💥युवकांनो क्रीडा गुण विकसीत करण्यावर लक्ष द्या - क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन


💥कबड्डी स्पर्धा २०२२ चे क्रीडा व युवक व कल्याण मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून उद्घाटन💥


परभणी : भारत हा जगातील सर्वाधिक तरुणांचा देश असून, त्यांनी व्यसनाकडे न वळता व्यायामाकडे लक्ष द्यावे. तसेच क्रीडा क्षेत्रातील उज्ज्वल भवितव्यासाठी युवा वर्गाने क्रीडा गुण विकसित करण्याचे आवाहन क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन यांनी केले. 

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आणि जिल्हा क्रीडा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने मातोश्री दगडुबाई गुट्टे प्रतिष्ठान गंगाखेड आयोजित ४९ वी कुमार - कुमारी गट राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा २०२२ चे क्रीडा व युवक व कल्याण मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून उद्घाटन करण्यात आले.


आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार श्रीमती मेघना बोर्डीकर, परळी कृषी उत्पन्न समितीचे अध्यक्ष राजेभाऊ फड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप घोन्सीकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) ओमप्रकाश यादव, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, पंचायत समितीचे प्रशासक अंकुश चव्हाण, जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, प्रतिष्ठानचे अध्यक्ष हनुमंत मुंडे, सचिव अॅड. मिलींद क्षीरसागर, राज्य कबड्डी असोसिएशनचे कोषाध्यक्ष मंगल पांडे व्यासपीठावर उपस्थित होते.

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 'खेलो इंडिया'च्या धोरणाच्या धर्तीवर राज्य शासन क्रीडा धोरण राबविणार असल्याचेही श्री. महाजन यांनी यावेळी सांगितले. तरुणांच्या क्रीडा गुणांना वाव मिळावा, यासाठी येथील व्यायामशाळा उभी करण्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करून देण्याचे आश्वासन क्रीडा मंत्री श्री. महाजन यांनी दिले.

आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या प्रतिष्ठानने ४९ व्या कुमार-कुमारी गट राज्य अजिंक्य व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा २०२२ चे अतिशय भव्य आणि सुंदर आयोजन केल्याबद्दल क्रीडामंत्री गिरीष महाजन यांनी आमदार श्री. गुट्टे यांचे कौतुक केले. 

युवा वर्गाने कबड्डी खेळासोबतच अभ्यासही करावा. मातोश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठानने दोन मुला व मुलीच्या संघाचे पालकत्व स्विकारले आहे. तसेच या मतदारसंघात क्रीडा संकुल उभारण्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मिळावा, अशी आमदार रत्नाकर गुट्टे यांनी मागणी केली. गंगाखेड येथील स्व. माणिकराव गुट्टे क्रीडानगरी येथे कबड्डी स्पर्धा चार दिवस चालणार आहेत.

एअर इंडियात नोकरी करत असतानाही कबड्डी क्षेत्रात योगदान देणारे शशी राऊत (मुंबई), यांच्यासह केशव सप्रे, विरानाथ दांजी, जे. जे. पाटील, लक्ष्मण बेल्हारे, तानाजी मटकर, महेश गुढे, अनिल भोयर आणि मरणोत्तर देहदान करणारे बापू सातपुते यांचाही क्रीडामंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन यांनी खेळाडूंचा परिचय करून घेतला. विठ्ठल सातपुते यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या