💥परभणी जिल्ह्यातील शहीद,माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्याला प्रशासनाचे प्राधान्य - जिल्हाधिकारी आंचल गोयल


💥सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाला प्रारंभ💥 


परभणी (दि.12 डिसेंबर) :-  देशाच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणा-या जिल्ह्यातील शहिदांच्या वीरमाता, पत्नी, पिता किंवा माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्याला जिल्हा महसूल तसेच पोलीस प्रशासनाचे प्राधान्य असेल, असा विश्वास जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी दिला. सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा प्रारंभ आज त्यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी श्रीमती गोयल बोलत होत्या. 


जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी महेश वडदकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक श्रीमती रश्मी खांडेकर, समाज कल्याण सहायक आयुक्त श्रीमती गीता गुठ्ठे प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित होत्या. 

देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीद, त्यांची पत्नी, पिता किंवा वीरमातांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रथम प्राधान्य देत असतो. तरीही  प्रशासन काही ठिकाणी कमी पडते, असे सांगून यापुढे  शासनस्तरावर सकारात्मक पाठपुरावा करून शहिदांच्या नातेवाईकांच्या अडचणी समजून घेत मदत करण्याचे जिल्हाधिकारी गोयल यांनी प्रशासनाला आदेश दिले. 

  सर्वसामान्य नागरिकांना शहिदांचा इतिहास माहीत व्हावा, यासाठी शहिदांच्या स्मारकासाठी पान्हेरा या गावी जागेची पाहणी केली असून, त्याठिकाणचे काम लवकरच पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न करू. सोबतच माजी सैनिकांच्या विश्रामगृहाच्या कामाची पाहणी केली आहे. ते ही काम लवकरच पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही देत शहिदांचे नातेवाईक तसेच माजी सैनिकांना विविध शासकीय योजनांचे लाभ मिळवून देण्यासाठी लवकरच अर्ज प्रक्रिया सुरू केली जाईल. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून एकत्रित प्रयत्न केले जातील, असेही जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी सांगितले.  


सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा हा भावनाप्रधान दिवस असतो. सैनिक सिमेवर सर्वसामान्यांच्या विचारापलिकडे सेवा बजावत असतात. प्रशासनातील एक घटक म्हणून त्यांच्या कुटुंबांचे जीवन सुकर करण्याचा प्रयत्न करू. त्यांच्या नातेवाईकांसाठी  प्रशासनाने यापेक्षा जास्त मदत करणे आवश्यक आहे, असे सांगून शहिदांचे नातेवाईक व कुटुंबाच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करू, असे सांगत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक श्रीमती रश्मी खांडेकर यांनी शहिदांना अभिवादन केले.

  महेश वडदकर यांनी आपल्या प्रास्ताविकातून शहिदांच्या नातेवाईकांप्रती आपण समाज म्हणून काही देणे लागतो, असे सांगून शहीद व माजी सैनिकांच्या पाल्यांना पोलीस किंवा लष्करात भरती होण्याबाबत प्रशिक्षण देण्यासाठी जमीन उपलब्ध करून देणे, नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील माजी सैनिकांना कँन्टीन उपलब्ध करून देणे आदी मागण्यांसाठी करण्यात आलेल्या पाठपुराव्याबाबत त्यांनी उपस्थितांना माहिती दिली.  

जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयााकडून वीरमाता, वीरपत्नी, वीरपिता यानां शाल, पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले. तसेच दहावी व बारावीमध्ये 90 टक्केपेक्षा जास्त गुण प्राप्त केलेल्या माजी सैनिकांच्या पाल्यांना रोख दहा हजार व प्रशस्तीपत्र आणि वीरपत्नीला जमिनीचे सातबारा वाटप करण्यात आले. या वर्षाकरिता जिल्हा प्रशासनाला ध्वजदिन निधी संकलनाचे  34 लाख 45 हजार रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. उद्दिष्ट पूर्ण केलेल्या जिल्हा प्रशासनातील विविध विभागाच्या अधिकारी कर्मचा-यांचा सत्कार करण्यात आला.  व्यासपीठावरील मान्यवरांना ध्वज लावून ध्वजदिन निधी संकलनाचे उद्घाटन करण्यात आले.

  जिल्ह्यातील गणेश शहाणे, अक्षय गोडबोले, बालाजी अंबोरे, शुभम मुस्तापुरे, मंचक रणखांबे आणि गणेश चित्रेवार, महादु क्षीरसागर या शहिदांच्या नातेवाईकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला वीरमाता, वीरपत्नी वीरपिता, शहिदांचे पाल्य, माजी सैनिक तसेच प्रशासनातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष ढगे यांनी केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या