💥वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापिठात पशुशक्‍तीचा योग्य वापर योजने अंतर्गत बैलचलित सुधारीत अवजारांचा समावेश...!


💥भाडेतत्वावर कृषि अवजारे सेवा केंद्राची उभारणी व शेतकरी पशुपालक मेळाव्याचे आयोजन💥

परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्प पशुशक्‍तीचा योग्य वापर योजना आणि राणी सावरगांव येथील श्री. छत्रपती शिवाजी महाराज गोशाळा यांचे संयुक्त विद्यामाने वनामकृवि विकसित बैलचलित अवजारांचा समावेश असलेले भाडेतत्वावर कृषि अवजारे सेवा केंद्राचे (कस्टम हायरिंग सेंटर) उदघाटन व शेतकरी पशुपालक मेळाव्‍याचे दिनांक २० डिसेंबर रोजी सकाळी १०.०० वाजता राणीसावरगांव (ता. गंगाखेड जि. परभणी) येथील श्री. छत्रपती शिवाजी महाराज गोशाळात आयोजित करण्यात आला आहे.


कार्यक्रमासाठी अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. इन्‍द्र मणि राहणार असुन उदघाटक म्‍हणुन परभणी जिल्हाधिकारी मा श्रीमती आंचल गोयल यांची उपस्थिती लाभणार आहे. प्रमुख अतिथी म्‍हणुन अहमदाबाद येथील बंसी गिर गोशाळाचे अध्यक्ष मा. गोपालभाई सुतारीया उपस्थित राहणार असुन मुंबई येथील ग्लोबल विकास ट्रस्टचे मुख्यसंचालक मा. श्री मयंक गांधी, भारतीय जीव पशु कल्याण व राष्‍ट्रीय पंचगव्य अनुसंधान समितीचे सदस्य श्री. सुनिल मानसिंहका, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, कृषि सहसंचालक श्री साहेबराव दिवेकर, जिल्‍हा ग्रामीणी विकास यंत्रणाच्‍या प्रकल्‍प संचालिका श्रीमती रश्‍मी खांडेकर, प्राचार्य डॉ उदय खोडके, विभाग प्रमुख डॉ गजेंद्र लोंढे आदीची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

सदर उभारण्‍यात येणा-या भाडेतत्वावर कृषि अवजारे सेवा केंद्रात विद्यापीठ विकसित बैलचलित बहुविध पेरणी यंत्र, धसकटे गोळा करणे अवजार, तिहेरी कोळपे, बैलचलित सरी पाडणे यंत्र, ऊसाला माती लावणे अवजार, हळदीला माती लावणे अवजार, हळद काढणी अवजार, एक बैलाची अवजारे, कापसातील कोळपणी व खत देणे अवजार, बैलचलित सोलार तणनाशक व किटकनाशक फवारणी यंत्र, अजारी पशुधन उभा करणे यंत्र इत्यादी विविध अवजारे उपलब्‍ध करण्‍यात येणार असुन ही अवजारे परिसरातील शेतकरी बांधवांना भाडेतत्‍वावर वापराकरिता राणीसावरगांव येथील श्री. छत्रपती शिवाजी महाराज गोशाळा येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याप्रसंगी उपलब्ध अवजारांचे प्रात्यक्षिके प्रत्यक्ष शेतावर दाखवण्यात येणार आहे.

याप्रसंगी आयोजित तांत्रिक सत्रामध्ये विविध विषयावर तज्ञ मंडळी मार्गदर्शन करणार आहे, यात गोशाळेवर निर्मित गोखुर खत, गोकृपाअमृत, दषपर्णी अर्क निर्मिती व वापर, सेंद्रीय शेतीमध्ये विकसित बैलचलित अवजारांच्या वापर, कृषि यांत्रिकीकरण व मुल्यवर्धन, आधुनिक पध्दतीने पशुपालन व आरोग्य व्यवस्थापन, गो आधारीत शेती इत्यादी विषयावर सखोल तज्ञ मार्गदर्शन करणार असुन शेतकरी बांधवाचे अनुभव कथन होणार आहे. तरि सदर कार्यक्रमास परिसरातील शेतकरी बांधव व पशुपालकांनी उपस्थित राहण्‍याचे आवाहन आयोजक वनामकृविच्‍या पशयोवा योजनेच्‍या संशोधन अभियंता डॉ. स्मिता सोलंकी व श्री. छत्रपती शिवाजी महाराज गोशाळाचे संचालक श्री. शिवप्रसाद कोरे यांनी केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या