नारळ, सिताफळ, आवळा, चिंच, जांभूळ, कोकम, फणस, अंजीर आणि चिकू अशा एकूण 16 फळपिकांचा समावेश करण्यात आला आहे.

त्यामध्ये खड्डे खोदणे, कलमे रोपे लागवड करणे, पिक संरक्षण, नांग्या भरणे व ठिबक सिंचनाव्दारे पाणी देणे यासाठी 100 टक्के अनुदान अनुज्ञेय आहे. लाभार्थ्यास तीन वर्षाच्या कालावधीत 50:30:20 प्रमाणे अनुदान अदा करण्यात येईल. फळबाग लागवडीसाठी किमान 0.20 ते कमाल सहा हेक्टर क्षेत्राची मर्यादा आहे.योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व ईच्छुक शेतकऱ्यांनी https://mahadbt mahait.gov.in/ संकेतस्थळावर अर्ज करावा. 

योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतक-यांनी  सातबारा उतारा व आठ-अ उतारा, सामाईक क्षेत्र असल्यास लाभार्थी शेतक-याने इतर खातेदारांचे सहमती पत्र सादर करावे, आधार कार्ड, आधार लिंक बँक खाते क्रमांक आणि कागदी लिंबू, संत्रा व मोसंबी या लिंबूवर्गीय फळपिकांच्या लागवडीसाठी माती परीक्षण अहवाल कागदपत्राबरोबर अपलोड करणे आवश्यक आहे. 

अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक व कृषि सहाय्यक यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन श्री. लोखंडे यांनी केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या